Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला आहे. अपयश बाजूला सारून सत्ताधारी महायुतीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.
दोन्ही बाजूंकडे एकापेक्षा अधिक पक्ष एकवटल्यामुळे इच्छुकांची निराशा होणार आहे. त्यातून काही ठिकाणी पक्षांतरे होत आहेत, आगामी काळात बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विविध संस्थांचे निवडणूकपूर्व सर्व्हेक्षण (Survey) समोर येऊ लागले आहेत आणि त्यासरशी नेते, कार्यकर्त्यांची धडधड वाढू लागली आहे.
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या. विधानसभेला हे वातावरण राहणार नाही, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकताच तसा दावा केला आहे. मात्र आपलीच सत्ता येईल, विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) 'गेमचेंजर' ठरेल, असा विश्वास महायुतीला आहे. ही एकच योजना महायुतीला तारू शकेल का, हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 'इंडिया टुडे-सी व्होटर'ने 'मूड ऑफ नेशन' हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतील अंदाज महायुतीची झोप उडवणारे आहेत. अर्थात, हा केवळ अंदाज आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
असे असले तरी पक्षांची फोडाफोडी, मराठा आरक्षण (Maratha Reservation) आदी मुद्द्यांमुळे महायुतीला ही निवडणूक सोपी जाणार नाही, याचे संकेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दिले आहेत. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 150 ते 160 आणि महायुतीला 120 ते 130 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला 44 टक्के तर महायुतीला 42 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फारसा अंतर नव्हता, मात्र जागांमध्ये मोठा अंतर पडलं. या सर्व्हेनुसार आघाडी आणि युतीच्या मतांमध्ये दोन टक्क्यांचा फरक दिसतो आहे. अंदाजानुसार महाविकास आघाडीला दोन टक्के मते अधिक मिळत आहेत. निवडणुकीला आणखी किमान अडीच महिने वेळ शिल्लक आहे.
त्यामुळे हे अंदाज त्यावेळी लागू होऊ शकतील का, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. आघाडी आणि युतीमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष, अपक्ष सामावलेले आहेत. मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे पक्षही रिंगणात उतरणार आहेत. मतविभाजन होईल का आणि झाले तर त्याचा फायदा कोणाला होईल, हे महत्वाचे ठरणार आहे.
बदलापूर (Badlapur) अत्याचार प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पीडित चिमुकल्या मुलींच्या पालकांना पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या कथित वागणुकीमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर बदलापुरात लोकांनी आंदोलन केले, दगडफेक झाली. लोकांचा रोष लक्षात घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन विरोधकांनी प्रायोजित केल्याचा आरोप केला.
अशा संवेदनशील प्रसंगात सत्ताधाऱ्यांनी संयम बाळगायला हवा होता. एमपीएससी (MPSC) आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. याही आंदोलनाला काँग्रेसने फूस दिल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आला आहे. आयबीपीएसची परीक्षा जानेवारीमध्ये जाहीर झालेली असताना त्याच दिवशी एमपीएससी पूर्व परीक्षा कशी घेतली जाऊ शकते? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडायला हवा होता. शिवाय, विद्यार्थ्यांना यासाठी आंदोलन करावे लागते, हेही दुर्दैवी म्हणावे लागेल.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक येत आहे. लोकांची मेमरी शॉर्ट असते, असे म्हटले जाते. लोक हे सर्व विसरणार का? असा प्रश्न महायुतीला पडलेला असणार. लोकांनी हे विसरू नये, यासाठी महाविकास आघाडीकडून नक्कीच प्रयत्न केले जातील. सर्वेक्षण करताना या बाबींचा विचार केला जात असेल का, हे महत्वाचे आहे.
पक्षांची फोडाफोडी, त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मिळालेली सहानुभूती, त्यांच्यावर करण्यात आलेली वैयक्तिक टीका, केवळ विरोधकांच्या मागेच तपास यंत्रणांचा ससेमिरा आदी मुद्द्यांमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीतही हे मुद्दे चालतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, 'मूड ऑफ नेशन' सर्व्हेमुळे महायुतीचे नेते, कार्यकर्त्यांची धडधड वाढलेली असणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.