BJP, Congress
BJP, Congress File Photo
विश्लेषण

भाजपचे नेते हॉटेलात असल्याचे समजताच काँग्रेस आमदाराने काढला पळ

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी मध्यरात्री गोवा निवडणुकीचे भाजपचे (BJP) प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. फडणवीस मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये लॉरेन्स यांनी मध्यरात्री धाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गोव्यातील विधानसभेची (Goa Assembly Election) निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. लॉरेन्स हे पक्षात नाराज असून सोडचिठ्ठी देण्याची चर्चा यापूर्वीही रंगली होती. त्यामुळे लॉरेन्स यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते हॉटेलात असल्याचे समजताच तिथून पळ काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. हॉटेलमध्ये निवडणुकीत रणनीतीकारांना भेटण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. पण हॉटेलात भाजपचे नेतेही असल्याचे समजल्यानंतर लगेच तिथून बाहेर पडल्याचा दावा लॉरेन्स यांनी केला आहे. मी भाजपचे नेते तिथे असल्याचे पाहिले होते. त्यामुळे तातडीनं हॉटेलातून तिथून निघालो, असं लॉरेन्स यांनी स्पष्ट केलं आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

काय आहे प्रकरण?

सोमवारी गोव्यात दाखल होताच त्यांनी पहिला धक्का काँग्रेसला देण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा रंगली आहे. ते मुक्काम असलेल्या हॉटेलात लॉरेन्स यांनी अचानक एन्ट्री केली. त्यानंतर ते काही वेळाने हॉटेलबाहेर गेले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लॉरेन्स लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

हॉटेलातून बाहेर पडताना लॉरेन्स यांना माध्यमांनी फडणवीसांची भेट घेतल्याबाबत विचारले होते. पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. दरम्यान, मंगळवारी यावरून काँग्रेसमध्येही खळबळ उडाली असून नेत्यांना याचा खुलासा करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षचं भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवरून पक्षाला झटका बसला आहे.

'आप'ने लॉरेन्स यांचा याबाबतचा व्हि़डीओ ट्विट केला आहे. काँग्रेसही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही आपने केला आहे. काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने गोव्याला फसवलं. लॉरेन्स हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत, असं आपने म्हटले आहे. त्यामुळे लॉरेन्स यांच्या भाजप प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT