Maharashtra Politics Sarkarnama
विश्लेषण

VP Election Result : समझने वालों को इशारा काफी है! उपराष्ट्रपती निवडणुकीत बदनामी महाराष्ट्राचीच…

Vice President Election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीत 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरून महाराष्ट्राचीच फुटली आहेत? सगळं चुकीचं काम महाराष्ट्राचं करणार, ही अशी बदनामी करत आहेत. देशामध्ये राज्याची दुसरं कोणी फुटू शकत नाही?, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या सी. पी. राधाकृष्णन यांना 452 आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली, मात्र 15 मतं न मिळाल्याने आघाडीत संशय निर्माण झाला.

  2. क्रॉस व्होटिंगवरून महाराष्ट्रातील खासदारांवर संशय घेतला गेला, ज्यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्राची अनावश्यक बदनामी होत असल्याचे म्हटले.

  3. क्रॉस व्होटिंगचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशभरात घडतो, मात्र एनडीएतील नेत्यांनी खासकरून महाराष्ट्राकडेच बोट दाखवल्याने वाद अधिक चिघळला.

MVA Facing Criticism Over Split Votes : उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल लागला अन् इंडिया आघाडीला धक्का बसला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी निकालाआधी आघाडीच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केल्याचे सांगितले अन् नंतर हाच आकडा आघाडीच्या अंगाशी आला. निकालानंतर एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. या निकालाने आघाडीला न मिळालेल्या 15 मतांभोवती संशयाचे ढग जमा झाले. कोणत्या खासदारांनी आघाडीशी गद्दारी केली? काही मिनिटांतच एनडीएतील नेत्यांनी महाराष्ट्राकडे बोट दाखवलं.

निवडणुकीत महाराष्ट्र बदनाम झाला. मराठी माणसाने गद्दारी केल्याचा दावा मराठी माणसांनीच केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांनी महाविकास आघाडीच्या खासदारांकडे बोट दाखविले. देशातील इतर कोणत्याही राज्याकडे किंवा खासदारांवर संशय घेण्यात आला नाही. पण महाराष्ट्रातील खासदारांकडे संशयाची पहिली सूई वळली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्याच खासदारांनी आघाडीला धोका दिला, हे एनडीएच्या खासदारांना कसं कळालं? त्यांना सांगून मतदान झाले का? आपल्याबाजूने मतदानासाठी एनडीएकडून घोडेबाजार करण्यात आला का?... असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हीच शंका उपस्थित केली आहे. सत्तेतल्या लोकांना जर माहिती असेल कुठे मतदान झाले तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोट चोरी झाली आहे, हे सिद्ध होईल. मात्र जे क्रॉस व्होटिंग झाले म्हणत आहेत. त्यांना गद्दारी केली ती फक्त मराठी माणसानेच केली असं म्हणायचं आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरून महाराष्ट्राचीच फुटली आहेत? सगळं चुकीचं काम महाराष्ट्राचं करणार, ही अशी बदनामी करत आहेत. देशामध्ये राज्याची दुसरं कोणी फुटू शकत नाही?, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. सध्याचे राजकारणी आजही महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीच्या महानतेवर बोलत असतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कसा प्रगल्भ आहे, हे सांगत असतात. मात्र, मागील साडेपाच वर्षांतील राज्याच्या राजकारणाने त्याला मोठा हादरा दिला आहे. राज्यात काय घडलं, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. संपूर्ण देशाला नव्हे तर जगातील 32 देशांनी (एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार) त्याची दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आणि तिथूनच महाराष्ट्रातील राजकारणात ‘गद्दारी’ हा शब्द रूढ झाला.

उपराष्ट्रपती असो की राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक... यामध्ये क्रॉस व्होटिंग म्हणजेही गद्दारीच. आपल्या पक्षाचे आदेश डावलून विरोधी पक्षातील उमेदवाराला मतदान करणारे लोकप्रतिनिधी ना आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असतात ना विचारांशी. या निवडणुकांमध्ये सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदान केले वगैरे असे म्हणणे खूप धाडसाचे ठरेल. त्यालाही मागील पाच वर्षांतील राजकारणच कारणीभूत आहे. अर्थात त्याआधीही पक्षनिष्ठेला अनेकदा तिलांजली दिली गेली आहे. पण ही पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाला 360 अंशांची कलाटणी देणारी ठरली आहेत. पक्षनिष्ठा, एकनिष्ठ आदी शब्द गुळमुळीत झाले आहेत. पण हे फक्त महाराष्ट्रातच घडतंय का?

देशातील अनेक राज्यांमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये आमदार, खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. पक्ष फुटले आहेत. मोठी पक्षांतरं झाली आहेत. त्यामुळे सत्ताबदल झाला आहे. मग उपराष्ट्रपती निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगनंतर पहिले नाव महाराष्ट्राचे, मराठी खासदारांचेच का घेण्यात आले? शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर महाविकास आघाडीतील ‘त्या’ खासदारांचे आभारही मानले आहेत. त्याआधी त्यांनी ‘समझनेवालों को इशारा काफी है’, असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते, आगे आगे देखो होता है क्या? या दोन्ही वाक्यांचा अर्थ काय घ्यायचा?

आमदार, खासदारांचे मतदान असणारी कुठलीही निवडणूक आली की, घोडेबाजाराची चर्चा सुरू होते. फोडोफोडीचे राजकारण रंगते. त्यामध्ये सध्यातरी एनडीएतील नेते माहीर असल्याचेच अनेकदा स्पष्ट झाले आहे. मग उपराष्ट्रपती निवडणुकीतही असाच घोडेबाजार झाला का, असे संकेत श्रीकांत शिंदे देत नाहीत ना? काँग्रेससह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचे एनडीएतील नेते ठामपणे सांगत आहेत, ते कशाच्या आधारे? क्रॉस व्होटिंग दक्षिण भारतातील विरोधी पक्षांतील खासदारांचेही झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा इतर राज्यातील खासदारही करू शकतात. शक्यता कुठलीच नाकारता येत नाही. मग महाराष्ट्राचीच बदनामी का?    

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: उपराष्ट्रपती निवडणुकीत निकाल कसा लागला?
A: एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 452 मतांनी विजय मिळवला, तर आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.

Q2: क्रॉस व्होटिंगवरून महाराष्ट्राचं नाव का घेतलं गेलं?
A: एनडीएतील काही नेत्यांनी थेट महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांवर संशय घेतला.

Q3: सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
A: त्यांनी विचारलं की, 15 मतं फुटली असतील तर ती फक्त महाराष्ट्रातलीच कशी? महाराष्ट्राचीच बदनामी का केली जाते?

Q4: क्रॉस व्होटिंग फक्त महाराष्ट्रातच होतं का?
A: नाही, अशा घटना अनेक राज्यांमध्ये घडल्या आहेत; त्यामुळे महाराष्ट्रालाच दोष देणं चुकीचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT