Uddhav Thackeray sarkarnama
विश्लेषण

`महाविकास आघाडी फुटलेली नाही.. आमच्या लोकांनी गद्दारी केल्याचं दुःख`

Uddhav Thackeray यांनी विधानभवनात घेतली महाविकास आघाडीची बैठक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आणि आमदारांशी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे आज पहिल्यांदाच विधानभवनात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांचे नेते या वेळी उपस्थित होते. (Mahavikas Aghadi is united says Uddhav Thackeray)

या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की जे आपले होते तेच आपले शत्रू झाले. ही परिक्षा आहे. जगभरात संकट असताना सत्ता होती. संकट गेल्यावर सत्ता काढून घेतली. आपण मांडलेले तिन्ही अर्थसंकल्प चांगले मांडले होते. आरोग्यसुविधा वाढवल्या. अडिच वर्षांतील चांगली कामे जनतेपुढं नेवू या. या वेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.

Uddhav Thackeray

``हे खोके सरकार आहे. आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी फार काळ अधिवेशनात उपस्थित राहत नाही, कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेलीय. मागच्या अडीच वर्षात अजित दादांनी आर्थिक विभाग ज्यापद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. जर कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामं केली नाही असं जर म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही. हे सरकार पाच वर्ष चालले असते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापने वेळी मला सांगण्यात येत होते की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दगाफटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला पण यांनी आमचा घात केला,``अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माझ्यासोबत असलेल्या १५ आमदारांनाही अनेक ऑफर आल्या. पण ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही. अनेक वर्षे राजकारण केले - पाहिले पण वैयक्तिक संबंध कधी बिघडू दिले नाही. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागणार आहे, त्यावरून लोकशाही की बेबंदशाही हे जगासमोर स्पष्ट होणार आहे.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की बऱ्याच दिवसांनंतर तिन्ही पक्ष एकत्र भेटलो. महाविकास आघाडीने कोरोना संकटाचा सामना केला त्या संकटापुढे सध्याचे आव्हान काहीच नाही. आम्ही कुठेही तुटलेलो नाहीत. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरवपट्टी अली तरी जनता उघड्या डोळ्याने सर्व बघत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT