Solapur, 06 June : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकल्या, तर दोन जागांवर पराभव स्वीकारावा लागला. त्यात साताऱ्याची हक्काची जागा ही केवळ 32 हजारांनी गमावावी लागली. पवारांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्ह अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय ठरले होते. त्यातूनच चिन्हामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे साताऱ्यात घात झाल्याचे दिसून येत आहे. कारण तुतारीच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराने 37 हजार मते घेतली आहेत.
राज्यात चार ठिकाणी 40 हजारांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हासंदर्भात शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाला निर्णायक पाऊल उचलावे लागणार आहे. अन्यथा विधानसभा निवडणुका यापेक्षा कमी मताधिक्क्याच्या असतात. त्यात तुतारीमुळे (ट्रम्पेट) अनेक ठिकाणी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तुतारी (Tutari) वाजविणारा माणूस या चिन्हावर राज्यात दहा जागा लढवल्या आहेत. यातील वर्धा वगळता नऊ मतदारसंघात तुतारीवर उमेदवार उभे राहिले होते. राजकारणात एकमेकांना शह कटशह देण्यासाठी राजकीय पक्ष अशी पाऊले उचलत असतात. त्यानुसार पवारांचे उमेदवार ज्या मतदारसंघात उभे आहेत, अशा ठिकाणी तुतारीवर उमेदवार उभे होते. बारामतीतील (Baramati) उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, त्यावर आयोगाने चिन्ह बदलण्यास नकार दिला होता.
दिंडोरीत राष्ट्रवादीचे भास्कर भगरे एक लाख १३ हजार १९९ मतांनी निवडून आले आहेत. मात्र, तुतारी (ट्रम्पेट) चिन्ह असलेल्या बाबू भगरे नावाच्या उमेदवाराने चक्क एक लाख तीन हजार ६३२ मते घेतली आहेत. तुतारीतील साम्यामुळे भास्कर भगरे यांच्याकडे येऊ शकणारी ही मते अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्याकडे गेल्याचे मानले जात आहे.
साताऱ्यामध्ये तर या तुतारी चिन्हातील घोळामुळे शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. शिंदे हे ३२ हजार ७७१ मतांनी पराभूत झाले आहेत. मात्र, साताऱ्यात तुतारी चिन्हावर उभ्या असलेले उमेदवार संजय गाडे यांनी ३७ हजार ६२ मते मिळविली आहेत. हीच मते शिंदे यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे उघड आहे.
माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील हे १ लाख २० हजार ८३७ मताधिक्य घेऊन विजयी झाले असले तरी तुतारी चिन्हावर उभ्या असलेले उमेदवार रामचंद्र घुटुकडे यांनी ५८ हजार ४२१ मते घेतली आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांची ही मते कमी झाल्याचे स्पष्ट होते.
बीडमधून बजरंग सोनवणे हे ६ हजार ५३ मतांनी विजयी झाले आहेत. मात्र, मतदारसंघात तुतारीच्या चिन्हावर उभे असलेले अशोक थोरात या उमेदवाराने तब्बल ५४ हजार ८५० मते घेतली आहेत. त्यांनी आणखी थोडी जरी मते घेतली असती तर सोनवणे यांचेही शशिकांत शिंदे यांच्याप्रमाणे झाले असते. नगरमध्ये नीलेश लंके २८ हजार ९२९ मतांनी विजयी झाले. मात्र, तुतारी घेऊन निवडणूक लढवलेले गोरक्ष आळेकर या उमेदवाराने ४४ हजार ९५७ मते मिळविली आहेत.
भिवंडीतही संजय ऊर्फ बाळ्यामामा म्हेत्रे हे ६६ हजार १२१ मतांनी विजयी झाले आहेत. पण याच मतदारसंघात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या कांचन वखारे यांनी २४ हजार ६२५ मते घेतली आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे १ लाख ४० हजार ९५१ मतांनी विजयी झाले. पण याच मतदासंघातून मनोहर वाडेकर या तुतारीच्या उमेदवाराला २८ हजार ३३० मते पडली आहेत.
बारामतीमधून एक लाख ५८ हजार ३३३ मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या. मात्र, तुतारीच्या चिन्हावर लढणारे सोहेल शेख यांनी १४ हजार ९१७ मते मिळविली आहेत. रावेरमधून श्रीराम पाटील हे २ लाख ७२ हजार १३ मतांनी पराभूत झाले आहेत. मात्र, एकनाथ साळुंखे ह्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवाराने ४३ हजार ९८२ मते घेतली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.