Pankaja Munde gopinath Munde dhananjay Munde Sarkarnama
विश्लेषण

Munde Family : मुंडेंच्या परळीत यंदा 'कमळ'च नाही राव!

Sandeep Chavan

आधीचा रेणापूर म्हणजेच आता परळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात ज्यांनी कमळ रुजवलं, फुलवलं, वाढवलं त्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसांनी यंदा पहिल्यांदाच या कमळ चिन्हाला परळी विधानसभेच्या निवडणुकीतून घालवलं. त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंना ते म्हणावं तसं खुलवता आलं नाही तर पुतणे धनंजय मुंडेंना त्याला सांभाळता आलं नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच म्हणजे 2024 च्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्यातील उमेदवार दिसतील पण कमळ मात्र दिसणार नाही.

परळीत 44 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच कमळ नसणार!

आताचा परळी विधानसभा मतदारसंघ पूर्वी रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. भाजपच्या स्थापनेनंतर 1980 साली गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. 1980 मध्ये त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. मग मात्र 1980 पासून 2019 पर्यंत परळी विधानसभा म्हटलं की मुंडे आणि मुंडे म्हटलं की कमळ, असं समीकरणच बनलं. मात्र आता तब्बल 44 वर्षांनी परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हावर मुंडे घराण्यातील कुणी उमेदवार लढण्याची शक्यता दिसत नाही. पंकजा मुंडे (Pankaja Munde) विधान परिषदेवर गेल्यानं त्या विधानसभेत उतरणार नाहीत आणि धनंजय मुंडेंनी घड्याळ हाती बांधल्यानं ते कमळावर लढताना दिसणार नाहीत.

मुंडे घराणं नि कमळाच्या नात्याची 'फुललेली' कहाणी...

परळीत 1980 पासून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणारे गोपीनाथ मुंडे एकदाच पराभूत झाले. 1985 मध्ये काँग्रेसच्या पंडित अण्णा दौंड यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र 1990, 1995, 1999 आणि 2004 अशा सलग चारही निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी परळीत कमळ रुजवलं, फुलवलं, वाढवलं. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) बीडमधून लोकसभेवर गेल्यानंतर ज्यांच्या नावातूनच कमळाचा अर्थबोध होतो त्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या हाती परळीचा धुरा देण्यात आली.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या नावाचा अर्थ सार्थ ठरवत परळीत कमळ फुलवलं. 2013 मध्ये त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी कमळाची साथ सोडत हाती घड्याळ बांधलं. पुढं 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही बहीण-भावात लढत झाली मात्र पंकजा मुंडेंनी भावाला पराभूत करत परळीत पुन्हा एकदा कमळ फुलवलं. पुढं 2019 मध्ये पुन्हा एकदा हे बहीण-भाऊ आमनेसामने उभे ठाकले पण यावेळी परळीकरांनी कमळाला नाकारलं. 1985 नंतर सलग 34 वर्षे परळीत फुलणारं कमळ 2019 मध्ये कोमेजलं आणि परळीत घड्याळाची टिकटिक सुरू झाली...

2024 ला परळीची विधानसभा कमळाविना!

2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झाले. विशेष म्हणजे आपले काका म्हणजेच गोपीनाथ मुंडेंकडून राजकीय बाळकडू घेतलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भाजपात असेपर्यंत कमळ चिन्हावर एकदाही परळी विधानसभा लढण्याची संधी मिळाली नाही आणि पुढं त्यांनी पक्षच बदलल्यानं परळीतून कमळावर लढण्याचा प्रश्नच मिटला. आता 2024 ची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे पण परळी विधानसभेत मुंडे घराण्याकडून कमळावर लढणारा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार हे जवळपास निश्चित आहे. पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्या आहेत तर विद्यमान आमदार धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत.

एकूणच काय तर तब्बल 44 वर्षांनी यंदा पहिल्यांदाच म्हणजे 2024 च्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्याचा उमेदवार दिसेल पण कमळ मात्र दिसणार नाही. थोडक्यात,

मुंडेंच्या परळीत यंदा 'कमळ'च नाही राव!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT