VD Satheesan sarkarnama
विश्लेषण

VD Satheesan : केरळचा कारभार सतीशन यांच्या हाती का? मुख्यमंत्रि‍पदी निवड होण्याची पाच मोठी कारणं

kerala CM Congress : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. मात्र, तब्बल दहा दिवसानंतर मुख्यमंत्रि‍पदासाठी व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीमागे काँग्रेसचे भविष्यातील राजकारण दिसून येते.

Roshan More

kerala CM News : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी असलेल्या युडीएफला बहुमत मिळाले. 140 पैकी तब्बल 102 जागा या आघाडीने मिळवल्या. मात्र, निकालानंतर तब्बल दहा दिवसानंतर मुख्यंत्रिपदाची निवड करण्यात आली. मात्र, राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेले काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांचे नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी आघाडीवर होते. सर्वाधिक आमदारांनी त्यांच्या नावावरच पसंती दर्शवली होती. मात्र, तरी देखील व्ही डी सतीशन यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे.सतीशन यांची निवड अनेकांना धक्का देणार आहे. याच निवडीमागची महत्त्वाची कारणे पाहूया.

काँग्रेसचे संघटन मजबूत केले

सलग दोन वेळा काँग्रेसला केरळमध्ये डाव्या आघाडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे संघटन मजबुत राहणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच स्थितीमध्ये सतीशन यांच्यावर 2021 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने जबाबदारी टाकली. या जबाबदारी पार पाडत असताना संघटन मजबुत कसे राहिली याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. केरळ काँग्रेसमध्ये विविध गट आहेत. या गटाच्या हेव्यादाव्यांमधून पक्ष कमजोर होतो. हे ओळखून त्यांनी सर्व गटांमध्ये एक वाक्यता आणली. आणि त्यांच्यामधील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सर्वच गटांमध्ये सतीशन यांना स्वीकार्यता मिळाली. सत्ता नसताना संघटन मजबुत ठेवण्याची जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पाडली.

आक्रमक नेता

डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांना 2021 मध्ये सत्ता मिळावली. पिनारयी विजय हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि विकासाच्या कामांमुळे डावी आघाडी पुन्हा सत्तेत आली होती. त्यांच्यासमोर काँग्रेसने सतीशन यांना विरोधी पक्षनेता म्हणून उभे केले. सतीशन हे आक्रमक नेते आहेत. त्यांनी फक्त सभागृहातच नाही तर रस्त्यावर देखील पिनारयी विजय सरकारच्या विरोधात लढाई लढली. भ्रष्टाचार,स्मगलिंग सारखे मुद्दे लावून धारले. ते आक्रमकपणे सरकारवर तुटून पडले त्यामुळे अनेकवेळा सरकारला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. भ्रष्टाचार, प्रशासन आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे केरळमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळालेला दिसतोय. विशेष म्हणजे काँग्रेस आघाडी फक्त विजय मिळवणार नाही तर तिला 100 पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. तसेच काँग्रेस सत्तेवर आली नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा करून पक्षाचा विजयाविषयी आम्ही खात्रीशीर असल्याचे दाखवून दिले होते.

काँग्रेस संघटनेत तयार झालेला नेते

सतीशन हे काँग्रेस संघटनेत तयार झालेले नेते आहेत. पेशाने ते वकील आहेत. केरळ हायकोर्टात ते वकीली करत होते. मात्र, त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी काँग्रेसपासूनच झाली होती. त्यांनी महाविद्यालयी काळात काँग्रेसचे विद्यार्थी नेते म्हणून काम केले त्यानंतर ते केरळ स्टुंडेंट यूनियन आणि युथ काँग्रेसमध्ये देखील सक्रीय होते. विशेष म्हणजे त्यांना तब्बल 25 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. 2001 पासून ते विधानसभेवर विजयी होत आहेत. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी फक्त कार्यकर्त्यांचे मनोबलच वाढवले नाही तर कार्यकर्त्यांना पुन्हा लोकांमध्ये काम करण्यासाठी प्रेरित करून सक्रीय केले. अभ्यासू विरोधी पक्षनेता म्हणून केवळ टीका केली नाही तर आकडेवारी आणि संदर्भ देत सरकारची कोंडी केली. सतीशन हे काँग्रेस सिस्टीममध्ये तयार झालेले नेते आहेत, ही त्यांच्यासाठी फायद्याची बाब ठरली.

निवडणूक रणनीती, स्वच्छ प्रतिमा

सतीशन यांनी सरकारची केवळ सभागृहात कोंडी केली नाही तर रस्त्यावर त्यांच्या विरोधात आंदोलन केले. सरकारविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली. निवडणुकीच्या राजकारणात मित्रपक्षांनासोबत ठेवले. त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली आणि काँग्रेसला केरळमध्ये सत्ता मिळाली. सतीशन हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. 25 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. सहा वेळा आमदार झाले आहेत. मात्र, त्यांच्यावर गंभीर आरोप नाहीत. विरोधकांवर टीका करताना त्यांचा तोल सुटतो ते आक्रमक पणे त्यांच्यावर तुटून पडतात ही काहीशी त्यांची नकारात्मक बाब मानली जाते असली तरी त्यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यापेक्षा जास्त महत्त्वाची ठरली.

वेणूगोपाल यांचे संघटनेमधील महत्त्व

निवडणुकीच्या राजकारणात एका एका जागेचे महत्व वाढले आहे. वेणुगोपाल जर मुख्यमंत्री झाले असते तर त्यांना लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला असता. तसेच विधानसभेसाठी एका आमदाराला राजीनामा द्यावा लागला असता. तेथून वेणुगोपाल यांना निवडणूक लढावी लागली असती. दरम्यान, वेणुगोपाल यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे संघटन मजबुत करण्यावर भर दिला आहे. दक्षिणेत पक्षाचा विस्तार हा त्यांच्या नेतृत्वामुळे होत असल्याचे मानले जाते. राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी ज्या नेत्यांवर विश्वास ठेवातात त्यात वेणुगोपाल यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे असा नेता पुन्हा राज्याच्या राजकारणात पाठवून त्यांच्या सारखा निवडणे हे लगेच शक्य होणार नाही, हे ओळखून काँग्रेस नेतृत्वाने वेणुगोपाल यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रीय ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा सतीशन यांना झाल्याचे दिसून येते .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT