BJP vidhansabha Election  Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप नव्या दमाने 'माधव'च्या मागे

अय्यूब कादरी

Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सारी समीकरणे उध्वस्त करून टाकली आहेत. मतदानाचा पॅटर्न भाजप आणि महायुतीची झोप उडवणारा ठरला आहे. भाजपला कायम पूरक ठरलेले 'माधव' समीकरण (माळी, धनगर, वंजारी) भाजपला यश मिळवून देऊ शकले नाही. आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपने पुन्हा एकदा 'माधव' समीकरणावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

माळी, धनगर आणि वंजारी हे समाज ओबीसीमध्ये आहेत. ओबीसी समाज हा भाजपचा मुख्य आधार आहे. आतापर्यंत मराठा समाज विभागलेला होता. त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होत असे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि मराठा समाज एकवटला. एकवटलेल्या मराठा समाजासह दलित, मुस्लिम मतदारही महाविकास आघाडीच्या मागे गेले. मुस्लिम मतदार एमआयएम आणि अन्य पक्ष, तर दलित मतदार वंचित बहुजन आघाडीमध्ये विभाजित व्हायचे. लोकसभा निवडणुकीत असे झाले नाही आणि महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले.

शेतकरी मग तो मराठा असो, मुस्लिम असो की ओबीसी, सरकारवर नाराज आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकारवरही शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. यातूनच भाजपला मिळणाऱ्या धनगर समाजाच्या मतांमध्येही लोकसभा निवडणुकीत घट झाली. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, हे शेतकऱ्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण आहे. अन्य शेतमालाच्या भावातही फारशी वाढ झालेली नाही. शेतीसाठी लागणारी औजारे, खते, कीटकनाशकांच्या दरात मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपचा कणा समजला जाणारा ओबीसींमधील शेतकरी वर्ग भाजपच्या विरोधात गेला. जोडीला मराठा, मुस्लिम, दलित मतदारही महाविकास आघाडीच्या मागे एकवटले.

विधानसभेला गणिते वेगळी असतात. विजयाचे अंतर कमी असते. एखाद्या मतदारसंघात दोनपेक्षा अधिक दिग्गज निवडणुकीला उभे राहिले तर मग कोणतेही समीकरण चालेल का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. असे असले तरी भाजपने आता ओबीसी समाजामध्ये पूर्वीसारखी पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या वाशीम दौऱ्याकडे पाहिले जाात आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या पाचमजली नंगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांचे मंदिर, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांची समाधी आणि जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे पोहरादेवी हे स्थान देशभरातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते. बंजारा समाजाचे लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नवरात्र, रामनवमीला बंजारा समाज येथे एकत्र येतो. बंजारा समाजाचा इतिहास समोर यावा, परंपरा, संस्कृतीचे दर्शन व्हावे, या हेतूने मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पुढाकाराने पाचमजली वस्तुसंग्रहालयाची (बंजारा विरासत) उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती ही बंजारा समाजाला महायुतीच्या, विशेषतः भाजपच्या मागे उभे करण्याचा एक प्रयत्न होता, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला एकआकडी जागा मिळाल्या. मराठवाड्यात तर भाजपला खातेही उघडता आले नाही. आठपैकी सात जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. एक जागा शिंदे गटाला मिळाली. मराठवाड्यात मराठा समाजाने निर्णायक भूमिका बजावली. ओबीसी समुदायांतील शेतकरी वर्गानेही भाजपची साथ सोडली. मुस्लिम, दलितांना भाजप आपला मतदार मानतो का, या समाजाची मते भाजपला हवी असतात का, हा खरेतर मोठा प्रश्नच आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदारांनी आपल्या मतांचे विभाजन टाळले. त्याचा फटका भाजपला बसला. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. त्यामुळे 'माधव' समीकरण साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

राज्यातील उर्वरित भागांतही भाजपची अवस्था अशीच बिकट झाली आहे. विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत. विदर्भ (Vidarbha) हा भाजपचा बालेकिल्ला, मात्र महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. भाजपला केवळ दोन, तर शिंदे गटाला एकच जागा जिंकता आली. महाविकास आघाडीने सात जागा जिंकल्या, त्यापैकी पाच काँग्रेसच्या झोळीत पडल्या होत्या. या बाबींचा विचार करूनच भाजपने पुन्हा 'माधव'कडे मोर्चा वळवला आहे. यातूनच अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. धनगर समाजाची मते डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी समाज आपल्यापासून दुरावत असल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका ठोस नसल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे नेत्यांना वाटत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसी समाजात मजबूत पकड निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे उमेदवारी देताना 'माधव' फॉर्म्युला विचारात घेतलाा जाऊ शकतो, म्हणजे या समाजांतील नेत्यांना प्राधान्याने उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

दुसरीकडे, एकवटलेला मराठा समाज हा भाजपच्या चिंतेत भर घालणारे कारण ठरले आहे. त्यापाठोपाठ दलित, मुस्लिम समाजही एकवटलेला आहे. लोकसभेप्रमाणेच हा समाज विधानसभेलाही महाविकास आघाडीच्या मागे एकवटतो किंवा नाही, यावर भाजपचे भवितव्य ठरणार आहे. मराठा समाजाला आपल्याकडे वळवण्यात भाजपला किती यश येते, ओबीसी समाजांतील शेतकऱ्यांची नाराजी किती प्रमाणात दूर करता येते, हे घटकही भाजपचे भवितव्य ठरवणार आहेत.

मुस्लिम, दलित समाजाची मते आपल्याला मिळत नाहीत, ही भाजपची चिंता नाही. या मतांचे विभाजन होणार की नाही, ही भाजपची चिंता आहे. दलित, मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही आणि ते महाविकास आघाडीच्या मागे गेले तर भाजपची चिंता वाढणार आहे. 'माधव' समीकरण साधण्याचा प्रयत्न करत असतानाच भाजपला दुरावलेल्या मराठा समजालाही पुन्हा आपलेसे करावे लागणार आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे साध्य करता येतील का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. या दोन्ही बाबी साध्य झाल्या तर त्या भाजपच्या पथ्थ्यावर पडणार, हे निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT