Uddhav Thackeray, Aditya Thackeray News  Sarkarnama
विश्लेषण

Shivsena News : राऊत 18 जागा लढवणार म्हणतात; ठाकरेंनाही सहानुभूती, पण स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार मिळणार का?

MahaVikas Aghadi News : चांगले उमेदवार नसतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुरघोडी करण्याची शक्यता आहे.

Amol Jaybhaye

Uddhav Thackeray News : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या 18 जागा लढवणार असे शिवसेना ठाकरे गट म्हणतो. त्याच पद्धतीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शिवसेनेत फुट पडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार गेले आहेत. शिवसेनेतील फुटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाला सहानुभूतीही मिळाली. परंतु फूट झालेल्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व विकसित करण्यास ठाकरे गटाला फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक मतदारसंघात पर्यायी नेतृत्व कोणाकडे द्यावे याची चाचपणी केली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ही प्रक्रिया कमालीची संथ आहे. ठाकरे गटांच्या सभा मध्यतंरीच्या काळात दणदणीत झाल्या. पण त्यानंतर स्थानिक पातळीवर आंदोलने उभी राहताना दिसत नाहीत.

नाशिकमध्ये अद्वैय हिरे, विदर्भात संजय देशमुख, कोकणात संजय कदम, स्नेहलता जगताप, यांचे आणि इतर काही प्रवेश झाले. मात्र, त्या पलिकडे फारसे काम झालेले दिसत नाही. ठाकरेंच्या सभाही झाल्या. मात्र, स्थानिक पातळीवर तगडे उमेदवार दिल्याशिवाय 18 खासदारांपर्यंत पोहचणे अवघड आहे. ठाकरे गटाकडे सध्या सहा खासदार आहेत. त्यांची मतदारसंघावर पकड चांगली आहे. पण इतर ठिकाणचे काय? असा मोठा प्रश्न तयार झाला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाबाबत ग्रामीण भागात सहानुभूती असली तरी पक्ष संघटनाही बळकट करावी लागणार आहे. मात्र, या सहानुभूतीतून स्थानिक पातळीवर नेतृत्व होण्याची प्रक्रिया कमालीची संथ आहे. लोकसभेला अनेक मतदारसंघात तगडे उमेदवार सध्या दिसत नाही. ठाकरे गट म्हणतो कुणीही सामान्य माणूस लढेल. परंतू वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्याच पक्षांनी सुरु केली आहे. भाजपाचे (BJP) केंद्रीय मंत्री दौरे करत आहेत. त्यांचा धडाका सुरुच आहे.

आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आणि काँग्रेसने आपल्या बैठकीमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. संभाव्य उमेदवारांचीही चाचपणी केली आहे. मात्र, ठाकरे गट फक्त मुंबईमध्येच अडकताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या वतीने आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वतीने प्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वत: सभा घेतल्या. मात्र, आता स्थानिक पातळीवर संघटनेला बळ देण्याची गरज आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये तगडे उमेदवारही शोधावे लागणार आहेत.

मतदारसंघात स्थानिक पातळीवर नेतृत्व विकासाकडे उद्धव ठाकरे गटाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी केवळ उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सभांवर पुन्हा किती संघटन उभे राहील यावर प्रश्नचिन्ह आहेत. पुन्हा आपल्या 18 जागा निवडून आणायच्या असतील तर सक्षम उमेदवारही द्यावे लागतील. तरच संजय राऊत यांच्या दाव्याला बळ मिळेल. चांगले उमेदवार नसतील तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुरघोडी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेते (Shivsena) फूट पडून 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे या 13 खासदारांच्या जागेवर मेरीटनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे. विद्यमान असलेल्या खासदारांच्या जागा त्याच पक्षाला सोडण्यात येईल, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडून येणारे उमेदवार ठाकरेंना शोधावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT