BJP, Congress
BJP, Congress sarkarnama
विश्लेषण

भाजपमधून येणाऱ्या नेत्यांसाठी काँग्रेसने लावला हाऊसफुलचा बोर्ड!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात पुढील वर्षी पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) होणार आहे. त्यासाठी भाजप (BJP), काँग्रेससह (Congress) इतर पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांतील उमेदवारांना गळाला लावण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मागील पाच वर्षांत काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अनेक नेते घरवापसीसाठी इच्छुक आहेत. पण त्या सगळ्यांना पक्षात न घेण्याची भूमिका काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. भाजप सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री त्यांच्या आमदार मुलासह नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच अजूनही काही नेते घरवापसी करण्यासाठी तयार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सर्वांनाच प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे.

रावत म्हणाले की, काँग्रेस सोडलेले अनेक नेते घरवापसीच्या प्रयत्नात आहेत. याचबरोबर आधीपासून भाजपमध्येच असलेले अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. भाजपमध्ये अस्थितरतेचे वातावरण नाही. यामुळे काँग्रेसमध्ये येण्यास अनेक जण तयार आहेत. आम्ही एवढ्या सगळ्या नेत्यांना आम्ही सामावून घेऊ शकत नाही. ताकदवान असतील त्यांनाच आम्ही पक्षात घेऊ.

याआधी बोलताना भाजपमधून येणाऱ्या नेत्यांबद्दल हरीश रावत म्हणाले होते की, या महापापी लोकांनी 2016 मध्ये काँग्रेस सरकार पाडण्याचे महापाप केले आहे. ते जोपर्यंत आपली चूक मान्य करून जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. या महापापामुळे उत्तराखंडला कलंक लागला आहे. त्यामुळे जोपर्यंत ते चूक मान्य करत नाहीत आणि काँग्रेससोबत निष्ठेने उभे राहण्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत त्यांना पक्षात घेता कामा नये, असं रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य व त्यांच्या आमदार पुत्राने नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच इतर काही नेत्यांना पक्षात पुन्हा घेण्यासाठीही रावत यांची सहमती आहे. पण त्यांच्या बोलण्याचा रोख हरक सिंह रावत, सुबोध उनियाल, विजय बहुगुणा यांसह अन्य काही नेत्यांकडे असल्याची चर्चा आहे. तसेच आर्य यांच्या काँग्रेसमध्ये येण्यामुळेही रावत यांना आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे.

2016 मध्ये अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडल्याने रावत हे पक्षाला आधार राहिलेले एकमेव नेते ठरले होते. 2017 मध्ये पक्षात निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावत यांच्या मनात पक्ष सोडलेल्या नेत्यांविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ही नाराजी आजही कायम असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत खुद्द रावत यांचा दोन मतदारसंघात पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT