या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची राजकीय जुगलबंदी रंगली sarkarnama
विश्लेषण

नारायण राणे त्या विमानात असल्याचे समजताच ठाकरेंनी दुसरे विमान मागवले...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राणेंसोबतच प्रवास टाळला

वैदेही काणेकर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील दुराव कायम असल्याचे चित्र चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात दिसून आले. दोघांनीही एकमेकांवर वाग्बाण सोडत राजकीय वाद संपला नसल्याचे दाखवून दिले. या सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनीही अनेक गोष्टींचा उलगडा केला. ते दोघे व्यासपीठावर होते तरी दोघांनीही संभाषण अजिबातच केले नाही.

या सोहळ्यानंतर `साम`शी बोलताना राणे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्व गोष्टी मी उघडपणे बोलू शकतो. खासदार विनायक राऊत यांचे नाव मी व्यासपीठावर घेतले. कारण त्यांचा माणूस दर महिन्याला कॉन्ट्रॅक्टरच्या दारात उभा राहतो. आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांचा हा कार्यक्रम होता. मात्र तो शिवसेनेने हायजॅक केला. विनायक राऊत या कार्यक्रमाचे कसे काय सूत्रसंचालन करत होते? कोण आहे तो?

मुंबईहून चिपीला अनेक नेेते विमानाने आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री देखील याच विमानाने येणार असल्याचे नियोजन होते. राणे यांचीही इच्छा ठाकरेंसोबत त्या विमानाने यायची होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी एका विमानात जाण्याचे टाळल्याचे राणेंनीच सांगितले.

राणे म्हणाले की मुख्यमंत्री विमानात असतील म्हणून मी दिल्लीवरून मुंबईची फ्लाईट पकडली. मात्र चिपीला येणाऱ्या विमानात मी असणार म्हणून मुख्यमंत्री खासगी विमानाने आले, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राणे आणि ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर फार वर्षांनी आले. त्याबद्दल विचारले असता आमच्या दोघांच्या खुर्चीमध्ये बरंच अंतर ठेवलं होतं, असे राणे यांनी सांगून टाकले. उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर असताना राणेंच्या कानात काही सांगितले. मात्र आपल्याला ते ऐकू आले नसल्याचे राणेंनी भाषणातच सांगून टाकले.

`साम`शी बोलताना राणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंना खोटे बोलणे आवडत नव्हते. विनायक राऊत हा उद्धव ठाकरे यांचा प्रमुख माणूस आहे आणि तो खूप जास्त खोटे बोलतो, अशा शब्दांत त्यांनी राऊतांविषयी संताप व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कोणावर अंकुश नाही, असेही राणेंनी सांगितले.

कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना खोटे बोलणारांना बाळासाहेबांनी `गेट आउट` केले, असा मुद्दा ठाकरे यांनी मांडला होता. त्यावर राणे यांना विचारले असता, मी त्यातला नाही. शिवसेनेत राहायचं नाही. हे मीच ठरवलं होतं. मी शिवसेनेचा राजीनामा दिला, असे उत्तर `साम`शी बोलताना दिले.

याच प्रश्नावर दुसऱ्या एका पत्रकाराशी बोलताना राणे यांची सटकली होती. ठाकरे यांनी माझे नाव घेतले नाही. तू मला चिडवू नकोस, अशा शब्दांत त्यांनी पत्रकाराला कार्यक्रमानंतर झापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT