Sharad Pawar : शरद पवारांचा नवा डाव कोल्हापुरात महायुतीला धोबीपछाड देणारा?

Assembly Election 2024 Mahayuti NCP Kolhapur : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी टाकलेले कोडे महायुतीला सोडवता आले नव्हते. विधानसभा निवडणुकीतही तसे होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना बारामतीत अडकवून ठेवण्यासाठी भाजप आणि महायुतीने आखलेले डावपेच आठवतात का? त्यावर मात करत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली होती. बारामतीत अडकून राहणे तर दूरच, जवळच्या माढा आणि सोलापूरसह राज्यभरात फिरून त्यांनी महायुतीला जेरीस आणले होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अगदी काहीच दिवसांनंतर बाहेर पडलेल्या पवारांनी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला घेरण्यासाठी डावपेच आखायला  सुरुवात केली आहे. सनदी लेखापाल (सीए) असलेले भाजप नेते समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणिते जुळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे (जि. कोल्हापूर) आमदार, मंत्री हसन मुश्रीफ यांना जोरदार झटका दिला आहे. घाटगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा हा पहिला डाव. मुश्रीफ हे महायुतीत आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांना विरोधाची भूमिका घाटगे यांनी घेतली होती, मात्र असे काही होऊ शकेल, याची कल्पना महायुतीने केलेली नसेल. घाटगे यांनी घाईत पाऊल उचलू नये, असे सांगत असताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जाणारे होते.  

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar
Kolhapur Politics : फडणवीस-पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात कसोटी, मेळाव्यात नाराजांची उपस्थिती ठरवणार महायुतीचं भवितव्य

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी महायुतीला एक नव्हे, असे तीन धक्के बसले. बदलापूर अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी, संस्थाचालकांवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे महायुती सरकार आधीच बॅकफूटवर गेले आहे. भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून देसाई यांना निवडणूक लढवायची आहे. मात्र प्रकाश आबिटकर हे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने देसाई यांनी राजीनामा दिला. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडीमध्येही मंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला होता. समरजित घाटगे यांनी ईडीला आपल्याविरोधात खोटी कागदपत्रे दिली, असा आरोप त्यावेळी मुश्रीफ यांनी केला होता. घाटगे यांनी कागल मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात अजितदादा पवार हेही महायुतीत सहभागी झाले. अजितदादांसोबत मुश्रीफ हेही महायुतीत आले. त्यामुळे घाटगे यांची अडचण झाली.

मुश्रीफ महायुतीत आल्यानंतरही घाटगे यांनी त्यांच्यावर हल्ले सुरूच ठेवले होते. मात्र भाजप सोडण्याचे संकेत त्यांनी दिले नव्हते. आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या पोटात गोळा आला आहे. शरद पवार हे सप्टेंबरच्या सुरुवातीला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असून, त्यावेळी घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sharad Pawar
Bjp News : भाजपच्या शिष्टमंडळाकडून समरजितसिंह घाटगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

घाटगे यांचे मन वळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मला जनतेतून आमदार व्हायचे आणि त्यासाठी मी एका पक्षात प्रवेश करणार आहे. भाजपची अडचण मी समजू शकतो, मला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, असे त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले आहे.

छत्रपती राजर्षि शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे ते वंशज आहेत. ते सध्या श्री छत्रपती शाहू दूध आणि अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आहेत. कागल मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली आणि मुश्रीफ यांचा 28 हजार मतांनी विजय झाला. त्यांना 1,16,436 मते मिळाली होती. अपक्ष लढलेले समरजित घाटगे यांना 88,303 तर शिवसेनेचे संजय घाटगे यांना 55,657 मते मिळाली होती.

अजितदादा पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असा लेख राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसिद्ध झाला होता. अजितदादा पवार महायुतीत नको, अशी जाहीर भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर घेतली होती. शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. मुश्रीफ यांना शह देताना त्यांनी भाजपचीही कोंडी केली आहे.

शिवाय अजितदादांना महायुतीत घेतल्यामुळे भाजप नेत्यांवर अन्याय होत आहे, या समजालाही बळकटी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात परत आले होते. धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमदेवार झाले आणि निवडूनही आले. तसेच डावपेच आता शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आखले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा गुरुवारी (दि, 22) कोल्हापुरात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, विकास खुंटवणाऱ्या सरकारचे स्वागत, असे उपहासात्मक फलक कोल्हापुरात लावण्यात आले होते.

एका दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या या घडामोडी महायुतीसाठी धक्कादायक ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपयशातून बाहेर पडून महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. केवळ हीच योजना आपल्याला तारू शकते, असे महायुतीला वाटत असताना शरद पवार यांचे डावपेच समोर येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com