राजकीय पराभवच माहित नसलेले विजयसिंह पंडित गेवराईच्या मैदानात

पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद अशी विजयसिंह पंडित यांची चढती राजकीय कारकिर्द राहीलेली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना त्यांच्यावर कुठलाही आरोप झाला नाही.
Gevrai NCP Candidate Vijaysinh Pandit
Gevrai NCP Candidate Vijaysinh Pandit

गेवराई (जि. बीड) : पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषद अध्यक्ष अशी चढती राजकीय कारकिर्द राहीलेल्या विजयसिंह पंडित यांचा सन २००० पासून २०१७ पर्यंत एकदाही पराभव झालेला नाही. एकाच वेळी दोन जिल्हा परिषद गटांतून विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे. कायम विजयच मिळविलेले विजयसिंह पंडित आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून गेवराईच्या रिंगणात उतरले आहेत.

जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे धाकटे चिरंजीव असलेले विजयसिंह पंडित मागच्या तीन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा दुणावला आहे. दरम्यान, शिवाजीराव पंडित यांनी तीन वेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना विविध खात्यांचे मंत्रीपदही सांभाळले. त्या माध्यमातून मतदार संघात विकासांची कामे आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारली. नंतर अमरसिंह पंडित यांनीही एकदा विधानसभा आणि एकदा विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून ही फळी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, मतदार संघातील एकमेव सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, बाजार समितीच्या माध्यमातून पंडितांची मतदार संघात ताकद आहे. त्याच बरोबर शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग २१ वर्षांपासून १८०० सामुदायिक विवाह, जलसंधारणाची कामे, १२ वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण, ३५ गावांत जलसंधारणाची कामे, १५०० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रीया आदी सामाजिक उपक्रमांतही पंडितांचा कायम पुढाकार राहीलेला आहे. दरम्यान, या खेपेला विजयसिंह पंडित मैदानात उतरले आहेत. विजयसिंह पंडित यांची राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता  राहीलेला आहे. 

सन २००० मध्ये गेवराई मतदार संघात विजसयिंह युवा मंचची स्थापना करुन राजकीय मैदानात उतरलेल्या विजयसिंह पंडित यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून पहिला विजय मिळविला आणि उपसभापतीही झाले. पुढच्या खेपेला जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरलेल्या विजयसिंह पंडित यांनी एकाच वेळी पाचेगाव व सिरसदेवी या दोन गटांतून विजयश्री मिळविण्याची किमया साधली. दरम्यान, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहीलेल्या विजयसिंह पंडित यांनी सुरुवातीला कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद सांभाळले. तर, २०१४ ते १७ या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहीले. विशेष म्हणजे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचार वा अनियमितेचा कुठलाही आरोप झाला नाही. 

सध्या पूर्णत्वाकडे येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीचा मार्गही त्यांच्याच काळात सुकर झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम विजयश्री खेचलेल्या आणि चढती राजकीय कारकिर्द राहीलेल्या विजयसिंह पंडित यांनी व्हॉलीबॉल, तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहीले. तीन वर्षांपासून मतदार संघात लढण्याची तयारी करणाऱ्या विजयसिंह पंडित यांनी युवकांची फळी गोळा करताना शेतकऱ्यांच्या आणि निराधारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोठे आंदोलनेही केली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या जयंत्यांचे आयोजन करत युवकांना एकत्रित केले. आता ते गेवराईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. कायमच विजयश्री माहित असलेल्या विजयिंह पंडित विजयाची परंपरा कायम राखतीलच, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com