परळीत मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा;  धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

परळी विधानसभा मतदारसंघात मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावेत, तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाइल टॉवर यंत्रणा बंद ठेवावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
NCP Leader Dhananjay Munde
NCP Leader Dhananjay Munde

औरंगाबाद : परळी विधानसभा मतदारसंघात मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावेत, तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाइल टॉवर यंत्रणा बंद ठेवावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. 

देशात मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम यंत्रे हॅकिंगची जोरदार चर्चा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात तातडीने जॅमर बसवण्यात यावेत. या दोन्ही ठिकाणांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री आणि भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावांत चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच ईव्हीएम यंत्रे हॅक केले जाण्याची भीती मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com