Chandrababu Naidu, Jagan Mohan Reddy Sarkarnama
विश्लेषण

Tirupati Laddu Controversy: चंद्राबाबूंचा आरोप; एक दिवसांचं मौन अन् रेड्डीभोवती संशयाचं जाळं

अय्यूब कादरी

Tirupati Laddu Controversy Case : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी, माशांचे तेल आढळल्याचा आरोप झाल्यानंतर वादंग उठले आहे. खुद्द आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनीच गुजरातेतील प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखल देत हा आरोप केला होता. त्यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना संशयाच्या घेऱ्यात उभे केले होते. त्यामुळे या प्रकरणात राजकारण पेटणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. ती आता खरी ठरत आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपांनंतर एक दिवस शांत राहिलेले माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी समोर आले. ते म्हणाले, की मुख्यमंत्री नायडू यांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिणार असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी महिती कशी ट्विस्ट केली, हे मी या पत्रांद्वारे पंतप्रधान आणि सरन्याधीशांना सांगणार आहे, असेही रेड्डी म्हणाले. तिरुमला तिरुपती देवस्थानला तुपाचा पुरवठा करण्यासाठी दर सहा महिन्यांनी निविदा प्रक्रिया केली जाते. यासाठीचे निकष अनेक दशकांपासून बदललेले नाहीत. पुरवठादारांना एनएबीएल प्रमाणपत्र सादर करावे लागते. उत्पादन दर्जेदार असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात निकृष्ट दर्जाची 18 उत्पादने रद्द केली होती.

दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री नायडू यांच्याशी संपर्क साधला आहे. या प्रकरणाचा अहवाल द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, आता कर्नाटकमधील नंदिनी ब्रँडकडून तूप खरेदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री नायडू यांनी घेतला आहे. एका व्यक्तीला लाभ व्हावा, यासाठी मुख्यमंत्री नायडू यांनी देवाचा वापर सुरू केला आहे. आपल्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री नायडू यांनी लाडूंमध्ये मांसाहारी घटक आढळ्याचा आरोप केला आहे. अहवालातील माहिती त्यांनी 'ट्विस्ट' करून सांगितल्याचा आरोपही जगनमोहन रेड्डी (Jagan Moha Reddy) यांनी केला आहे.

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक जातात. मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू मोठ्या भक्तिभावाने भाविक घेतात. या लाडूंना मोठे महत्त्व असते. तिरुपतीला जाऊन आलेल्या भाविकांनी या लाडूंचा प्रसाद गावात इतरांना दिला तर ते स्वीकारण्यासाठी लोक पायातली चप्पल काढून ठेवतात. यावरून हे लक्षात यावे की त्या प्रसादावर भाविकांची किती श्रद्धा असते. त्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी, माशांचे तेल आढळल्याच्या आरोपामुळे भाविकांना धक्का बसला होता. यावर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी काय प्रतिक्रिया देतात, याची लोकांना प्रतीक्षा लागली होती.

मागील सरकारमध्ये हा प्रकार घडल्याचे मुख्यमंत्री नायडू म्हणाले होते. रेड्डी यांनी नायडू यांचे आरोप फेटाळले आहेत. हा अहवाल जुलै महिन्यातील आहे, त्यावेळी नायडूच मुख्यमंत्री होते. भेसळ तुपाचा पुरवठा केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही तातडीने मुख्यमंत्री नायडू यांना त्याबाबत माहिती दिली होती, असे जगन रेड्डी यांनी सांगितले. एका डेअरीमधून या भेसळ तुपाचा पुरवठा केला जात होता, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

आंध्र प्रदेशातील लोक चंद्राबाबू नायडू यांच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा हिशेब मागू लागले आहेत, अशी टीका रेड्डी यांनी केली. निवडणुकीत नायडू यांनी दिलेल्या सुपर सिक्स, आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न जनता विचारत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नायडू यांनी तिरुपती बालाजीचा वापर सुरू केला आहे, असे रेड्डी म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांनी म्हणाल्या की, काल मुख्यमंत्री नायडू यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांचे सेलिब्रेशन केले. त्यावेळी त्यांनी अत्यंत सहजपणे मागील जगनमोहन रेड्डी यांचे सरकार लाडूत भेसळ करण्यात सामील असल्याचा आरोप केला.

हा कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा प्रश्न आहे. असे असतानाही नायडू यांनी ही गोष्ट इतक्या सहजतेने कशी काय सांगितली. काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT