
संतोष शेंडकर
सोमेश्वरनगर : 'हौसाक्का' यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ब्रिटीशांचे जुलमी राज्य नष्ट व्हावे, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटीशांच्या गाडीवरती छापा टाकला. वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून त्यांनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजी या ठिकाणी पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्ये होते, अशा शब्दात इतिहासाचे अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी हौसाअक्का यांचा गौरव केला. तसेच हौसाअक्का यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी मागणीही केली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले हे कोकाटे यांनी 'सरकारनामाशी' बोलताना नमूद केले.
कोकाटे म्हणाले, हौसाक्का चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातेचे निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळले. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्कांनी हातात तिरंगा घेऊन त्या ब्रिटिशांच्याविरुद्ध रस्त्यावर आल्या. त्यांची जडणघडण करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही, परंतु ज्या पद्धतीने पाण्यातील माशाला पोहायला शिकवायची गरज नसते, तसे घडले.
पुरुषाप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि बुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी मुलींना शिक्षण, शाळेपासून वंचित ठेवत असलेल्या काळात दाखवून दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हौसाक्का शांत बसल्या नाहीत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी त्या सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत बाबासाहेब पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केला. सांगली या ठिकाणी शिवसन्मान जागर परिषदेमध्ये सनातन्यांनी येऊन जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या सनातन्यांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या, अशी आठवण कोकाटे यांनी मांडली.
हौसाक्का पाटील या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही, तर त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी आहेत.
कारण अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेक वेळा छापा टाकला. स्वातंत्र्यानंतर देखील अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला.
इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. आज त्यांचे दुःखद निधन झाले. ही वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे अशा शब्दात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.