एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि नाना पटोलेंनाही भारी ठरले...

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या इच्छेविरुद्ध झाला निर्णय
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांत वर्चस्व वाढवून एकमेकांना शह देण्याच्या इराद्याने चारऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आटापिटा केला खरा; पण या दोघांना बाजुला सारून शिवसेनेने आपल्याच मनाप्रमाणे मुंबईत एक आणि इतर ठिकाणी तीन सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांत गमाविलेली सत्ता पुन्हा खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सोयीचे म्हणजे, दोन सदस्यांच्या प्रभागांची पध्दत निश्चित करण्यावर भर देऊनही शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार, पटोलेंचे मनसुबे उधळून लावले आणि शिवसेनेच्या विस्तारासाठीचा पहिला डाव जिंकला. भाजपने केलेली चार सदस्यीय प्रभागरचना उधळून लावण्याच्या प्रयत्नात दोन्ही काॅंग्रेसला सेनेने झटका दिला आहे. शिवसेनेने या प्रक्रियेत भाजपला अनुकूल अशी प्रभागरचना केल्याची प्रतिक्रिया भाजपच्याच गोटातून येत आहे.

Eknath Shinde
महाविकास आघाडीसाठी सोपे वाटप : तीन पक्ष; पालिकांसाठी तीनचा प्रभाग

प्रभाग पद्धतीच्या लढाईत शिंदे हे पवार, पटोलेंना भरी पडल्याचे उघड आहे. निवडणुका आधीच्या बैठकांत ठरवून प्रभागांचा आकार, सदस्य संख्या कमी करण्याच्या भूमिकांवर शिवसेनेने पाणी फेरल्याने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांत संताप आहे. दोन सदस्यांचा प्रभाग करण्याकडे काणाडोळा केल्यास कायदेशीर लढाई लढण्याचा दम पटोले यांनी ठाकरे सरकारलाच भरला आहे.

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आल्यापासून या तिन्ही पक्षांनी आपापला अजेंडा रेटून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपच्या झंझावातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पिछेहाट झालेल्या दोन्ही काँग्रेस आता सत्तेतून पुन्हा ताकदवान ठरण्याची रणनीती आखली आहे. त्यातूनच या दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरण्याच्या शक्यतेने दोन सदस्यीय प्रभाग पध्दत आणण्यासाठी पवार, पटोले यांनी ताकद लावली.

एक सदस्यानुसार प्रभागरचनांचा आराखडा करण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश येऊनही ही संख्या बदलणार असल्याचे अजित पवार यांनी वेळोवेळी जाहीर केले होते. या विषयावर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलताना दोनचाच प्रभाग असेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला होता. हिच पद्धत राष्ट्रवादीला अधिक यश मिळवून देण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांनी तयारीही चालविली होती.

Eknath Shinde
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने बंडखोरांना बसणार वेसन

दुसरीकडे, तीन किंवा चार सदस्यांच्या प्रभागात निभाव लागणार नसल्याच्या भीतीने एक आणि त्यानंतर दोन सदस्यांचाच प्रभाग हवा, अशी काँग्रेसची आग्रही भूमिका होती. अशा स्थितीत मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी दोनपेक्षा अधिक म्हणजे चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या बेतात शिवसेना होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस नेत्यांशी बैठका, चर्चा केल्यानंतर बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चार सदस्यांच्या प्रभागांचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरून चर्चा करून तीन सदस्यांचा केल्याचे शिंदे यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. परंतु, शिवसेनेने विशेषतः मुख्यमंत्री उद्वध ठाकरे आणि शिंदे यांनी पवार, पटोलेचा प्रस्ताव गुंडळून ठेवत, तीन सदस्यीय प्रभाग ठरविला.

Eknath Shinde
काॅंग्रेसचे नेते चिडले : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत मान्य नसल्याचा ठराव

प्रभाग पद्बातीबाबत अपेक्षाभंग झाल्याचे पडसाद काँग्रेसच्या वर्तुळातून उमटली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांत वर्चस्व निर्माण केले. मुंबई, कोकण वगळता अन्य शहरांत विस्तारण्यासाठी आपल्याकडील सत्तेचा वापर करून बस्तान बसविण्याची शिवसेनेची चाल आहे. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅंग्रेस यांच्या व्यूहरचनेला रोखून शिवसेनेने टाकल्याचे दिसत आहे. या साऱ्या योजनेत नगरविकासमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. या निर्णयानंतर काॅंग्रेसने आगपाखड केली. प्रदेश कार्यकारिणीत विरोधाचा ठराव केला. मात्र मंत्रीमंडळाच्या बैठकीत काॅंग्रेस मंत्र्यांनी हा प्रस्ताव का मंजूर होऊ दिला, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com