Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते राज्यात संतापाची लाट उसळली आहे. श्रीरामांबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान अंगलट आल्यानंतर आणि राज्यभरात आव्हाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्यानंतर आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी माध्यमासमोर येऊन सांगितले. मात्र, आव्हाड याच्या दिलगिरीतूनही मस्तीचेच प्रदर्शन होत असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुहास दाशरथे यांनी केली. जितेंद्र आव्हाडांसारखी विकृत बुद्धीची मंडळी शरद पवारांनी (Sharad Pawar) सांभाळली म्हणून याच कारणाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांसोबत कधीही राजकीय घरोबा केला नाही.
ज्या संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे आदर्श तसेच श्रद्धास्थान आहेत. त्यांच्याबद्दल कायम अशा पद्धतीने जनतेच्या भावनेचा अनादर करत नको त्या गोष्टीवर कायम टीका करणे व स्वतच्या कवडीमोल बुध्दीने विकृतीचे दर्शन घडवणे हा आव्हाडांचा जणू छंदच बनला आहे.
प्रभू श्रीरामाचे भक्त जे आज संपूर्ण देशात प्रभू श्रीरामाचा जागर करत आहेत, ते प्रभू श्रीराम भक्त कधीही माफ करणार नाहीत. या आव्हाडांची कायम तळी उचलणारे संजय राऊत आता काय बोलणार ? हे बघावे लागेल. कारण अशा प्रवृत्ती बरोबर जाऊन आघाडी करणारे, हिंदुत्वाची भूमिका सोडणारे उद्धव ठाकरेही आव्हाड प्रकरणावर मौन बाळगून आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कायम विकृत बोलायचं आणि चर्चेत राहायचं हे आव्हाड यांच्यासाठी काही नवीन नाही. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच राहते, अशी टीकाही दाशरथे यांनी केली. आव्हाड याने मस्तीत दिलगिरी व्यक्त केली, ती आम्हाला कदापी मान्य नाही, त्याच्याविरोधात राम भक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही जिल्हाभरात आणि मराठवाड्यातील ठिकठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असेही दाशरथे यांनी सांगितले.
(Edited by Sachin Waghmare)