MP Omprakash Rajenimbalkar  Sarkarnama
विश्लेषण

Omraje Nimbalkar : ...आणि ओमराजेंच्या दिग्गज विरोधकांची तटबंदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली

Loksabha Election Analysis of Dharashiv Loksabha Constituency : उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या झंझावातासमोर धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या आमदारांची भक्कम वाटणारी तटबंदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या आमदारांना हे धक्के जाणवणार आहेत.

अय्यूब कादरी

Dharashiv Constituency : आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण केलेले काही 'दिग्गज' नेते एकत्र आले... त्यांना तुलनेने कमी 'शक्ती'शाली असलेल्या मात्र जनतेशी घट्ट नाळ जोडली गेलेल्या, जनतेच्या कायम संपर्कात राहणाऱ्या एका तरुण खासदाराचा पराभव करायचा होता. लोकांचे फोन उचलणे हे काही खासदाराचे काम नसते, असे हिणवत एकत्र आलेल्या या दिग्गजांच्या विरोधात एकवटलेल्या जनतेने त्यांना धक्का दिला आणि संदेशही दिला, आम्हाला गृहीत धरलेले चालणार नाही, तुमची मनमानी चालणार नाही...! 'बडा घर पोकळ वासा' या म्हणीप्रमाणे या दिग्गजांची अवस्था झाली आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला.

राजकारणात जय-पराजय चालत असतात. मात्र, काही विजय आणि पराभव संदेश देणारे असतात. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निकालही असाच लागला. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांच्यात लढत झाली. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे होते.

याशिवाय काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (मुरुमकर), माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवााड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेसचे माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण अशी फौज महायुतीच्या दिमतीला होती. या पाच आमदारांत पालकमंत्री तानाजी सावंत, अर्चनाताई यांचे पती, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, बार्शींचे आमदार राजेंद्र राऊत, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळे, भक्कम प्रचारयंत्रणा जोडीला होतीच.

राज्यात गेल्या पाच वर्षांत फोडाफोडीचे, पक्षांतरांचे जे राजकारण झाले ते लोकांना आवडले नाही, हे स्पष्ट झाले आहे. उस्मानाबाद मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत सुरुवातीच्या काळात संभ्रम होता. अर्चनाताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यापूर्वी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यासह माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (शिवसेना शिंदे गट) यांनीही उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती.

जागावाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी बरेच दिवस गेले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. एकदाची उमेदवारी जाहीर झाली. हे सारे दिग्गज एकत्र आले, मात्र त्यांना प्रचाराची दिशाच सापडली नाही. कोण काय करत आहे, हे कोणालाही कळत नव्हते अशी अवस्था होती. खासदार ओमराजे हे सामान्य लोकांचेही फोन उचलतात, फोनवर लोकांनी सांगितलेली कामे करतात, अशी त्यांची ख्याती आहे. यावरून या दिग्गजांनी ओमराजेंची खिल्ली उडवली.

खासदार आपला फोन उचलतात, फोनवर आपण सांगितलेली कामे करतात, त्याच फोन कॉलवर संबंधित अधिकाऱ्यांना कॉन्फरन्समध्ये घेऊन सूचना देतात... सामान्य माणसाला यापेक्षा आणखी काय हवे असते, हे महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आले नाही. ओमराजेंच्या विरोधात प्रचार करणाऱ्या या नेत्यांना लोकांचे थेट फोन येतात का, आले तरी ते उचलतात का, याबाबत संभ्रम आहे. यापैकी काही नेत्यांना बोलायचे असेल तर आधी त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करावा लागतो, मग पुढचे ठरते. या पार्श्वभूमीवर खासदार आपला कॉल घेतात, याचे लोकांना कौतुक वाटणारच. ओमराजेंनी गेल्या पाच वर्षांत खासदारकीच्या काळात काय केले, किती निधी आणला आणि त्यातून कोणती विकासकामे केली, हे प्रश्न विरोधकांनी जोरकसपणे मांडलेच नाहीत. ओमराजेंच्या फोन उचलण्याच्या न तुटणाऱ्या नॅरेटिव्हमध्ये ते अडकून बसले.

सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांतून राजेनिंबाळकर यांना जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली. सव्वातीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने त्यांचा विजय झाला. पालकमंत्री सावंत यांच्या भूम-परंडा मतदारसंघातून सर्वाधिक 81 हजार मतांची आघाडी मिळाली. सावंत यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच राजेनिंबाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. भाषेची मर्यादा सोडून टीका सुरू केली होती. त्याचा उलटाच परिणाम झाला. सावंतांचा आविर्भाव लोकांना आवडला नाही. त्यांच्याच भूम -परंडा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना जबर धक्का देत भूम-परंड्यातून त्यांच्या विधानसभा निवडणुकीची वाट बिकट करून ठेवली आहे. भाषेची मर्यादा पाळायची, संरजामी वृत्तीच्या वागण्याला आवर घालायचा असा संदेश मतदारांनी दिला आहे. अन्य सर्व आमदारांच्या मतदारसंघांतूनही ओमराजेंना आघाडी मिळाली. अर्थातच, महायुतीच्या दिमतीला असलेल्या नेत्यांच्या गावांतूनही ओमराजेंना मतांची आघाडी मिळाली.

बसवराज पाटील यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून एकदा आणि औसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. या लोकसभा निवडणुकीत पवार आणि पाटील यांनी एकत्र येत अर्चनाताई यांचा प्रचार केला. उमरगा-लोहाऱ्यातही पाटील आणि प्रा. रवींद्र गायकवाड यांचे एकत्र येणे लोकांना आवडले नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात कुणीही कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, हे खरे असले तरी प्रचारातील या चित्राला लोकांनी नेत्यांच्या स्वार्थाशी जोडले. इथेच मोठा घोळ झाला, तो ओमराजेंच्या पथ्थ्यावर पडला आणि सावंतांसह महायुतीच्या सर्वच आमदारांची विधानसभेची वाट बिकट झाली.

राजकारणातील शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याही तुळजापूर मतदारसंघाने ओमराजे यांना 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिले आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. राणाजगजितसिंह पाटील आणि आता महायुतीत असलेले नेते कधी ना कधी एकमेकांच्या विरोधात होते. एका पक्षात, आघाडीत असले तरी त्यांच्यात वर्चस्वाची लढाई होती. या सर्वांचे एकत्र येणे लोकांना आवडले नाही का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असली तरी आमदार पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. सर्वकाही आमच्याच घरी असावे, असा पाटील कुटुंबीयांचा हट्ट कशासाठी, अशीही भावना महायुतीतील घटक पक्ष आणि मतदारांमध्येही निर्माण झाली. सर्वाधिक फटका त्याचाच बसला. लोकांना गृहीत धरण्याची चूक आमदार पाटील यांना भोवली आणि विधानसभेच्या त्यांच्या वाटेतही काटे अंथरले गेले.

उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रचारा दरम्यान ओमराजे यांचा ठग असा उल्लेख केला. शिवसेना फुटल्यानंतर आमदार चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राजेनिंबाळकर हे ठाकरे यांच्यासोबत राहिले. आमदार चौगुले हे कायम जमिनीवर असतात, म्हणजे लोकांत मिसळतात, त्यांच्या सुख, दुःखात सहभागी होतात. तेही लोकांचे फोन उचलतात. शिवसेना फुटीनंतरची सहानुभूती कोणत्या दिशेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले नसेल, असे अजिबात म्हणता येणार नाही. असे असतानाही ते ओमराजेंना ठग म्हणाले, हे लोकांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे चौगुलेंच्या मतदारांनी ओमराजेंच्या झोळीत भरभरून दान टाकले. बार्शी आणि औशातही असेच झाले. विधानसभेसाठी बार्शीत आता माजी मंत्री दिलीप सोपल आणि औशात दिनकर माने यांनी बाह्या सरसावल्या आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ओमराजे हे काही विकासपुरुष नाहीत, हे त्यांनाही पटेल आणि जनतेलाही, कारण गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच ते खासदार झाले होते. लोकांशी नाळ त्यांनी तुटू दिली नाही, हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. दररोज आपल्याला नागरिकांचे जवळपास आठशे फोन येतात, मी फोन उचलतो, नाही उचलला तरी कॉलबॅक करतो, असे ते प्रचारात सांगायचे. ते खरेही आहे. सरकारी कार्यालयांत लोकांची कामे अडलेली असतात. त्यासाठी त्यांना चकरा माराव्या लागतात. खासदारांना फोन केला की हे काम एका झटक्यात होते, हे लोकांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांना हा खासदार गमवायचा नव्हता. त्यामुळेच काहीजणांनी त्यांना खर्चासाठी वर्गणी करून रक्कम दिली. रस्त्याने जाताना कारच्या खिडकीचे काच खाली न करणारे, त्यांना बोलायचे असेल तर आधी पीएना फोन करावे लागते... असे काही मोठे नेते महायुतीकडे एकवटले आणि त्याचाच फायदा ओमराजेंना मिळाला. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महायुतीच्या आमदारांची भक्कम वाटणारी तटबंदी लोकसभा निवडणुकीत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. त्यामुळे विधानसभेत काय होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT