Ahmadnagar Politics News : गुजरातमध्ये भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळविल्यानंतर शहरातील भाजप नेत्यांच्या दंडावरील बेटक्या अधिक फुगू लागल्या आहे. शहराचा आमदार भाजपचाच असेल, असा विश्वास पक्षाचे नेते महेंद्र गंधे यांच्यापासून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे. येथे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपला कोणत्याही परिस्थितीत 'संग्राम' हवाय.
जिल्ह्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर असे दिसते, की बारा आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सहा, भाजप तीन, काँग्रेस (Congress) दोन आणि शिवसेना (Shivsena) पुरस्कृत एक, असे आमदार निवडून आले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये राष्ट्रवादीने चांगली प्रगती केली. याचा अर्थ असा आहे, की राष्ट्रवादीची आजच्या तारखेत ताकद सर्वांत मोठी आहे.
२०१९ मध्ये वेगळाच चमत्कार घडला आणि युती तुटली. शिवसेना दोन्ही काँग्रेसबरोबर गेली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) महसूलमंत्री बनले, तर प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले. अडीच वर्षांनंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संधी मिळाली. आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरवात झाली आहे. भाजपला तीनचा आकडा पार करायचा आहे. त्यासाठी आखाडे बांधले जात आहेत.
इतर मतदारसंघांपेक्षा भाजपला शहरात आपला आमदार निवडून आणायचा आहे. तसे पाहायला गेले, तर विद्यमान आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचा कोण आमदार असेल, तो कोणता चेहरा असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शहरात आज भाजपचे जे चेहरे आहेत, त्यांमध्ये महेंद्र (भैया) गंधे, अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे आदींची नावे समोर असली, तरी गंधे, आगरकर सोडता एकही वजनदार नेता दिसत नाही.
सत्ता खेचून आणण्याची धमक भाजप नेत्यांमध्ये आहे. मात्र, तो चेहरा पुढे आणतील की आयाराम असेल, हे सांगता येत नाही. संग्राम जगताप यांची शहरावर पकड आहे. त्यांना आव्हान देणारा तितक्याच तोलामोलाचा हवा. मात्र, जगताप यांच्याविरोधात शड्डू ठोकून रणांगणात उतरण्यासाठी भाजप कसा संग्राम (लढाई) करते, हे पाहावे लागेल.
आजच्या घडीला विचार करता, भैया गंधे आगामी निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. ते संग्राम जगताप यांना फाइट देतील का, हाही प्रश्न असला, तरी आणखी दीड वर्ष वेळ आहे. तेव्हा काय होईल, कोण कुठे असेल. हे मात्र, आज सांगता येत नाही. आजपर्यंत शहरात भाजपचा कधीच आमदार होऊ शकला नाही. भविष्यात झाला तर तोही इतिहास होईल.
शहरातील आजपर्यंतचे आमदार
१९६२, त्र्यंबक भारदे, काँग्रेस
१९६७, एस. व्ही. निसळ, काँग्रेस
१९७२, नारायणदास बार्शीकर, काँग्रेस
१९७८, कुमार सप्तर्षी, जनता दल (जेएपी)
१९८०, एस. एम. आय. असीर काँग्रेस (आय)
१९८५ दादाभाऊ कळमकर (काँग्रेस एस)
१९९० अनिल राठोड (शिवसेना)
१९९५ अनिल राठोड (शिवसेना)
१९९९ अनिल राठोड (शिवसेना)
२००४ अनिल राठोड (शिवसेना)
२००९ अनिल राठोड (शिवसेना)
२०१४ संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
२०१९ संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.