Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil Sarkarnama
विश्लेषण

Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीतून आघाडीचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहेl. या मतदारसंघात एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत.

Rahul Gadkar

Sangli Political News : लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सांगलीतील काँग्रेस नेते, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला. विशाल पाटलांच्या या निर्णयामुळे सांगलीत आता तिरंगी लढत होणार आहे.

दरम्यान, या बंडखोरीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला मात्र अपयश आल्याने महाविकास आघाडीमध्ये MVA अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात असून, त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सांगली SANGLI लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असणार आहेत. प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे सांगलीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसून भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचे बोलले जाते.

गेला महिनाभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील वाद हा संपूर्ण राज्यभर गाजला. या मतदारसंघातून आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हे विशाल पाटलांच्या बंडखोरीत झाले. या मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही दावा केला होता.

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार हवा, अशी भूमिका आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विशाल पाटील यांनी घेतली होती. मात्र ,काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतरही त्याला यश आली नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सांगलीत आघाडीसह युतीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.

गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विशाल पाटील Vishal Patil यांनी या मतदारसंघात शड्डू ठोकला होता. मात्र, सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादामुळे पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या घराण्याचा वाद मागील लोकसभा निवडणुकीत आडवा आल्याचे सांगितले जाते.

यंदाही तीच परिस्थिती असून गेल्या महिन्यापासून यावर खल सुरू आहे. असे असले तरी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुठेच दिसले नाहीत. पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध केल्याचेही काँग्रेसचे नेते उघडपणे सांगतात.

काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुरुवातीपासून सांगलीवर दावा सांगितला होता. दोन वेळा दिल्ली वाऱ्याही केल्यानंतरही विशाल पाटील आपली भूमिका मागे घेतील असे चित्र होते. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून थेट राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे.

वास्तविक पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. ती नाराजी उघड उघड बाहेरदेखील आली. मात्र, काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी न देण्यामागे कोणाचा हात आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे माघारीच्या दिवशी ही विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वालाच शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे रिंगणात असणार आहेत. आघाडीकडे सध्या आमदार जयंत पाटील Jayant Patil, आमदार विश्वजित पाटील, आमदार विक्रमसिंह पाटील, आमदार सुमन पाटील, रोहित पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासारखे मात्तबर प्रचारक आहेत.

ठाकरे गट व राष्ट्रवादी पक्ष हा चंद्रहार पाटील यांच्या बाजूने राहतील. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उघड-उघड भूमिका सध्यातरी घेतली नाही. त्यांचा विशाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा असणार की विरोध हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मत विभाजनाचा विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना बसू शकतो आणि त्याचा फायदा भाजपचे संजयकाका पाटील यांना होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT