Mahesh Landge and Devendra Fadnavis
Mahesh Landge and Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Mahesh Landge : पवारांना आव्हान देण्यासाठी फडणवीस आपल्या 'पठ्ठ्या'ला ताकद देणार का?

उत्तम कुटे

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची सत्ता उलथलून २०१७ ला श्रीमंत पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आली. शहरातील पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप या बदलाला कारणीभूत ठरले.

त्यामुळे ते शहराचे कारभारी झाले. त्यानिमित्ताने उद्योगनगरीला पहिल्यांदा स्थानिक नेते हे कारभारी म्हणून लाभले. त्यातील जगतापांचे या महिन्यात निधन झाल्याने आता लांडगे यांच्या खांद्यावरच ही जबाबदारी आली आहे.

कार्यकर्त्यांचे दादा असलेले आ.लांडगेंना शहर कारभारी म्हणून शाबीत होण्यासाठी तसेच ते पुढे कायम ठेवण्याकरिता आता दोन परिक्षा पास कराव्या लागणार आहेत. त्यातील पहिली पुढील महिन्यातच होऊ घातली आहे. आ.जगतापांच्या निधनामुळे होत असलेली चिंचवडची पोटनिवडणूक त्यांना जिंकायची आहे.

ते पक्ष शहराध्यक्ष असल्याने पक्षाने ती जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. त्यानंतर त्यांना या ना त्या कारणामुळे गेले वर्षभर लांबलेली पिंपरी महापालिकेचीही सार्वत्रिक निवडणूक जिंकून तेथील सत्ता टिकवायची आहे.

त्यासाठी त्यांना पक्षाकडून ताकद मिळण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. राज्यातील पक्षाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून ती त्यांच्या पठ्याला (पैलवान आ.लांडगेंना) मिळेल, अशी आ.लांडगेंच्या हितचिंतकाला आशा नाही, तर खात्री वाटते आहे. कारण ते फडणवीसांच्या गुडबुकातील आहेत. त्यामुळे वाट वाकडी करून फडणवीस हे खास दिल्लीहून इंद्रायणी थडी यात्रेच्या उद्घाटनाठी परवा (ता.२५) आले. त्यांनी या महोत्सवाचे तोंडभरून कौतूकही केले.

महिला बचतगट आणि नवोदितांना संधी असा सांस्कृतिक स्वरुपाचा हा महोत्सव असला तरी आ.लांडगेंनी त्यात संवेदनशीलता आणि सहवेदनाही (दिवंगत आ.जगताप, कसब्याच्या मुक्ता टिळक, मावळचे मा.आ.दिगंबर भेगडे, शिरुरचे मा.आ.बाबुराव पाचर्णे यांचे अर्धाकृती पुतळे उभारून) जपल्याचे दिसले. पक्षाचा ‘आत्मा’ अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारून त्यांनी पक्षनिष्ठाही दाखवून दिली.

दरम्यान, राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून त्याच्या चर्चेत आ.लांडगे आघाडीवर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रभावी दावेदार कांचन कुल आणि त्यांचे पती दौंडचे आमदार राहुल कुल या दोघांनीही इंद्रायणी थडीला हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही लोकप्रतिनिधी, नेत्यांनीही उपस्थिती दर्शवली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पवारांना आव्हान देण्यासाठी फडणवीस आपल्या 'पठ्ठ्या'ला ताकद देणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT