Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News Sarkarnama
विश्लेषण

आंबेडकरांच्या मदतीने ठाकरेंचा मुंबईत भाजप-शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न; वंचितच्या युतीने गणिते बदलतील

अमोल जायभाये

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी एखाच व्यासपीठावर आले होते. त्यावरुन आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम यांनी युती झाली होती. मात्र, पुढे ही युती काही टिकली नाही. आता पुन्हा एकदा आंबेडकर आणि ठाकरे यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. रविवारच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आमच्या मध्यंतरी अनेक बैठका झाल्या आहेत. आमचे वैचारीक व्यासपीठ एकच असल्याने आम्हाला एका व्यासपीठावर एकत्र येण्यासाठी अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्यामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग होणार असल्याचे मानले जात आहे. सर्व जाती धर्माची मोट बांधत आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएममध्ये युती झाली होती. त्याचे परिणाम संपूर्ण महराष्ट्राने पाहिले. या युतीने औरंगाबादमधून जलील यांच्या रूपाने खासदार निवडून दिला. मात्र ही युती फारकाळ टिकली नाही.

उद्धव ठाकरे यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन लढणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्या आधीही प्रकाश आंबेडकर यांनीही एकत्र येण्याविषयी भाष्य केले होते. शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मित्र पक्षांची गरज आहे. तर एमआयएम सोबत नसल्यामुळे वंचितलाही नवीन मित्रांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येत महा आघाडी निर्माण करुन भाजपला जोरदार लढत देण्याचा विचार होऊ शकतो. वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यास राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.

वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) सात ठिकाणी फटका बसला. इम्तियाज जलील यांच्या रूपाने वंचितचा एक उमेदवार निवडूनही आला. 10-12 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत. मात्र 2019 महाराष्ट्र विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने 236 जागा लढवल्या. त्यापैकी त्यांना एकाही जागेवर विजय मिळाला नाही.

तरीही वंचितला 25 लाख 18 हजार 748 मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या 4.57% टक्के वंचितने घेतली होती. तर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यावर याचा फायदा लोकसभेच्या 38 मतदारसंघात होईल असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

युती झाल्यास मुंबईतील गणीत बदलेल

२०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झालेली नव्हती. आंबेडकरांच्या भारीपने महानगरपालिका निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. परंतु त्यांनी घेतलेली मते ४ ते ५ टक्यांच्या जवळपास आहेत. वंचितच्या प्रयोगानंतर आंबेडकर यांनी अनेक समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते, असे राजकीय जाणकार सांगतात.

वंचित आणि शिवसेनेची युती झाली तर ती मुंबई महानगरपालिकेपासून होईल, असे सांगण्यात येते, मात्र यात कितपत यश मिळणार याचा अंदाज दोन्ही पक्षांकडून घेतला जाईल. विशेष म्हणजे पूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. आता उद्धव ठाकरे देखील याच मार्गाची चाचपणी करत आहेत. मुंबई महापालिका शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. त्यातच पक्षात फुट पडल्यानंतर आणि शिंदे गट वेगळा झाल्यामुळे ठाकरेंपुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

त्यातच भाजपने त्यांना घेरण्याची तयारी केली आहे. मनसेही वेगळी लढणार असल्याने मराठी मतांमध्ये फुट पडून ५०० ते १००० मतांच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. त्यामुळे ही मते भरून काढण्यासाठी वंचितचा चांगला उपयोग शिवसेनेला होऊ शकतो. अनेक वॉर्डांमध्ये वंचितचे निर्णायक मतदान आहे. ही युती होणार का आणि त्याला किती यश मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT