विश्लेषण

भंगारवाला ते आक्रमक मंत्री; असा आहे नवाब मलिकांचा प्रवास

हो मी आहे भंगारवाला, आणि मला अभिमान आहे मी भंगारवाला असल्याचा, नवाब मलिकांच्या या वक्तव्याने विरोधकांचा आवाजही शांत झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात नुसता गोंधळ माजला आहे. २ आक्टोबरला मुंबईत गोव्याला जाणाऱ्या एका लक्झरी क्रुझवर एनसीबीने छापा टाकला आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह आणखी दहा-बारा जणांना ताब्यात घेतले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या २६ दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नवाब मलिक सातत्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. 

 2 ऑक्टोबरला आर्यनला अटक झाल्यापासून ते 28 ऑक्टोबर या 26 दिवसांच्या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. तर समीर वानखेडे यांची विविध आरोपांखाली चौकशी सुरू झाली. तसेच, समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर यासुद्धा या युद्धाच्या मैदानात उतरल्या आहेत.  वानखेडेंवर आरोप केल्यानंतर मलिकांवर भंगारवाला' अशी टिकाही करण्यात आली. त्याला नवाब मलिकांनीही थेट उत्तर दिले की, हो मी आहे भंगारवाला, मीही आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसाय केला. माझे कुटुंबीय आजही करतात आणि मला अभिमान आहे मी भंगारवाला असल्याचा.  पण नवाब मलिकांचा हा प्रवास काही साधासोपा मुळीच नव्हता. मंत्रीपदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांच्या याच प्रवासाबद्दल आज आपण जाणू घेणार आहोत. 

-  मलिक कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातलं 

नवाब मलिक यांचे कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशातले. तिथे शेतीसह त्यांचे इतर व्यवसायही होते. आर्थिक स्थितीही ठिक होती.  नवाब मलिक यांच्या जन्मापुर्वीच त्यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक मुंबईत स्थायिक झाले. मलिकांचा जन्म त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजे युपीतील बलरामपूर जिल्ह्यातील दुसवा गावात 20 जून 1959 रोजी झाला. त्यानंतर मलिक कुटुंब पुन्हा मुंबईला आलं. मुंबईच्या डोंगरी परिसरात वास्तव्यास असलेल्या मलिकांचे छोट्या मोठ्या व्यसायासह भंगारचा व्यवसायही होता. नबाव मलिक २१ वर्षांचे असताना 1980 साली त्यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर, निलोफर आणि सना अशी चार अपत्ये आहेत.

- विद्यार्थी आंदोलनातून राजकारणात एंट्री 

डोंगरी परिसरातील एका इस्लामी शाळेत त्यांनी अकरावी पर्यत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर बुऱ्हाणी कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. त्याच महाविद्यालयात त्यांनी बी ए साठी प्रवेश घेतला,  पण कौटुंबिक कारणामुळे त्यांना बी ए च्या अंतिम वर्षांची परिक्षा देता आली नाही. मुंबई विद्यापीठात शिकताना विद्यापीठाने फी वाढवली होती. त्याविरोधात झालेल्या आंदोलनात मलिकांनीही सहभाग घेतला होता. पण या आंदोलनात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ते जखमी झाले. याच काळात ते कॉंग्रेसच्या सभांना हजेरी लावू लागले. 

1982-83 दरम्यान संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी मनेका यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला होता. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी अपक्ष म्हणून संजय विचार मंचाकडून  निवडणूक लढवली. मात्र या निवडणूकीतही त्यांचा पराभव झाला. त्या निवडणूकीत त्यांना फक्त 2620 मतं मिळाली.  हा सर्व घटनाक्रम पाहता राजकारणात काम करायचं असेल, तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, याची खात्री त्यांना पटली होती. पुढे नवाब मलिक काँग्रेसमध्ये काम करू लागले.  1991 च्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी कॉंग्रेसकडे तिकीट मागितलं. पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. 

- समाजवादी पक्षात  प्रवेश

1993 च्या बाबरी मशिद प्रकरणानंतर राज्यात समाजवादी पक्षाचे वारे वाहू लागले होते. त्यात त्यांनी समाजवादी पक्षाकडुन काम सुरु केलं. विशेष म्हणजे 1995 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने मुस्लीम बहुल नेहरूनगर मतदारसंघाचं मलिकांना तिकीट दिलं. त्यावेळीही शिवसेनेच्या सूर्यकांत महाडिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या आरोपाखाली महाडिकांच्या विरोधात  न्यायालयात याचिका खटला दाखल करण्यात आला. न्यायालयात महाडिक दोषी आढळल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली. त्यामुळे नेहरूनगर मतदारसंघात 1996 मध्ये झालेल्या फेरनिव़डणूकीत नवाब मलिकांचा साडेसहा हजारांच्या फरकाने विजय झाला. 

- राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा

1999 साली विधानसभा निवडणुका लागल्या. या निवडणूकांमध्येही नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून विजय मिळवला. राज्यात काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच आघाडी सरकार सत्तेत आलं. समाजवादी पक्षाने आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यावेळी  समाजवादी पक्षालाही सत्तेत वाटा देण्यात आला होता. आघाडी सरकारमध्ये नवाब मलिकांना गृहनिर्माण राज्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला. पण त्याच काळात मलिक यांचे समाजवादी पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद टोकाला गेले. अखेर मलिक यांनी मंत्रिपदावर असतानाच समाजवादी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय या खात्यांचा कारभार सांभाळला.  काही राजकीय जाणकारांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेल्या मोजक्याच मुस्लीम चेहऱ्यांपैकी नवाब मलिक हे आघाडीवर होते. त्यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणूनच मलिक यांची ओळख निर्माण झाली. 

- अण्णा हजारेंच्या आरोपानंतर राजीनामा

 २००६ मध्ये माहीमच्या जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्प गैरव्यवहार प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांनतर नवाब मलिकांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला. मात्र या प्रकरणात न्यायालयाने या प्रकरणात नवाब मलिकांना निर्दोष मुक्त केले (राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय उचित असल्याचा निर्णय घेतला.) त्यानंतर नवाब मलिक यांना पुन्हा 2008 मध्ये मंत्रिपदावर घेण्यात आलं होतं.

- आर्यन खान प्रकरणात नवाब मलिकांच्या आक्रमकतचे कारण

 आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी खूपच आक्रमक भुमिका घेत समीर वानखेडेंना विरोध केला. पण नवाब मलिक एनसीबीवर सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. 9 जानेवारी 2021 ला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी गांजा प्रकरणात मलिकांचे जावई  समीर खान यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. या प्रकरणात समीर खान यांच्यासह आणखी  चार आरोपींना या अटक केली. समीर खान हे  नवाब मलिकांची  ज्येष्ठ कन्या निलोफर  यांचे पती आहेत.  या प्रकरणात एनसीबीने समीर खान यांना ड्रग्जची तस्करी आणि पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी महिन्यात अटक केली. त्यानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर  समीर खान यांना 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालायाने जामीन मंजूर केला. 

- महापालिका निवडणूकांसाठी नवाब मलिक अॅक्टिव्ह मोडमध्ये

दरम्यान राज्यात महापालिकां निवडणूकांना काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणूंकांच्या पार्श्वभुमीवर नवाब मलिक अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याच सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.  मलिक यांच्याकडे मुंबईचं शहराध्यक्षपद असल्याने  आगामी  महापालिका निवडणकीत फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT