Chandrapur Politics  Sarkarnama
विश्लेषण

Chandrapur Politics : प्रस्थापित नेत्यांचे टेंशन वाढणार ? ‘हे’ दोन तालुके ठरवणार राजुऱ्याचा आमदार !

Rajura Assembly Election: राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी व जिवती हे तालुके येतात. या तालुक्याला अद्यापही विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.

संदीप रायपूरे

Chandrapur News: राजुरा विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आले तेव्हापासून राजुरा व कोरपना तालुक्यातील नेत्यांनी या क्षेत्रावर अधिराज्य गाजविले. प्रत्येक वेळी राजूरा विधानसभेचे प्रतिनिधित्व येथीलच नेत्यांनी केले. राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी व जिवती हे तालुके येतात. या तालुक्याला मात्र, अद्यापही विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी कुठल्याही स्थितीत आपल्याच तालुक्यातील उमेदवार आमदार झाला पाहिजे, अशी भावना गोंडपिपरी व जिवती तालुक्यात आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आजपर्यत जे-जे आमदार निवडून आले. त्यांनी राजूरा व कोरपना तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले. गोंडपिपरी व जिवती तालुके अद्यापही विकासापासून कोसो दूर आहेत. गोंडपिपरी व जिवती तालुक्यात ना सिंचनाच्या सुविधा झाल्या, ना येथील तरुणांना रोजगार मिळाला. अशावेळी मात्र, गोंडपिपरी व जिवती तालुकावासीयांना आपल्याच तालुक्यातील उमेदवार हवा, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी स्थानिक नेत्यांनी आत्तापासून फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

गोंडपिपरी हा ओबीसीबहुल तालुका आहे, तर जिवतीत आदिवासी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जातीची लोकसंख्याही लक्षणीय आहे. मागील निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गोदरू पाटील जुमनाके यांनी चाळीस हजाराहून अधिक मत घेतली होती. वंचितने त्यांना पाठिंबा दिला होता.

राज्यात राजकीय स्थिती गोंधळलेली आहे. शिवसेनेत फूट पडली. शिंदे गट सत्ता पक्षात सामील झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन गट पडले. कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना असे अनेक पर्याय असल्याने यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची संख्या चांगलीच वाढणार आहे.

तालुक्यात स्थानिक उमेदवार हवा, अशी हवा झाली आहे. त्याचा फायदा घेण्याकरिता नेते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हास्तरीय आढावा बैठक चंद्रपुरात नुकतीच पार पडली. यात जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल यांनी चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा विधानसभा क्षेत्र आपल्या वाट्याला आले पाहिजे, अशी मागणी रेटून धरली. महेंद्रसिंह चंदेल स्वतः राजुरा विधानसभा क्षेत्रातून लढण्यास इच्छुक आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात त्यांनी आत्तापासून कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपकडून माजी आमदार संजय धोटे, देवराव भोंगळे व सुदर्शन निमकर हे विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावून बसलेले आहेत. अशातच गोंडपिपरी भाजपचे नेते अमर बोडलावार यांचे कार्यकर्ते राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांची पसंती बोडलावार यांनाच असल्याचे सांगत आहेत. गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील मतदारांचा कौल स्थानिक उमेदवाराला असल्याच्या चर्चेने राजुऱ्यातील प्रस्थापित नेत्यांचे टेंशन वाढले आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT