Satara : मंत्री छगन भुजबळ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नायगावात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. मात्र, छगन भुजबळ आणि चाकणकर यांना अभिवादन करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत काही जणांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरती दुग्धाभिषेक केला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ दुग्धाभिषेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
पुतळ्यांचे शुद्धीकरण करणारे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसेचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. दुग्धाभिषेक केल्यानंतर पाणी ओतून रुमालाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पुतळे स्वच्छ करण्यात आले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
ज्या वृत्तीने, ज्या मनुवादी विचारांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना प्रचंड त्रास दिला. त्यांची नाहक बदनामी केली. अशा प्रकारच्या वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन मंत्रिपद भोगतात. स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी हे लोक त्याच्यासोबत जाऊन बसतात. असे असताना हे लोक आज या ठिकाणी येऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. म्हणून या विरोधात आम्ही सावित्रीबाई यांना दुग्धाभिषेक घातला, असे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ आणि चाकणकर यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी इथून पुढे अभिवादन करताना विचार करावा, अशा इशारा देखील मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
दरम्यान, आज (बुधवारी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुष्पहार अर्पण सावित्रीबाईंना अभिवादन केले. त्यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भुजबळांच्या अभिवादनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.