घरात थांबून कोरोनाशी लढा द्या : आमदार नारायण कुचे 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन आणि वैद्यकीय यंत्रणा देत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. या आजाराचा मुकाबला आपण एकत्रितरित्या करू या.- आमदार नारायण कुचे
घरात थांबून कोरोनाशी लढा द्या; आपली आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी केले आहे.
घरात थांबून कोरोनाशी लढा द्या; आपली आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी केले आहे.

बदनापूर: आपल्या राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या आपण फेज दोनमध्ये आहोत. तिसऱ्या फेज मध्ये जाऊच नये यासाठी आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन आणि वैद्यकीय यंत्रणा देत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. या आजाराचा मुकाबला आपण एकत्रितरित्या करू या, असे आवाहन बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी `सरकारनामा'शी बोलताना केले.

आमदार कुचे म्हणाले, ``अवघ्या जगाने कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे. चीन, इटली, इराण अशा राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मोठी हानी झाली आहे. सुदैवाने आपल्या भारतात कोरोनाचा आजार दुसऱ्या टप्यात आहे. मात्र आता आपण वेळीच सावध झालो नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी घाबरून चालणार नाही तर आपल्याला सामंजस्याची भूमिका घेत सरकार आणि वैद्यकीय यंत्रणांनी सुचविलेल्या प्रतिबंधक उपाययोजना पाळाव्या लागतील. 

या आजाराचा सामना आपण संयम आणि संकल्पाने करू शकतो, असा संदेश देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते, त्यास सर्व देशवासीयांनी उत्तम प्रतिसाद देत घरीच थांबण्याची स्वागतार्ह भूमिका घेतली होती. ही भूमिका यापुढेही कायम ठेवल्यास निश्चित आपण तिसऱ्या टप्यापर्यंत पोचणार नाहीत. 

कोरोना विषाणूचा धोका ओळखून सर्वांनी घरातच थांबावे.आता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. म्हणजेच अतिमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू शकणार नाही.  आपण एकत्रितरित्या या कोरोनाचा सामना निश्चित करू शकतो आणि कोरोनाला हद्दपार करू शकतो, असा विश्वास मनामनात जागवा असे आवाहनही कुचे यांनी केले.

केंद्र आणि राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईलाजास्तव अनेक सेवा बंद केल्या आहेत, कोरोनाचा धोका टळल्यावर त्या पुढे पूर्ववत सुरू होतील.

व्यापाऱ्यांनीही व्यवसायाच्या बाबतीत दुराग्रह न ठेवता परिस्थितीचे भान राखून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्यामुळे जनतेला फारशी अडचण येणार नाही. नागरिकांनी वेळोवेळी आपले हाथ साबण किंवा निर्जंतुक करणाऱ्या द्रावणाने धुवावे. ठराविक अंतरावरूनच एकमेकांशी बोलावे, वेळोवेळी कोमट पाणी प्यावे, उत्तम प्रथिने असलेले अन्न ग्रहण करावे, जेणे करून आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कार्यक्षम राहील. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com