वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरून असदुद्दीन ओवैसी गायब? प्रकाश आंबेडकर लढवतायेत एकटेच किल्ला 

दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांना एकत्रित आणत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. सोबतीला 'एमआयएम' आल्याने प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांच्या संयुक्त सभांनी सत्ताधारी पक्षासंह प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती. पण लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना अचानक राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभांमधून एमआयएम गायब झाल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरून असदुद्दीन ओवैसी गायब? प्रकाश आंबेडकर लढवतायेत एकटेच किल्ला 

औरंगाबाद : दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांना एकत्रित आणत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. सोबतीला 'एमआयएम' आल्याने प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांच्या संयुक्त सभांनी सत्ताधारी पक्षासंह प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती. पण लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना अचानक राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभांमधून एमआयएम गायब झाल्याचे चित्र आहे. सांगली, नांदेड, बीड आणि आज (ता.13) नाशिक येथे होणाऱ्या संयुक्त सभेला देखील खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.

वंचित आघाडीचा किल्ला एकटे अॅड. प्रकाश आंबेडकर हेच लढवतांना दिसत असल्याने वंचित बहुजन आघाडी-एमआयएम मध्ये फूट पडली की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. कायम वंचित घटकांच्या मतांच्या जोरावर स्वातंत्र्य काळापासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस-आघाडीला धडा शिकवून वंचितांची महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा विडा प्रकाश आंबेडकर यांनी उचलला आहे. त्यांसाठी 27 वंचित घटकांसह मुस्लिम समाजाला देखील त्यांनी सोबत घेतले आणि संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या संयुक्त सभा झाल्या. लोखांच्या गर्दीत झालेल्या या संभांनी महाराष्ट्रात जणू राजकीय भूकंप आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने तर या नव्या समीकरणाला भाजपच्या फायद्यासाठी केलेला प्रयोग असल्याचे जाहीर करून टाकले. पण ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त सभांना होणारी गर्दी पाहून सगळ्याच राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. त्यातून या आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न देखील झाले. 

काँग्रेसने तर प्रकाश आंबेडकरांना आमच्या आघाडीत या असा प्रस्ताव देखील दिला. पण तो देत असतांना 'एमआयएम' नको अशी अट घातली. तर त्याला त्याच भाषेत प्रत्युतर देत आंबेडकरांनी देखील आम्हालाही राष्ट्रवादी नको अशी भूमिका जाहीर केली. अखेर काँग्रेस आघाडी सोबत जाण्याचे भिजत घोंगडे कायम ठेवत वंचित बहुजन आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानूसार महाराष्ट्रात 6 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान वंचित बहुजन आघाडीने एमआयएम सोबत एकूण 16 संयुक्त सभांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या तडाखेबंद भाषणांनी विरोधकांच्या पोटात गोळा उठणार अशी आशा बाळगली गेली खरी, पण 'एमआयएम'च्या अनुपस्थितीमुळे सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरात आंबेडकर-ओवेसी यांची संयुक्त सभा होणार होती. याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले होते.

पण प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणामुळे ओवेसी या सभेला हजर राहू शकले नव्हते. त्यानंतर पुण्यात झालेल्या सभेला देखील ओवेसी येऊ शकले नाही, पण त्यांच्या अनुपस्थितीत एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते आणि आमदार इम्तियाज जलील यांनी या दोन्ही ठिकाणी जोरदार भाषण देत ओवेसीची उणीव काही प्रमाणात भरून काढली होती. 

बीडची सभा फसल्याची चर्चा
वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या टप्यातील जाहीर सभांना 6 जानेवारीला सांगलीतून सुरूवात झाली. या पहिल्याच सभेतील ओवेसी यांची अनुपस्थिती सगळ्यांना खटकली. त्यानंतर मराठवाड्यातील बीडच्या सभेतही हेच चित्र दिसले. विशेष म्हणजे ओवेसींच्या गैरहजेरीत सभा गाजवणारे त्यांच्या पक्षाचे आमदार इम्तियाज यांनी देखील आंबेडकरांच्या सभेकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे या दोन्ही सभांना ओवेसी उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरभर लावण्यात आले होते. पहिल्या टप्यातील वंचित आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी झाली. गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या वंचित आघाडीची बीडमधील सभा फसल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. ओवेसी येणार नसल्याची कुणकूण लागल्यामुळे मुस्लिम समाजाने या सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोजक्‍या गर्दीसमोरच प्रकाश आंबेडकरांनी भाषण केले. 

नांदेड, बुलडाण्यातील उमेदवारीने वाद?
बीड येथील सभेच्या आधी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे ओबीसी परिषद आणि सत्ता संपादन एल्गार परिषद घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील धनगर मतदारांची लक्षवेधी संख्या पाहता आंबेडकरांनी नांदेड लोकसभेसाठी प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. या आधी त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाची घोषणा केली होती. नेमक याच कारणामुळे एमआयएम नाराज असल्याची चर्चा आहे. एकंदरित लोकसभा निवडणुकांचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकेल, अशावेळी वंचित आघाडी- एमआयएम यांच्यात दुरावा आल्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com