Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray Delhi Tour : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच 'मविआ'चा चेहरा, दिल्ली दौरा फळाला येणार?

Mahavikas Aghadi News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. असे असले तरी काँग्रेसकडे राज्यभरात चालू शकणारा एकही चेहरा नाही.

अय्यूब कादरी

Vidhansabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा तोडीस तोड उत्तर देण्याची धमक दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. काँग्रेससह अन्य विविध पक्षांच्या नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत.

आघाडी करून निवडणुका लढवत असताना राजकीय पक्षांना व्यापक हिताचा विचार करून कधी कधी माघार देखील घ्यावी लागते. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या बाबतीत असेच झाले होते. काही लोकसभा मतदारसंघ त्यांना काँग्रेससाठी सोडावे लागले होते. हे करताना त्यांनी अजिबात खळखळ केली नव्हती. त्यात कोल्हापूर, अमरावती, रामटेक, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. आता त्याची परतफेड करण्याची वेळ काँग्रेसची आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत कमी फरकाने गमावलेल्या जागांवरही उद्धव ठाकरे दावा करू शकतात. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, असाही संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.

काँग्रेसकडे राज्यभरात चालू शकणारा एकही चेहरा नाही -

दिल्लीत दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या(Congress) विविध नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यात खासदारांसह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. याद्वारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

असे असले तरी काँग्रेसकडे राज्यभरात चालू शकणारा एकही चेहरा नाही. ज्यांच्यामुळे काँग्रेसला हे यश मिळाले ते सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, नाना पटोले यांचा प्रभाव त्यांच्या भागांपुरता मर्यादित आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जे यश मिळाले, त्यात उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा, त्यांच्या चेहऱ्याचा मोठा वाटा आहे, असे सांगितले जात होते.

मुत्सद्देगिरीत शरद पवार(Sharad Pawar) यांचा हात कुणी धरू शकत नाही. शरद पवार यांच्या डावपेचांचा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला, हेही नाकारता येत नाही. मोदी, शाह यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला शरद पवारही उत्तर देतात, मात्र ती संतुलित असते, भाषा सौम्य असते. उद्धव ठाकरे मोदी, शाह यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात. त्यामुळे महायुतीची अडचण होते.

उद्धव ठाकरे भाजप आणि महायुतीच्या मार्गातील अडसर -

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा केला होता. अमित शाह हे अहमदशाह अब्दाली याचे राजकीय वंशज आहेत, असे तोडीस तोड उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या अर्थाने उद्धव हे भाजप(BJP) आणि महायुतीच्या मार्गातील अडसर आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाताच शिंदे गटाने त्यांच्यावर तिरकस टीका केली. मुख्यमंत्री शिंदे तर महिन्यातून दोन-तीन वेळा दिल्लीला जाऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतात, हा भाग वेगळा.

दिल्लीत अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही समावेश आहे, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांचे पुत्र, खासदार आदित्य यादव, काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनीही ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मंगळवारीच ठाकरे यांची भेट घेतली आहे. शरद पवार, खासदार शाहू महाराज यांचीही ते भेट घेणार आहेत. गुरुवारी ठाकरे हे सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे यांच्याही भेटीची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसाठी स्पष्ट संदेश -

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसाठी हा स्पष्ट संदेश आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा भाऊ, असे विधान पटोले यांनी केले होते. काँग्रेसचे हे नेते विधानसभेला स्वबळाचीही भाषा बोलू लागले होते. सर्वांचेच स्वबळ आता मागे पडले आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला ज्या चार जागा सोडल्या होत्या, आता काँग्रेसने त्याची परतफेड करावी, कमी फरकाने गमावलेल्या जागा आपल्याला द्याव्यात, असेही त्यांचे प्रयत्न आहेत.

बांगलादेशाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे हेच भाजप आणि महायुतीला मात देऊ शकतात, याची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, याला काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे.

आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) म्हणून एकसंधपणे लढणार, असे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले आहे. महाविकास आघाडीत कुणीही मोठा भाऊ नाही, तिन्ही पक्षांना समान जागा मिळाव्यात, असे त्यांनी दिल्लीतील मराठी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हटले आहे. ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे गटाकडून उपरोधिक टीका केली जात असली तरी राजकारणाचा भाग सोडला तर त्यातून फारसे काही साध्य होणार नाही.

उलट, या दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीतील स्थान आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील, या दृष्टीने त्यांचा दिल्ली दौरा आणि विविध नेत्यांच्या गाठीभेटी उपयुक्त ठरणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT