Abdul Sattar on Raosaheb Danve  Sarkarnama
विश्लेषण

Abdul Sattar Vs BJP : हा संघर्ष सत्तार नव्हे, शिंदे गट विरुद्ध भाजप! ; महायुतीत लागलेली ही आग कोण विझवणार?

अय्यूब कादरी

Mahayuti Shivsena and bjp Politics News : कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे महायुतीला काही वेळेस अडचणींचा सामना करावा लागला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेल्या विधानामुळे सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठली होती, महायुतीला बॅकफूटवर जावे लागले होते. कृषी विभागातील काही गैरप्रकारांमुळे त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर सत्तार यांच्यामुळेच नवाच वाद निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपचे उमेदवार होते. सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी दानवे यांचा पराभव केला. दानवे यांच्यासह भाजपसाठी हा मोठा धक्का होता. सत्तार हे शिंदे गटात आहेत. सत्तार यांनी कल्याण काळे यांना मदत केली, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. सत्तार यांनीही ते उघडपणे मान्य केले होते. त्यावरून मोठे वादंग झाले होते. सत्तार यांच्यामुळे निर्माण झालेला नवा वाद हा आहे. हा संघर्ष सत्तार विरुद्ध भाजप असा तर आहेच, शिवाय तो शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असाही आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

महायुतीमध्ये असे अनेक वाद निर्माण होत आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यामुळे महायुती आधीच बॅकफूटवर गेली आहे. त्यातच महायुतीतील अंतर्गत कलह असा वारंवार उफाळून येत आहे. सत्तार विरुद्ध भाजप हा संघर्ष कमी होण्याचे नाव घेत नाही. हा वाद शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे. दानवे म्हणतात तसे सत्तार यांनी काँग्रेसच्या काळे यांना मदत केली असेल तर प्रकरण गंभीर आहे. पक्षप्रमुखांना, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून सत्तार काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करू शकतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची गरज आहे.

काळे यांना मदत केल्याची सत्तार यांनी कबुली दिली आणि त्यानंतर सत्तार विरुद्ध भाजप हा संघर्ष वरचेवर अधिकच पेटत चालला आहे. दानवे यांनी सत्तार यांच्याविरोधात रान पेटवले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड बंदची हाक दिली होती, मात्र व्यापाऱ्यांचा विचार करून ते आंदोलन नंतर मागे घेण्यात आले होते. दानवे यांच्या नेतृत्वाखाली अजिंठा येथे रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी दानवे यांनी, अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, अशी विखारी टीका केली होती. सिल्लोड मतदारसंघातील शिवना गावात एका कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाला होता. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, याच्या निषेधार्थ अजिंठा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. दानवे यांनी सिल्लोडला पाकिस्तान म्हटल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. सर्वसामान्य सिल्लोडकरांनी हा मोर्चा होता, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र या मोर्चात सत्तार यांचे समर्थकांचाच मोठा सहभाग होता, हे लपून राहिले नव्हते. असे असले तरी सत्तार विरुद्ध भाजप संघर्षातील ही पुढची खेळी ठरली. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही सिल्लोडमध्ये मोर्चा काढला होता. यामध्ये हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा सहभाग होता.

मूळचे काँग्रसेचे सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झालेले आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटीला गेले. त्यानंतर स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात आणि दानवे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. दानवे यांना पाडण्यासाठी आपण कल्याण काळे यांना मदत केली, असे सत्तार यांनी जाहीरपणे सांगितले होते.

सत्तारांच्या मतदरासंघातून दानवे हे 25 हजार मतांनी पिछाडीवर राहिले होते. पक्षप्रमुखांना कल्पना दिल्याशिवाय सत्तार यांनी काँग्रेसला मदत केली असेल का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हा संघर्ष सत्तार विरुद्ध भाजप असा तर आहेच, शिवाय तो शिंदे गट विरुद्ध भाजप असाही आहे. वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतात की सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवूनच हा वाद मिटवला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT