Ahmednagar Political News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आलेच नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमध्ये हजेरी लावून सभा गाजवली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस मुख्यालयावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वागत केले.
भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखेंनी Sujay Vikhe सोमवारी (ता. २२) सकाळी नगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली काढत अर्ज भरण्यापूर्वी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खासदार विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार जोरदार तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः वेगळे शक्तिप्रदर्शन करत स्वतंत्र रॅली काढली. रॅलीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
सुजय विखे यांनी काढलेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन कोतकर यांचे छायाचित्रासह बॅनर झळकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पोलिस मुख्यालयात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुतेसह प्रमुख पदाधिकारी पोलीस मुख्यालयातील हेलिपॅडवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिस मुख्यालयात आल्यानंतर त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला गराडा घातला. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घेऊन पोलिस मुख्यालयातील कार्यालयात बसले. या वेळी त्यांच्याबरोबर भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच थांबविले. त्यांना आतमध्ये बोलावण्याची साधी तसदीदेखील घेतली गेली नाही. याची खुमासदार चर्चा रंगली होती. यानंतर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले ते हेलिकॉप्टरमधून उतरून पोलिस मुख्यालयातील कार्यालयात गेले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे तेथून पुढे सभास्थळी रवाना झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मावळ (जि. पुणे) येथील लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराचा अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar दोघेही उपस्थित होते. अजित पवार तेथून नगरला येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु मुख्यमंत्री शिंदे नगरला आले. परंतु अजित पवार आले नाहीत. अजित पवार खासदार विखे यांचा अर्ज भरण्यासाठी न आल्याने चर्चेचा विषय ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून मुंबईला रवाना झाले असल्याचे सांगितले गेले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.