West Bengal elections 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची २९१ उमेदवारांची यादी जाहीर करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर आघाडी घेतली आहे. एकाचवेळी एवढे उमेदवार जाहीर करणे, राजकीय पक्षांसाठी सोपे नसते. पण ममतांची निवडणुकीसाठीची तयारी पाहता तृणमूल काँग्रेससाठी हे काम फार कठीण नव्हते. यामागे त्यांचा विजयाचा आत्मविश्वास, हेही एक कारण असावे. विजयाची एवढी खात्री कशी, या प्रश्नाचे उत्तर ‘M’ फॅक्टरमध्ये आहे. हाच फॅक्टर २०२१ च्या निवडणुकीत ममतांसाठी गेमचेंजर ठरला होता. २०२६ मध्येही चित्र फारसे वेगळे असेल, असे चिन्ह नाही.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होणार आहे. कधीकाळी राज्यात दबदबा असलेल्या डाव्या पक्षांसह काँग्रेसची ताकद आता नावापुरतीही उरलेली नाही. मागील काही वर्षांत भाजपने आपला पाया मजबूत करण्यासोबतच ममतांना टक्कर देण्याइतपत राज्यात जम बसविला आहे. खरंतर ममतांसाठी ही जमेची बाजू ठरली आहे. याचे कारण म्हणजे मुस्लिमांची २७ टक्के मतदारसंख्या. बंगालमधील २९४ पैकी तब्बल २५ टक्के म्हणजे जवळपास ८५ जागांवर मुस्लिमांचे निर्णायक मतदान आहे. हेच मतदारसंघ ममतांना सत्तेचा दरवाजा खुला करून देतात.
तृणमूल काँग्रेसची राज्यात सत्ता येण्याआधी मुस्लिम मतदार काँग्रेस आणि डाव्यांमध्ये विभागले गेले होते. २०११ आणि २०१६ च्या निवडणुकीत टीएमसीने आपली पकड निर्माण केली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाही मुस्लिम मते मिळाली, पण ममतांना रोखण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. २०२१ ची निवडणूक मात्र एकतर्फी ठरली. मुस्लिमबहुल सुमारे ८५ जागांपैकी टीएमसीला तब्बल ७५ जागांवर विजय मिळाला. भाजपला मोजक्याच जागांवर आपला ठसा उमटविता आला. तर काँग्रेस आणि डाव्यांचा सुपडा साफ झाला.
टीएमसीला २०२६ च्या निवडणुकीतही याच ८५ जागांवर सर्वाधिक भरवसा आहे. मागील निवडणुकीइतक्यात ७५ जागांवर आपला विजय फिक्स असल्याचा आत्मविश्वास टीएमसीला आहे. सत्ता काबीज करण्यासाठी आणखी ७५ जागांवर त्यांना अधिक जोर लावावा लागणार आहे. या ७५ जागांसाठीही ममतांचा प्लॅन तयार आहे. हिंदू मतदारांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यांनी प्रामुख्याने महिला मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महिलांसाठी याआधीच त्यांनी विविध योजना सुरू केल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधीच त्यांनी पुजाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करत राजकीय डाव टाकला आहे.
भाजपची भूमिका पूरक
मुस्लिम मतदारांच्या मनात ममतांविषयी इतका जिव्हाळा निर्माण होण्याचे कारण म्हणजे भाजपची भूमिकाही महत्वाची ठरत आहे. भाजप पूर्णपणे मुस्लिमविरोधी असल्याचा नॅरेटिव्ह ममतांनी आधीपासूनच पसरवला आहे. भाजप नेत्यांची विधानेही त्यास कारणीभूत आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यास मुस्लिमांचे काही खरे नाही, असे ममता उघडपणे बोलून दाखवितात. पण त्या केवळ भाषणांमधूनच मुस्लिमांसाठी कळवळा दाखवत नाहीत. मुस्लिमांसाठी अनेक योजनाही त्यांनी आणल्या आहेत. सरकारच्या विविध योजनांमध्ये मुस्लिमांची भागिदारी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतात.
भाजप जेवढ्या आक्रमकपणे ध्रुवीकरणाची भूमिका मांडत आहे, तेवढ्याच वेगाने मुस्लिम मतदार ममतांकडे झुकत आहेत. ममता बॅनर्जी हाच एकमेव पर्याय त्यांना दिसत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची राज्याती ताकद राहिलेली नाही. ममतांनी जाणीवपूर्वक केवळ भाजपलाच टार्गेट करत या दोन्ही पक्षांना दुर्लक्षित करण्याचे कारणही तेच आहे. आगामी निवडणुकीतही ममतांची तीच रणनीती राहणार हे निश्चित आहे. भाजपनेही हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये त्याचा फायदाही झाला. पण सत्तेपर्यंत पोहोचण्याइतपत ताकद त्यांना मिळालेली नाही. ममतांसह स्थानिक नेत्यांना मानणारा मोठा हिंदू वर्गही आहे.
स्थानिक अस्मितेचा मुद्दाही ममता अनेकदा उचलून धरत भाजपला टार्गेट करतात. त्याचा फायदाही तृणमूलला होतो. मागील निवडणुकीत ममतांना २१३ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ ७७ जागांवर विजय मिळविता आला होता. मुस्लिमबहुल ७५ जागा वगळल्या तरी ममतांना मिळालेल्या उर्वरित १३८ जागांवर हिंदूंचे वर्चस्व आहे. ममतांची केवळ मुस्लिमधार्जिण्या अशी ओळख निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न या मतदारांवर प्रभाव टाकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या स्थितीत ममतांचा पराभव करून सत्ता काबीज करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.