Utpal Parrikar  Sarkarnama
विश्लेषण

मनोहर पर्रीकरांनाच भाजपमधून काढण्याचा आखला होता कट!

गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण तापले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपला रामराम करून पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. आता त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मनोहर पर्रीकर यांनाच भाजपमधून बाहेर काढण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट उत्पल पर्रीकर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला आता पक्षाने तिकीट नाकारले आहे. ही परिस्थिती 1994 सारखी आहे. त्यावेळी माझे वडील मनोहर पर्रीकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, त्यांना जनतेचे मोठे समर्थन होते. त्यामुळे पक्षातील नेत्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आता हेच नेते पक्षात मोठ्या पदावर बसले आहेत, तर मी जनतेसोबत आहे.

माझे वडील मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी जनतेचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. असे असतानाही मला त्यावेळी उमेदवारी देण्यात आली नाही. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा गोव्यात आले होते. त्यांच्याकडे 5 नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांसाठी तिकीट मागितले होते. माझे वडील जिवंत असते तरी कुणीच अशा प्रकारे कुटुंबातील सदस्यांना तिकीट मागण्याची हिंमत केली नसती, असेही उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

उत्पल पर्रीकर यांनी भाजपला थेट माघारीची ऑफरही दिली आहे. पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करणाऱ्या पर्रीकरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली आहे. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले आहे. (Utpal Parrikar News Updates)

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी मोठा निर्णय घेत भाजप सोडली आहे. त्यांनी भाजपला धक्का दिला असला तरी इतर कोणताही पक्षाकडून लढण्याची ऑफर न स्वीकारता ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Goa Political News)

पणजीच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी व विद्यमान मंत्री जेनिफर यांना टालगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातही ते आरोपी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT