Nitin Gadkari, Nana Patole News
Nitin Gadkari, Nana Patole News Sarkarnama
विश्लेषण

Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

Atul Mehere

Nagpur LokSabha Constituency News : पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावेळी कोणत्या पक्षांकडून कोण-कोण उमेदवार असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. २०१४ मध्ये कॉंग्रेसचे चार वेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांचा पराभर करीत भाजपचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) नागपूरचे खासदार झाले.

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही गडकरींनी कॉंग्रेसचे (congress) उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा पराभव करीत खासदारकी कायम राखली. आता २०२४ चे ठोकताळे लावले जात आहेत. कॉंग्रेसकडे सध्या तरी नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त दुसरा चेहरा दिसत नाही. लोकसभेत पराभूत झाले तर भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून ते लढणार, हे जवळपास निश्‍चित आहे. भाजपमध्ये नितीन गडकरींना पर्याय सध्यातरी दिसत नाही.

गडकरींनी निवृत्तीचे संकेत दिल्याचे त्यांच्या नागपुरातील भाषणावरून वाटत आहे. पण त्यांची निवृत्ती ते स्वतःच ठरवतील, असे वाटत नाही. पक्षाने आदेश दिल्यास त्यांना लढावेच लागेल आणि २०२४ मध्ये कुठल्याही परिस्थितीत सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, हे भाजपचे पक्के ठरवलेले आहे. २०१९ मध्ये ज्या जागा हातच्या गेल्या, त्या खेचून आणण्याची रणनीती भाजपने (BJP) आखली आहे. त्यामुळे नितीन गडकरींना बदलवण्याची जोखीम भाजप पत्करणार नाही.

गडकरी न लढल्यास कोण?

नितीन गडकरींनी स्वतः निवृत्ती घोषित केली. तर नवीन उमेदवार कोण, हा मोठा प्रश्‍न आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना पक्षातर्फे पुढे केले जाऊ शकते. जरी फडणवीसांची राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा नसली, तरीही आदेश आल्यावर तेसुद्धा ते मान्य करतील. याचे ताजे उदाहरण एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ घ्यावी लागली. फडणवीस जर उमेदवार म्हणून निश्‍चित झाले नाही, तर मग भाजपला ओबीसी चेहऱ्याचा शोध असणार आहे.

कोण असेल भाजपचा ओबीसी चेहरा?

देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक लढल्यास अडचण निर्माण होऊ शकते, असा एक कयास लावला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपला ओबीसी चेहरा पुढे करावा लागणार. अशा वेळी शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचे नाव पुढे येऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. कारण प्रवीण दटके तळागाळातून आलेले आहेत. नगरसेवक, महापौर ते विधानपरिषद सदस्य असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे गडकरी, फडणवीस यांच्यानंतर भाजपने दटकेंचा विचार केल्यास नवल वाटायला नको.

काय म्हणाले गडकरी?

नागपुरात बोलताना गडकरींनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले, राजनीती म्हणजे लोकनिति, धर्मनीती, पण राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीती म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे. नंतर आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही त्यांनी महत्वाचे विधान केले. गडकरी म्हणाले. मी आता लोकांनाही सांगतो तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. माझ्याजागी दुसरा कोणीतरी नवीन येईल.

निवृत्तीचे संकेत..

गडकरींचे वरील वक्तव्य त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत देत आहे. दुसरीकडे त्यांची तिकीट कापली जाईल, असेही काही जण सांगतात. यामध्ये गडकरी स्वतः निवृत्ती घेऊ इच्छितात की त्यांची उमेदवारी कापण्याचे प्रयत्न होत आहेत, हे नेमकं कळायला मार्ग नाही. पण कार्यशैलीच्या बाबतीत बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी सारखेच आहेत. 'बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर', असा दोघांचाही बाणा आहे. तेव्हाच तर 'अधिकाऱ्यांना ठोकून काढा...', अशासारखे वक्तव्य गडकरी बिनधास्त करतात. 'पटलं तर मत द्या, नाही तर देऊ नका', असं बोलण्याचं धाडसही गडकरीच करू शकतात आणि त्यांनी ते केले.

प्रकृतीची समस्या..

मागील काही काळापासून प्रकृतीची समस्या गडकरींना भेडसावते आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा त्यांना जाहीर कार्यक्रमात मंचावर चक्कर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सेवानिवृत्ती घेतील, असे भाजपच्या गोटातील काही लोकांना वाटते. मात्र, प्रकृतीवर मात करून त्यांनी २०२४ ची निवडणूक लढावी, असा आग्रह त्यांना संघाच्या ज्येष्ठ मंडळींनी केल्याची माहिती आहे. कारण संघालाही २०२४ च्या निवडणुकीत कुठलाही धोका पत्करायचा नाही आण नवीन प्रयोग करायचा नाही. त्यामुळे गडकरी निश्‍चितपणे लढतील, असे संघाच्या गोटातून कळते.

...तर कॉंग्रेसचा उमेदवार देईल भाजपला टक्कर!

गडकरींच्या समोर कॉंग्रेस किंवा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र मिळून लढली तरी, नाना पटोले यांच्याशिवाय दुसरा चेहरा सध्यातरी दिसत नाहीये. २०१९ च्या निवडणुकीत नाना पटोलेंनी अगदी वेळेवर उमेदवारी मिळूनही तब्बल ४ लाख ४४ हजार २०१२ मते घेतली होती. गडकरींनी ६ लाख ६० हजार २२१ मते घेत विजय मिळविला. बसपाचे मोहम्मद जमाल यांनी ३१ हजार मते घेतली होती. थोडी लवकर तयारी केली असती तर नाना विजयाच्या जवळ पोहोचू शकले असते, असे तेव्हा बोलले गेले. पण वेळेपर्यंत उमेदवार द्यायचा नाही, ही कॉंग्रेसची पद्धत आहे. यावेळी जर कॉंग्रेसने पद्धत बदलविली तर कॉंग्रेसचा उमेदवार नितीन गडकरींना टक्कर देऊ शकेल, असे वाटते.

नागपूरमध्ये गडकरींनी त्यांच्या दोन टर्ममध्ये अनेक कामे केले आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे. नागपूर मेट्रो असेल, उड्डाण पूल, सिमेंट रस्ते आदी कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. जात, पात, धर्म, पंथ काहीही न पाहता काम करणारा नेता म्हणून गडकरींची ओळख आहे. तेव्हाच ते 'मत द्यायचे असेल तर द्या, नाहीतर नका देऊ', असं बिनधास्त म्हणतात. एकंदरीत विचार केला असता आजघडीला तरी नितीन गडकरींचे पारडे जड वाटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT