

Qatar lng facility attack : इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युध्दाला आता गंभीर वळण लागले आहे. इस्त्रायलकडून इराणमधील तेल साठ्यांना लक्ष्य केले जात असतानाच आता इराणनेही जगाला हादरविणारे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने काही तासांपूर्वीच जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गॅसच्या प्रकल्पावर हल्ला केला आहे. कतारमधील रास लाफान या प्रकल्पावर क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत.
अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने अनेक आखाती देशांवर हल्ले चढविले आहेत. आतापर्यंत प्रामुख्याने या देशांमधील अमेरिकन सैन्यांचा तळांना लक्ष्य केले जात होते. मात्र मध्यरात्री इराणने सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला केल्याने जग हादरले आहे. इराण माघार घेण्यास तयार नसल्याने पश्चिम आशियासमोर गंभीर परिणामांचे सावट उभे ठाकले आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर कतारमधील प्रकल्पातील गॅस उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कतार हा जगातील सर्वात मोठ्या LNG उत्पादक देशांपैकी एक आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया या देशांमध्येही या गॅसचे मोठे उत्पादन होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही इराणनेही अन्य गॅस प्रकल्पांवर हल्ले केले होते. पण त्याचा मोठा परिणाम झाला नव्हता.
इराणच्या कठोर भूमिकेमुळे आधीच होर्मूज सामुद्रधुनीमध्ये विविध देशांची ७०० हून अधिक मालवाहू जहाजे अडकली आहेत. त्यामध्ये भारताच्या जहाजांचाही समावेश आहे. इराणने भारतासह अन्य काही देशांमधील जहाजांनाच तिथून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेकडून होर्मूज ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, इराणच्या कतारवरील हल्ल्याने आता अमेरिकेसह इस्त्रायललाही नरमाईची भूमिका घ्यावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
कतारने गॅसचे उत्पादन थांबविल्याने भारतासह जगातील अनेक देशांवर त्याचा परिणाम सहन करावे लागणार आहेत. भारत आंतरराष्ट्रीय बाजारातून सुमारे ५० टक्के नैसर्गिक गॅस आयात करतो. एकट्या कतारमधून जवळपास २० टक्के गॅस आयात केला जातो. त्यामुळे हे युध्द सुरूच राहिल्यास भारतावर काही प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी देशांतर्गत गॅस उत्पादन वाढविणे, इतर देशांमधून गॅसची आयात वाढविणे आणि गॅसचा वापर कमी करण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.