मुंबई :‘‘एसटी अत्यावश्यक सेवेत नाही, असे काही जण चुकीचे सांगत आहेत. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा नियम कायद्यानुसार प्रवासी किंवा मालवाहतूक सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते, त्यामुळे मेस्मा कायदा एसटी कर्मचाऱ्यांना लागू शकतो. मेस्मा कायदा लावायचा का? यावर सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी बोलून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल,’’ असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. (Transport Minister Anil Parab warns of action against protesting ST workers under Mesma Act)
पगारवाढीनंतरही एसटीचे काही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर आंदोलन करत आहेत. त्याबाबत परिवहन मंत्री परब बोलत होते. ते म्हणाले की, सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेकायदेशीरपणे संप सुरू आहे. राज्य सरकारने प्रत्येक पायरीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जे म्हणणे आहे, ते त्यांनी मांडावे, वेगवेगळ्या संघटना आपले म्हणणे मांडत आहेत. त्यावरही चर्चा करण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे. विलिनीकरणावर जे कर्मचारी ठाम आहेत, त्यांना पुन्हा एकदा सांगतो की, तो मुद्दा कोर्टात आहे. विलिनीकरणाचा निकाल 12 आठवड्यांत येणार आहे. जो अहवाल येईल, तो मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
राज्य सरकारने अतिशय चांगली पगारवाढ दिली आहे. पण, ही पगारवाढ फसवी आहे, अशा बातम्या काही जण पसरवत आहेत. आम्ही पगारवाढीबाबत शासकीय निर्णयदेखील काढला आहे. जेव्हा तुम्हाला पगाराची स्लिप येईल, तेव्हा तर आम्ही फसवलेले नाही, हे तुम्हाला कळेल ना, असेही परब म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काही कर्मचाऱ्यांना वाटतं की 60 दिवस संप केला की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा लागतो. पण मी कामगारांना सांगतो अशी कोणतीही तरतूद नाही. बऱ्याच कामगारांना कामावर यायचे आहे. पण त्यांना रोखले जात आहे. काहीजण कामगारांना घरी जाऊन धमकवत आहेत. आम्ही या सर्वांवर लक्ष ठेवून आहोत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. जी कारवाई केली जाईल, ती आम्ही आता मागे घेणार नाही. आता या संपाचा नेता कुणी नाही. यात जर कुणी भडकवत असेल त्यांच्यावरदेखील कारवाई होईल. काही लोक कामगारांना अडवत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोवर हा संप मिटणार नाही. कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे, तो हळूहळू पूर्ण होत आहे, त्यानुसार कारवाई करण्यात येईल. आता कुणाचे नाव घेऊन कारवाई करणार नाही. पण जो भडकवत असेल, त्याच्यावर नक्कीच होईल, असेही परिवहनमंत्र्यांनी नमूद केले.
मी आज राज्यातील विविधी भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. कामावर येणाऱ्या एसटी कामगारांना अडवलं जात असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. कायद्याच्या भाषेत जी कठोर कारवाई असेल ती केली जाईल. आम्ही राज्य सरकार म्हणून ज्यांची ज्यांची मदत घ्यायची असेल त्यांची घेण्यात येईल. ॲक्शन प्लॅन सांगायचे नसतात, ते करायचे असतात. पण अजूनही आम्ही टोकाच्या भूमिककडे गेलेलो नाही. आज सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई आणखी कठोर होईल, असा इशाराही परब यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.