BJP Politics : विद्यमान आमदारांना घरी बसवण्याचा गुजरात पॅटर्न भाजपच्या अंगलट येणार?

BJP to implement Gujarat pattern in Maharashtra : भाजपला गुजरात पॅटर्नचे फार कौतुक असते. गुजरातेत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जवळपास 50 आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचे संकेत दिले जात आहेत.
Amit Shah, Narendra Modi, Devendra Fadnavis
Amit Shah, Narendra Modi, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP News : 'गुजरात पॅटर्न' हा शब्द कानावर पडला की महाराष्ट्रातील बहुतांश लोक नाक मुरडतात. या दोन शब्दांतून एकाधिकारशाहीचा वास येतो. त्याच दोन शब्दांनी आता महाराष्ट्रातील खुद्द भाजपच्याच आमदारांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.

त्यावेळी त्यांनी उमेदवारी देताना गुजरात पॅटर्न राबवण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे. 2019 मध्ये लोकसभेच्या 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024 मध्ये केवळ नऊ जागा मिळाल्या. पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या चुका त्यासाठी कारणीभूत ठरल्या.

लोकसभेच्या (Lok Sabha) निकालामुळे आमदारांचीही चिंता वाढलेली आहे. त्यात आता गुजरात पॅटर्नने भर घातली आहे. ज्या आमदारांचे काम समाधानकारक नाही, त्या आमदारांना उमेदवारी मिळणार नाही, हा आहे गुजरात पॅटर्न. महाराष्ट्रात असे जवळपास 50 आमदार आहेत, असे सांगितले जात आहे. ही संख्या भाजपच्या एकूण आमदारांच्या जवळपास निम्मी आहे. गुजरातेत भाजप स्वबळावर सत्तेत आहे.

उमेदवारी नाकारली तरी आमदारांना तेथे फार पर्याय उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. भाजपने (BJP) दोन पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत एकूण सहा पक्ष सामावलेले आहेत. भाजपने उमेदवारी नाकारली तर संबंधित आमदाराला अन्य पक्षांचा पर्याय उपलब्ध आहे. भाजपने उमेदवारी नाकारली तर ते महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवू शकतात.

Amit Shah, Narendra Modi, Devendra Fadnavis
Mahayuti Politics Video: भाजपची माघार नाहीच, एकनाथ शिंदेंना फक्त 70 जागा?

गुजरात (Gujarat) पॅटर्न राबवताना भाजपने हा मूलभूत फरक लक्षात घ्यायला हवा. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जवळपास 50 आमदारांना उमेदवारी नाकारली होती, हाच तो गुजरात पॅटर्न. हा पॅटर्न महाराष्ट्रात चालेल का, म्हणजे 50 आमदारांची उमेदवारी कापली तर ते शांत बसतील का, असा प्रश्न आहे. महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे भाजप आमदारांचा श्वास आधीच कोंडलेला आहे.

सत्ता असूनही आपल्या पदरी फारसे काही पडले नाही, अशी भावना आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यातच पुन्हा 50 आमदारांना घरी बसवले तर असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात नेत्यांची इनकमिंग वाढू लागली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी 40 आमदार महायुतीत भाजपसोबत गेले आहेत.

त्यामुळे निवडणूक जिंकू शकणाऱ्या नेत्यांचे या पक्षांना इनकमिंग हवेच असणार. भाजपने गुजरात पॅटर्न राबवायच्या आधी ही बाब विचारात घेतली असेल का, हा प्रश्न आहे. ही बाब विचारात घेतली नसेल तर गुजरात पॅटर्न राबवणे भाजपला महागात पडू शकते. जागावाटपाचा तिढा कधी संपणार, हा महायुतीसमोरील मोठा पेच आहे. भाजपचे 105 आमदार आहेत. भाजप 160 जागा घेणार असल्याची चर्चा आहे.

Amit Shah, Narendra Modi, Devendra Fadnavis
Bjp Attack on Congress : ...म्हणून विधानसभेसाठी काँग्रेसच्या बदनामीची भाजपची आहे रणनीती

तसे झाले तर 105 पैकी 50 आमदारांना गुजरात पॅटर्ननुसार घरी बसावे लागणार आहे आणि भाजपला जवळपास 105 नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. उमेदवार मिळणार नाहीत, असे म्हणता येणार नाही, मात्र ज्या आमदारांना तिकिटे नाकारली ते शांत बसणार का, हे सांगता येत नाही. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवार ठरवताना भाजपची दमछाक होणार, हे निश्चित मानले जात आहे.

निवडणुकीसाठी भाजप सूक्ष्म नियोजन करतो, त्याचा खूप गवगवा केला जातो. पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, वॉरियर अशा अनेक संकल्पना भाजपकडून राबवल्या जातात. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची ही सगळी मिथके गळून पडली आहेत. महाविकास आघाडीला उमेदवार मिळतील की नाही, अशी अवस्था असताना महायुतीकडे सर्व शक्ती एकवटलेली दिसत होती. अशाही परिस्थितीत महााविकास आघाडीने बाजी मारली.

महायुतीच्या पदरी घोर निराशा आली. भाजपकडून गवगवा केल्या जाणाऱ्या संकल्पना कुठेही काम करताना दिसल्या नाहीत. अशा परिस्थितीत आता गुजरात पॅटर्न राबवण्याचा विचार भाजपमध्ये सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून अजून पुरते न सावरलेल्या भाजप आमदारांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविषयी नाराजी दिसत आहेत. अंतर्गत कुरघोड्याही सुरू झालेल्या आहेत. मुख्यमंत्रिपदावरूनही वादविवाद सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीत उमेदवार ठरवताना भाजपने गुजरात पॅटर्न राबवण्याचे निश्चित केले तर ते अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com