पुणे : ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) एका उद्योगपतीच्या माध्यमातून मला २४ नोव्हेंबर २००८ रोजी ताज हॉटेलमध्ये बोलावून घेतले. पवारसाहेब त्यावेळी मला म्हणाले की ‘शिरूरमधून (Shirur) मला लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवायची आहे, त्यामुळे तुम्ही उभं राहू नका.’ मी म्हणालो, ‘‘साहेब माझ्याकडेच दोन पर्याय आहेत. मी बसतो घरी पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना घरी बसवा.’ त्याला पवारांनी नकार देत ‘ते होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचवेळी पवारांनी मला दोनवेळा राज्यसभेव पाठवण्याची ऑफर दिली होती,’’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितले. (Pawarsaheb, I sit at home; But in assembly elections Walse Patil should also sit at home : Adhalrao)
शिवसेनेचे उपनेते तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आढळरावांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात आढळराव यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
आढळराव म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसशी आतापर्यंत संषर्घ केल्याचे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे पक्षाशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणे, हे मला या जन्मातही कदापि शक्य नाही. कारण तसं असतं तर महाविकास आघाडीचा २०१९ मध्ये जो प्रयोग झाला आहे ना, तो यापूर्वीच झाला असता. हे सर्व महाराष्ट्राला माहिती नाही, मला माहिती आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. मी ते सत्य आज उघड करतो. लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची सभा आपण शिक्रापूरमध्ये घेण्याचे ठरविले होते. आक्टोबर महिन्यात ती सभा होणार होती. आपण आपल्या बाजूने सर्व तयारी केली होती.
सभा रद्द करण्याचा नार्वेकरांचा निरोप
दुसऱ्या बाजूने चर्चा होती की ज्येष्ठ नेते शरद पवार शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होते. त्याचदरम्यान आपल्या सभेला केवळ आठच दिवस बाकी होते. मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला आणि म्हणाले, ‘शिवाजीराव, तुम्हाला उद्धवसाहेबांची सभा रद्द करावी लागणार आहे.’ मी म्हटलं ‘का’? त्यावर नार्वेकरांनी सांगितले की, साहेबांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांची तब्येत जरा बरोबर नाही. मी म्हटलं सभेला आठच दिवस राहिलेत. चौदाशे गाड्यांचे पैसे वाटले आहेत. सभेची जोरदार तयारी केली आहे. त्यानंतरही नार्वेकर म्हणाले की, मला काही माहिती नाही. पाहिजे असेल तर तुम्ही संजय राऊतांशी संपर्क साधा, असे आढळराव यांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना नमूद केले.
अवघ्या दहा मिनिटांत सभेसाठी फोन आला
आढळराव म्हणाले की, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांच्याकडे गेलो. त्यावेळी ते म्हणाले की या, या तुमचीच वाट पाहत होतो. (यावर उपस्थितांमध्ये एकच हस्या पिकतो ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली युती होणार आहे. फक्त शिरूरच्या जागेवरून अडलं आहे. शरद पवारांना शिरूरमधून लढायचं आहे. तुम्ही लोकसभेत जाल; पण शिरूरमधून नव्हे तर मावळमधून जावं लागेल. आता पुणे, त्यावेळी मावळ आणि आणखी चार वर्षे राहिलो असतो तर मला बारामतीमधून लढायला पाठवलं असतं. त्यावर मी म्हटलं, राऊतसाहेब मला तिकीट द्या अथवा न द्या, हरकत नाही. पण, सभा का रद्द करता. राऊत म्हणाले की शरद पवार यांच्यासोबत आपली बोलणी चालू आहे. आढळरावांना उद्धव ठाकरे यांची सभा घ्यायला लावू नका, असा त्यांचा निरोप आहे. मी म्हटलं चालेले माझी काहीच हरकत नाही. तुमची बोलणी चालू द्या. पण पवारांच्याही मतदारसंघातील सभा रद्द करायला सांगा. त्यावर राऊत म्हणाले की, पवारांना आपण कसं सांगणार? त्यावर मी म्हणालो की मला कसं तुम्ही सांगणार. मला गृहीत धरू नका, असे सांगून मी तेथून निघून आलो. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मला फोन आला. त्या सभेत शरद पवार सोडून सगळ्यांवर टीका झाली.
सुभाष देशमुखांच्या माध्यमातून प्रयत्न
या घटनेच्या आदल्या दिवशी त्यावेळी माझ्याबरोबर सोलापूरचे सुभाष देशमुख खासदार होते. त्यांना शरद पवारांनी सांगितलं होतं की, तुमच्या मित्राला पटवा, शिरूरमधून उभा राहू नको म्हणून. त्यानंतर एका महिनाभरानंतर शरद पवारांनी एका उद्योगपतीच्या माध्यमातून मला ताज हॉटेलमध्ये बोलावून घेतले. हॉटेलमध्ये आमची तासभर चर्चा झाली. मी म्हटलं की मला जर शिरूरमधून उभं राहायचं नसेल, तर मला बाळासाहेबांशी बोलावे लागेल. त्यावर पवार म्हणाले की तुम्हाला दिल्लीलाच जायचे आहे ना. मग तुम्हाला दोनवेळा राज्यसभा देतो. त्यांचा प्रस्ताव मी नाकारून मी बाळासाहेबांना विचारेन असे सांगून निघून आलो. त्यावेळी मी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं की हे असं असं सुरू आहे, तेव्हा ते म्हणाले की कोण सांगितलं हे. त्यानंतर राष्ट्रवादीशी सुरू असलेली युतीचं बोलणी बंद झाली. मला गद्दारीच करायची असती तर त्याचवेळी राष्ट्रवादीची राज्यसभेची खासदारकी स्वीकारली असती. पण, माझ्या डोळ्यापुढे शिवसैनिक होते. त्यामुळे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो, असेही स्पष्टीकरण आढळराव यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.