Mahayuti Government Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Government : 'टू इज कंपनी, थ्री इज अ क्रॉऊड..!' महायुतीच्या गोंधळात राज्य वाऱ्यावर

Mahayuti Alliance: What Is Causing the Internal Turmoil? : बीड जिल्ह्यात एका महिला वकिलाला सरपंचासह दहा ते बारा जणांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात निर्माण झालेला संताप पाहता हे प्रकार थांबतील, असे वाटले होते.

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : टू इज कंपनी, थ्री इज अ क्रॉऊड... अशी इंग्रजीतील एक म्हण प्रसिद्ध आहे. दोघांचे व्यवस्थित सुरू असते. तिसरा मध्ये आला की परिस्थिती बिघडते, असा त्याचा अर्थ आहे. सत्ताधारी महायुतीचे सध्या असेच झाले आहे. महायुतीत तीन पक्ष सहभागी आहेत आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या गोंधळामुळे राज्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अंतर्गत कुरघोड्या, राजकारण आदींमुळे सरकारच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे. ओठही आपलेच आणि दातही आपलेच, अशी अवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे. 

प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुती सरकारला अंतर्गत कुरघोड्या, रुसवे, फुगवे आणि पक्षांपक्षांतील, पक्षांतर्गत राजकारणातून सुटका करून घेता आलेली नाही. सरकार स्थापन होऊन चार महिने उलटून गेले तरी महायुतीतील गोंधळ सुरूच आहे आणि या गोंधळाचा फटका राज्याला बसत आहे. मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर राज्यभरात निर्माण झालेल्या संतापामुळे अशा घटना पुन्हा होणार नाहीत, असे वाटले होते. मात्र ते स्वप्नरंजन ठरले आहे. गोंधळात अडकलेल्या सरकारला या बाबींकडे लक्ष देणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

कुणीतरी हिंदुत्व सोडले, मग लाज सोडली, कुणीतरी गद्दारी केली, बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, मग तसे होताना तुम्ही काय करत होते, तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपले होते का.... ही आणि अशी अनेक वाक्ये दररोज लोकांच्या कानावर धडकत आहेत. तिकडे, मस्साजोगसारख्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे. महागाई, बेरोजगारी आदी समस्यांनी लोक हैराण झाले आहेत. सध्या सत्ताधारी महायुतीतच इतका गोंधळ वाढला आहे की त्यात जनतेचा आवाज, पीडितांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणे अवघड झाले आहे.

लोकांनी प्रचंड बहुमत दिल्यामुळे महायुती सरकार हवेत गेले आहे. विरोधकांनी एखादा प्रश्न उपस्थित केला की, तुमचे सरकार असताना काय केले, असा प्रतिप्रश्न केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तरी सुधारणा होईल, असे वाटले होते, मात्र ते खोटे ठरले. बीड जिल्ह्यातच एका महिला वकिलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या महिला अंबाजागोई येथील न्यायालयात वकिली करतात, असे सांगितले जात आहे. त्यांना रिंगण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

गावातील लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनिप्रदूषण या महिला वकिलाला असह्य झाले होते. घरासमोरील पिठाच्या गिरण्यांच्या आवाजामुळे त्यांचा मायग्रेनचा त्रास वाढला होता. याच्याविरोधात त्यांनी तक्रारी दिल्या होत्या. गावातील सरपंच आणि अन्य काही लोकांना याचा प्रचंड राग आला. राग आल्यामुळे सरपंच आणि अन्य 10 ते 12 जणांनी या महिलेला शेतात नेऊन रिंगण करून काठ्या, वायरने बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. बेदम मारहणीमुळे महिलेची पाठ अक्षरशः काळी-निळी झाली आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे.

मारहाण करणाऱ्यांच्या अंगी हे धाडस कुठून येते, त्यांना कायद्याची भीती वाटत नाही का? असे प्रश्न आता केवळ शांतताप्रिय नागरिकांना पडत आहेत. त्याचे उत्तर त्यांना मिळतच नाही. सरकार, पोलिस, गुन्हेगार यांना मात्र असे प्रश्न पडत नाहीत. पोलिसांचा धाक संपला आहे, सरकारचे नियंत्रण सुटले आहे, असे म्हणणे अजिबात धाडसाचे ठरणार नाही, कारण राज्यात परिस्थिती तशीच दिसत आहे. लोकांना नको त्या प्रश्नात गुंतवून ठेवण्याची कला या सरकानेही अवगत करून घेतली आहे. त्यामुळे खरे प्रश्न, खऱ्या समस्यांची दाहकता लोकांना कळेनाशी झाली आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, हा महायुती सरकारसमोरचा आजघडीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. अमुक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इतका अट्टाहास कशासाठी केला जात असेल? गद्दार कोण आणि लाज कुणी सोडली, हिंदुत्व कुणी सोडले हा त्याखालोखाल राज्यासमोरील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षांमध्ये, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अखंड संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि झाडून सारे मंत्री या प्रश्नांमध्ये गुंतले आहेत.

टू इज कंपनी, थ्री इज अ क्रॉऊड... या म्हणीचा प्रत्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला आता येत असावा. विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत ठळकपणे पोहोचत नाही, ही सरकारसाठी एका अर्थाने जमेची बाजू ठरली आहे. विरोधक आणखी आक्रमक झाले आणि लोकांपर्यंत पोहोचले तर सरकारची निश्चितपणे कोंडी होणार आहे. अंतर्गत कुरघोड्या, अंतर्गत राजकारण बाजूला सारून सरकारने आता लोकांच्या समस्या सोडवण्यात लक्ष घातले पाहिजे. समस्यांकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी लोकांना नको त्या मुद्द्यांत अडकवण्याचा प्रयत्न आज ना उद्या अंगलट येऊ शकतो, हे सरकारने नीट लक्षात घेतले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT