Prakash Ambedkar News : गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार निवडून आला नसला तरी त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापितांचा काटा काढला.पण आता या निवडणुकीत त्यांचाही काटा निघाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लोकसभेतील अपयशानंतर आता तरी ते योग्य पावले उचलतील, आडमुठी भूमिका सोडून राजकीय लवचिकता दाखवणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा 2019 च्या निवडणुकीत घेतलेल्या डोळे फिरवणाऱ्या मतांच्या आकड्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडलं होतं. वंचित फॅक्टरमुळे अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.वंचितच्या तडाख्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली.काँग्रेसला महाराष्ट्रासारख्या राज्यात अवघ्या एका खासदारावर समाधान मानावे लागले.
त्या 'कडवट 'इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून वंचितशी जुळवून घेत प्रकाश आंबेडकरांसाठी पायघड्या घातल्या गेल्या.महाविकास आघाडीने वंचितचा घेतलेला धसकाच प्रकाश आंबेडकरांला अहंकाराला हवा देऊन गेला.ठाकरेंशी दोस्ती केलेल्या वंचितला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची दारे खुली होती.पण आंबेडकरांच्या भलत्याच 'डिमांड'मुळे तिथपर्यंत वंचित पोहोचूच शकली नाही.
प्रकाश आंबेडकरांनी अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीचा नाद सोडत स्वबळाचा नारा दिला आणि उमेदवारांच्या घोषणा केल्या.आघाडी आणि वंचितची वाट वेगळी झाली.२०१९ च्या निवडणुकीत नंबरची दोन मते घेणारी वंचित यावेळीही आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आणि महायुतीला त्याचा फायदा होणार अशी शक्यता बोलली जाऊ लागली. जे होईल ते होईल असे म्हणत आघाडीने डेअरिंग दाखवली.
2024 च्या निवडणुकीत वंचित फॅक्टर चाललाच नाही.आंबेडकरांच्या धसका घेतलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 48 पैकी तब्बल 30 जागा मिळाल्या.प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांनी आघाडीचा कोणताच उमेदवार अडचणीत आला नाही.पण या निकालामुळे आंबेडकरांनी त्यांची पुरती शोभा करुन घेतल्याचं पाहायला मिळालं.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला (Vanchit Bahujan Aaghadi) 14 लाख 15 हजार 76 मते मिळाली आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 41 लाख 32 हजार 446 मते मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीत वंचितला 27 लाख 17 हजार 370 मते कमी मिळाली आहेत.
या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वाची ठरली.त्यांनी आपल्या मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली नाही.कोणतीही ठाम भूमिका न घेता, धरसोड स्वभाव, खळबळ उडवून देणार्या दाव्यांचा सिलसिला,पण नेमकं करायचं काय याचा कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात अपयश आले. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला.
राजकारणात कधी कधी पुढे जाण्यासाठी दोन पावले मागे घ्यावी लागतात हे सूत्र आंबेडकरांसारख्या नेत्याला नक्कीच अवगत असणार आहे.पण ती कृतीत उतरली नाही.कोणत्याही निर्णयावर ठाम न राहण्याचा त्यांचा स्वभावदोष वंचितसाठी मारक ठरला.
महाविकास आघाडीसोबत जुळवून घेतलं असतं तर कदाचित आंबेडकरांच्या पदरात १ ते २ जागा पडल्या असता. पण आता हेही नाही आणि तेही नाही रिकामी झोळी असं म्हणण्याची वेळ आंबेडकरांवर ओढावली असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकर आणि वंचितचा दरारा आता कायम राहिला नसल्याचे दिसून आले.वंचित आघाडीने सांगली, कोल्हापूर, बारामती आणि नागपूर या चार मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.त्यात कोल्हापूर,बारामती,सांगलीत महाविकास आघाडी जिंकली.तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.भिवंडीत वंचितने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
हातकणंगलेत वंचितचा फटका ठाकरे गटाला बसला. उमेदवार डीसी पाटील यांना 32 हजार 696 मते मिळाली.तर ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांना अवघ्या 13 हजार 426 मतांनी पराभव झाला.वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला.तिथे वंचितच्या परमेश्वर रणशूर यांना 10 हजार 52 मते पडली.
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरींग साधण्याचा प्रयत्न केला.पण आपल्या उमेदवारांसाठी म्हणावा तितका जोर लावला नसल्याचे दिसून आले नाही. आंबेडकरांना आता आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद सिध्द करावी लागणार आहे. पण वंचितला पुन्हा आपली गाडी पुन्हा ट्रॅकवर आणायची असेल तर आंबेडकरांना पुन्हा एकदा राजकीय लवचिकता दाखवून आघाडीशी जुळवून घ्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.