Dilip Walse, Dilip Mohite, Shivajirao Adhalrao Sarkarnama
विश्लेषण

Shivajirao Adhalrao Join NCP : मोहिते-वळसे-आढळराव यांच्यातील 20 वर्षांचे वैर मिटणार...

Shirur Lok Sabha Constituency : मन मोकळं करीत वज्रमूठ बांधणारा ठरला राष्ट्रवादीचा मंचरचा आढळराव प्रवेशाचा मेळावा

उत्तम कुटे

Pune Political News : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मंगळवारी (ता. 26) मंचर (ता.आबेगाव) येथे झाला. त्यात शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसाच तो मन मोकळं करणारा ठरला. त्यातून वीस वर्षाचे तिघा दिग्गज नेत्यांचे वैर मिटले. त्यामुळे राष्ट्रवादीची वज्रमूठ शिरुर लोकसभेला बांधली गेली. तसेच आढळरावांची शिरुरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी या मेळाव्यात जाहीर झाली.

आढळराव आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite) तसेच आढळराव आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात गेल्या वीस वर्षात असलेले राजकीय वैर या मेळाव्यात मिटले. त्यांनी आपली मने मोकळी केली. आपले राजकीय वैर होते, ते वैयक्तिक नव्हते, हे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघासातील कामातून ते निर्माण झाल्याची कबुली त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहितेंचा उल्लेख जवळचे मित्र असा करीत स्वभावाने ते चांगले आहेत, असे आढळराव (Shivajirao Adhalrao) म्हणाले. आमच्यातील वैर वैयक्तिक नव्हते, तर, सार्वजनिक प्रश्चांचे ते भांडण होते, असा खुलासा त्यांनी केला. राष्ट्रवादीतून २००४ ला शिवसेनेत जाऊन खासदार झाल्यानंतर आढळराव आणि माझ्यात संघर्ष सुरु झाला, असे वळसे म्हणाले. आढळरावांनी आपल्या पत्नी कल्पना यांना आपल्याविरुद्ध विधानसभेला उभे केले होती, याची आठवण त्यांनी सांगितली. त्याबद्दल आढळरावांनी आपले आभार मानले पाहिजेत,असे ते म्हणताच हशा पिकला.

वीस वर्षे वैर असूनही आढळरावांबद्दल खासगीतही आपण कधी वाईट बोललो नाही, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तर, मोहितेंनी आपला विरोध माझ्याकडे व्यक्त केला असता, तर तो यापूर्वीच मिटला असता, असे ते म्हणाले.

आढळराव आणि वळसेंशी (Dilip Walse) मतभेद राजकीय होते, असे मोहिते म्हणाले. माझ्या तालुक्यातील चासकमान धरणातील ८२ टक्के पाणी शिरुरला, तर दुसऱ्या भामा-आसखेडचे सर्व पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडला नेले. कळमो़डी धरणाचेही ते न मिळाल्याने मी बोललो, तिथे मतभेद झाले. पण, ते वैयक्तिक नव्हते, तर तालुक्याच्या हितासाठी होते.

तालुक्यासाठी मी भांडलो, हे आंबेगावकरांनी लक्षात घ्यावे. मी व आढळराव दोघेही शिवसेनेत होतो. त्यामुळे स्वभाव तापट, आक्रमक आहे, असे ते मिश्कीलपणे म्हणाले. त्यांनी माझ्या तालुक्यात (खेड) एवढा संघर्ष का केला, हे मात्र माहीत नाही,असेही ते म्हणाले. विश्वास ठेवा, काम केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी आढळरावांना दिला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT