Mns News : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका पक्षनिर्मितीपासूनच तळ्यात-मळ्यात अशीच राहिली आहे. त्यामुळे त्यांना पक्ष निर्माण करून 17 वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणासोबत जायचे आहे ? हे ठोस ठरवले नसल्याने अडचणी येत आहेत. 2009, 2014 व 2019 मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संभ्रम पाहण्यास मिळतो. त्यातूनच आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी उघडपणे टीका केली जात आहे.
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे राज ठाकरे 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. राज ठाकरे यांच्या या बंडाने शिवसैनिकांना आणि पक्षाला मानणाऱ्या मराठी मतदारांना धक्का बसला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी 2006 मध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वकृत्त्वशैली लाभलेल्या राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा वापरून राजकारणात बस्तान बसवले. आक्रमक वक्तृ्त्वशैलीमुळे राज ठाकरे यांनी सुरुवातीला काळात मराठी मतदारांना मनसेकडे आकृष्ट करण्यात चांगलेच यश मिळवले.
1. 2006 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नवख्या मनसेने पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आणले. नाशिक व पुणे महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले होते, तर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. राज ठाकरे यांच्या या नेत्रदीपक यशामुळे शिवसेनेसमोर खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले होते. मात्र, यशाची ही घोडदौड राज ठाकरेंना पुढे कायम ठेवता आली नाही.
2. त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भूमिका बदलत गेल्याने त्यांच्या पक्षाच्या यशाचा आलेख खालावत गेला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी इतर पक्षाला पोषक भूमिका घेतली तर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक साधून शिवसेनेशी युती करण्याची बोलणी केली. मात्र, ती बोलणी फिस्कटली. त्यामुळे पुन्हा स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी मनसेला विधानसभेच्या एक जागेवर समाधान मानावे लागले.
3. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेतली, तर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. त्यामुळे केवळ एकच आमदार निवडून आला.
4. आता 2024 च्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असली तरी अद्याप यांनी कोणासोबत जायचे, ही भूमिका ठरवलेली नाही. सध्या भाजपला दूर ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवत आहेत. त्यांची ही भूमिका महायुतीसाठी पोषक असली तरी भाजप, अजित पवार गट व रिपाइंला रुचणार का, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उघडपणे टीका केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
5. रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. यावेळी राज ठाकरे हे महायुतीपासून लांबच बरे, असं सांगतानाच राज ठाकरे महायुतीत आल्यास महायुतीचं नुकसानच होईल. सर्वाधिक फटका हा भाजपला बसेल, असा दावाही आठवले यांनी केला. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही.
6. एकीकडे भाजप मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांना आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाशी जवळीक साधण्यास संगितले जात असले तरी महायुतीमधील इतर मित्रपक्षाकडून मनसेला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात महायुतीमधील घटक पक्ष काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
7. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका अन्य मित्रपक्षांना चुकीची वाटते आहे. आधी ते सर्व समाजाला घेऊन जात होते. मात्र, आता त्यांनी मुस्लिम समाजाला दूर करून हिंदुत्वाच्या बाजूने झुकणारी घेतलेली भूमिका यामुळे सर्वसामान्य नागरिकांत त्यांच्याविषयी संभ्रम कायम आहे.
(Edited by Sachin Waghmare)