Natha Shewale-H. D. Devegowda
Natha Shewale-H. D. Devegowda Sarkarnama
व्यक्ती विशेष

देवेगौडांनी नाथा शेवाळेंवर सोपवली महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेशाध्यक्षपदी नाथा हरिभाऊ शेवाळे (Natha Shewale) यांची निवड करण्यात आली. यापूर्वी ते जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (Natha Shewale elected as Maharashtra State President of Janata Dal)

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Devegowda) यांच्या बेंगलोर येथील निवासस्थानी झालेल्या छोटेखानी सोहळ्यात, त्यांच्याच हस्ते शेवाळे यांना प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासह जनता दल राष्ट्रीय कार्यकारीणीचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

शेवाळे हे जनता दलाचे गेले २५ वर्षांहून अधिक काळ सक्रिय सभासद असून, जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकीक आहे. पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष तसेच युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यात व देशभर जनता दलाची पडझड होत असतानाही त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहून आपली निष्ठा सिद्ध केली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशी तसेच त्यांच्या कुटुंबाशी विशेष लोभ जोपासलेल्या शेवाळे यांना त्यांच्या खास विश्वासातील कार्यकर्ता म्हणूनच ओळखले जाते. देवेगौडा यांच्यासह माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्याशीही वैयक्तिक संपर्क व संबंध राखलेले ते जिल्ह्यातील एकमेक कार्यकर्ते आहेत.

इंजिनिअर पदवीधारक असलेल्या शेवाळे यांनी शेतकरी, कामगार, बेरोजगार तसेच वंचित, दलित, आदीवासी घटकांसाठी गेले अनेक वर्षे विशेष कार्य केले आहे. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी म्हणून त्यांनी तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर अनेक आंदोलने केली. जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद पाटील यांच्यासमवेत त्यांनी या मागणीसाठी राज्यभर दौरे काढून जागृती केली आहे. नोटाबंदी, टोलबंदीसह बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करताना त्यांनी राज्याच्या ग्रामीण भागात विशेष काम केले आहे.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कारेगाव (ता. शिरूर) सारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावातून आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या शेवाळे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला थेट प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने पक्षाबरोबरच शिरूर तालुका व परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT