बदनापूर: बदनापूर - अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला. या मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले आहेत. नारायण कुचे यांना 1 लाख 5 हजार 312 तर बबलू चौधरी यांना 86 हजार 700 मते पडली. तर वंचित बहुजन आघाडी व मनसे निष्प्रभ ठरले.
बदनापूर विधानसभा मतदार संघ भाजप - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र राज्यात निवडणुकी दरम्यान निर्माण झालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची लाट व बबलू चौधरी यांचा यापूर्वी दोनदा झालेल्या पराभवाची सहानुभूती त्यांना विजयाचा उंबरठा ओलांडण्यास सहाय्यभूत ठरेल असा तर्क लढवला जात होता. पण नारायण कुचे यांनी तो चुकीचा ठरवत दुसऱ्यांदा विजय मिळवला.
महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी प्रचारा दरम्यान विकासाच्या मुद्यावर जोर दिला होता. अखेर मतदारांनी भावनिक राजकारणाला नाकारत विकासाला मत देत नारायण कुचे यांना विजयी केले. मतमोजणीत नारायण कुचे यांनी टपाली मतदानापासून आघाडी घेतली होती. ही आघाडी बबलू चौधरी अखेरपर्यंत तोडू शकले नाही. नारायण कुचे यांनी निर्णायक आघाडी घेताच भाजप - शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
वंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे यांना 9 हजार 869 , तर मनसेचे राजेंद्र भोसले यांना केवळ 1643 मते मिळाली.
कुचे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा झाली होती. तर जवळच असलेल्या परतूरमध्ये लोणीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव देखील कुचे यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.