Jayant Patil Sarkarnama
विश्लेषण

Jayant Patil Defeat : कुणा फितुरांमुळे... शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी विधान परिषद दणाणून सोडणारा आवाज झाला 'म्यूट'!

अय्यूब कादरी

Jayant Patil and Vidhan Parishad News : शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक भाई उद्धवरावदादा पाटील यांची 12 जुलै रोजी पुण्यतिथी होती. उद्धरावदादा यांनी अखेरपर्यंत शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या हितासाठी राजकारण केले. मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले होते, मात्र त्यांनी ते नाकारले. मुख्यमंत्रिपदासाठी पक्ष सोडणार नाही, विचारधारा बदलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तसा विवेकी आवाज आज दिसत नाही.

तर उद्धरावदादा यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या पक्षाचे, म्हणजे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. विधान परिषदेत गेली अनेक वर्षे बुलंद असलेला विवेकी आवाज आता यापुढे ऐकायला मिळणार नाही.

जयंत पाटील(Jayant Patil) अनेक वर्षे विधान परिषदेत होते. अभ्यासू, आक्रमक नेते अशी त्यांची ओळख. ते 'शेकाप'चे मोठे नेते आहेत. नितीमत्तेची चाड नसलेल्या आजच्या राजकारणात त्यांचा आवाज, त्यांचे सभागृहात असणे, ही आशादायक बाब होती. मात्र स्वहिताला अधिक प्राधान्य देणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांना ते खटकले असावेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करून त्यांनी जयंत पाटील यांचा पराभव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पुरस्कृत केले होते, मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. राज्यात शेकापची ताकद नसल्यातच जमा आहे. अशाही परिस्थितीत जयंत पाटील हे गेली अनेक वर्षे विधान परिषदेवर निवडून येत होते. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार, हे निश्चित मानले जात होते. आपण पहिल्याच पसंतीच्या मतांवर विजयी होऊ, अशी खात्री पाटील यांना होती. शरद पवार(Sharad Pawar) यांच्या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. पवार यांच्या पक्षाचे 12 आमदार आहेत. विजयासाठी 23 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. उर्वरित मतांसाठी ते शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसवर अवलंबून होते. अंतिम आकडेवारीनुसार शिवसेनेचे (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांना 24.16 आणि जयंत पाटील यांना 12.46 मते मिळाली. चुरस या दोघांतच पाहायला मिळाली.

शरद पवार यांचे 12 आमदार आणि जयंत पाटलांना मिळालेली 12.46 मते, हे समीकरण कोड्यात टाकणारे आहे. पाटील यांना शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचे मत मिळाले नाही, असे म्हणता येईल का? शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रत्येकी एक मत मिळाले असेल तर मग शरद पवार यांच्या पक्षाची 12 पैकी फक्त 10 मतेच मिळाली, असाही त्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो.

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उभे केले होते. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. सातव यांनी पहिल्या पसंतीची 25 मते मिळाली. मग काँग्रेसच्या उर्वरित मतांची विभागणी कशी झाली असेल, हाही चर्चेचा विषय आहे.

लोकसभेच्या निवडणुतीच रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गिते यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) 82 हजार मतांनी विजयी झाले. रायगड जिल्ह्यात शेकाप आणि जयंत पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. रायगड मतदारसंघात जयंत पाटील यांनी अनंत गिते यांना अपेक्षित सहकार्य केले नाही, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर केला होता. त्याला जयंत पाटील यांनीही उत्तर दिले होते. मात्र विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाने ही खदखद बाहेर काढली का? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

7 जुलै 1955 रोजी जन्मलेले जयंत पाटील यांचे नाव राज्यभरात परिचित आहे. अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बनले. 27 जुलै 2000 ला ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. 2024 पर्यंत, म्हणजे कालचा पराभव होईपर्यंत ते सभागृहात होते. त्यांनी आपले कार्यक्षेत्र रायगडपुरतेच मर्यादित ठेवले नाही. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांची त्यांनी पाहणी केली, लोकांशी संवाद साधला आणि त्यावर उपायही सुचवले होते.

2016 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) येथील विभागीय आयुक्त कार्यालयवार मोर्चा काढला होता. त्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांठी उपाययोजना केल्या होत्या. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांना पाठिंब्यासाठी जयंत पाटील यांनी रायगडमध्ये मोठा मोर्चा काढला होता. जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी सर्वच सरकारांना धारेवर धरले. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांची भाषणे गाजली.

जयंत पाटील यांच्या पराभवामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांचा सभागृहातील आवाज क्षीण होणार आहे. मूल्यांचे राजकारण बाजूला पडत आहे. राजकारणात आता वेगळ्याच बाबींना 'अर्थ' प्राप्त होऊ लागला आहे. अशा काळात जयंत पाटील यांच्यासारख्या तत्वनिष्ठ राजकारण्यांचा निभाव लागणे कठीण आहे.

शेकापचे संस्थापक भाई उद्धवरादादा पाटील यांची 12 जुलै रोजी पुण्यतिथी होती. दादांनी आपले अख्खे आयुष्य शेतकरी, कामगारांच्या कल्याणासाठी वेचले. 12 जुलै रोजी दिवसभर दादांच्या तत्वनिष्ठ राजकारणाची चर्चा सुरू होती, त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारले, मात्र पक्ष सोडला नाही, अशा त्यांच्या आठवणींत लोक रमले होते आणि तिकडे त्यांच्या एका शिलेदाराचा, म्हणजे जयंत पाटील यांच्या पराभवाची पायाभरणी केली जात होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT