Pankaja Munde and Dhananjay Munde Sarkarnama
विश्लेषण

Vaidyanath Sugar Factory : अडचणीतल्या बहिणीलाही मदत अन् स्वत:च्या राजकीय बळकटीकरणालाही...

Datta Deshmukh

Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या मालमत्तांवर बँका आणि जीएसटी विभागाने जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. यानंतर कारखान्यासाठी मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना मदत करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी एखाद्या कंपनीच्या मार्फत कारखाना भाडेतत्वावर घेतला तर अडचणीत सापडलेल्या बहिणीला मदत होईल आणि भविष्यात त्यांच्या राजकारणालाही बळकटी मिळू शकते. त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी तशी ही आयती संधीच चालून आली, असेच म्हणावे लागेल.

राजकारणात सहकारी साखर कारखाना हा महत्वाचा भाग मानला जातो. आर्थिक चक्र फिरण्यासह कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार बांधून राहतात. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची राजकीय इमारत साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच अनेक वर्षे डौलात उभी होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम ही बाब शोधली आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन वैद्यनाथ समूहात २० पेक्षा जास्त कारखान्याची शृंखला उभारली.

मात्र, गेल्या काही वर्षांत दुष्काळामुळे कारखाना अडचणीत आला. परिणामी कारखान्यांकडील कर्ज थकल्याने त्यावरील व्याजाचे आकडे कोट्यावधींनी वाढले. त्यामुळे विविध बँकांसह आता सरकारी यंत्रणांनीही कारखान्याकडील आर्थिक रकमेसाठी थेट जप्तीच्या नोटीसा धाडल्या आहेत. सध्या जीएसटी विभागाच्या जप्तीच्या नोटीसीचे प्रकरण चर्चेत आहे.

केंद्रीय सहकार विभागाने राज्यातील अडचणीत असलेल्या कारखान्यांना प्रत्येकी १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कर्जाऊ मदत केली. पण यात पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे नाव टळले. ही बाब पंकजा मुंडे यांनीही थेट बोलून दाखविली आहे.

जर केंद्राकडून मदत मिळाली असती तर अडचणीत आलेल्या वैद्यनाथ कारखान्याला मोठा हातभार लागला असता व इतर यंत्रणा व संस्थांच्या रकमा देता आल्या असत्या. तसेच कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण बँकांचे उंबरठे झिजवत असल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

आता या वैद्यनाथ कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांचे बंधू कृषीमंत्री धनंजय मुंडे हे मदत करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, असे घडणे धनंजय मुंडे यांच्यासाठी हिताचेच असल्याचे बोलले जात आहे. तर ही बाब पंकजा मुंडेंसाठी देखील हिताची ठरु शकते. अलिकडच्या काळात या दोन्ही भावंडांतील संबंध काहीसे सुधारल्याचे चित्र आहे.

धनंजय मुंडे यांचे राजकीय बस्तान सध्या पक्के होत असले तरी त्यांच्या हाती इतर नेत्यांप्रमाणे महत्वाच्या संस्था नाहीत. त्यांनी धारुर तालुक्यात कारखाना हाती घेतला. मात्र, त्याला मुर्तरुप आलेले नाही. त्यांनी एका कंपनीमार्फत अंबा सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला आहे. याचाही काही भाग परळी मतदारसंघात येतो.

पण आता वैद्यनाथ कारखानाही त्यांनी घेतला तर परळी मतदारसंघ पूर्ण कव्हर होतो. त्यामुळे भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीत ही मोठी उपलब्धी ठरु शकते. तर या निमित्ताने अडचणीतील बहिणीलाही मोठी मदत होऊ शकते. धनंजय मुंडे यांचे व्यवस्थापन फार पक्के असल्यामुळे ते कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू शकतात. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठी मदत होऊ शकते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT