Madhavrao Scindia : मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद

Vijaya Raje Scindia known popularly as the Rajmata of Gwalior vs son Madhavrao Scindia : माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
Madhavrao scindia rajmata scindia
Madhavrao scindia rajmata scindiaSarkarnama
Published on
Updated on

राजकारणात चांगलाच जम बसवलेलं ते राजघराणं. आई राजकारणात, एकुलता एक मुलगाही राजकारणात आणि कन्याही राजकारणात. मुलानंही आपल्याप्रमाणे भाजपचं राजकारण पुढे न्यावं, असं आईला वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. पहिल्यांदा जनसंघाच्या उमेदवारीवर लोकसभेत पोहोचलेल्या मुलानं नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आई-मुलामध्ये येथेच वादाची ठिणगी पडली. पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की आईनं लिहिलेल्या मृत्युपत्रात मुलाला आपल्या अंत्यसंस्काराचे अधिकारही नाकारले होते. हा वाद ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील, ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे आणि माधवराव शिंदे यांच्यातला.

राजकारणात या राजघराण्याचा प्रभाव आजही कायम आहे. माधवराव शिंदे हे नऊवेळा लोकसभेवर निवडून गेले, त्यांनी केंद्रात विविध मंत्रिपदं भूषवली. ते गांधी घराण्याचे अत्यंत निकटवर्तीय होते. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. काँग्रेसमध्ये असताना ज्योतिरादित्य शिंदे हेही राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. माधवरावांच्या एक भगिनी वसुंधराराजे यांनी दोनवेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्या भाजपच्या दिग्गज नेत्या आहेत. 1957 पासून आतापर्यंत या राजघराण्यातील सदस्य कायम लोकसभेचा किंवा विधानसभेचा सदस्य राहिलेला आहे. अशा प्रकारची किमया साधणारं हे देशातील एकमेव घराणं असावं.

तसं पाहिलं तर ग्वाल्हेर घराण्याच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसमधूनच सुरू केली होती. कालांतरानं त्या स्वतंत्र पार्टीमध्ये गेल्या आणि पुढे भाजपच्या संस्थापक सदस्य बनल्या. सी. राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती. 1959 ते 1974 पर्यंत हा पक्ष अस्तित्वात होता. काँग्रेसममध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे सी. राजगोपालाचारी यांनी काँग्रेसपासून वेगळं होत स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती. 1974 मध्ये या पक्षाचं भारतीय लोकदल पक्षामध्ये विलीनीकरण करण्यात आलं.

माधवराव शिंदे यांना 1971 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढवली ती जनसंघाच्या पाठिंब्यावर. मतदारसंघ होता गुना. पुढे 1979-1980 मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. यावरूनच मुलगा आणि आईमध्ये वादाला सुरुवात झाली. माधवराव शिंदे यांनी भाजपमध्ये राहावं, असं विजयाराजे यांना वाटत होतं, मात्र जनसंघाकडून निवडणूक लढवणं, ही आपली चूक होती, असं माधवराव यांना वाटत होतं.

त्यापूर्वी आई आणि मुलामध्ये अत्यंत दृढ नातं होतं. माधवराव अगदी आपल्या मैत्रीणींबाबतही मातुःश्रींशी बोलत असत, असा उल्लेख विजयाराजे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. असं सांगितलं जाातं की, माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यात 1972 पासूनच दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. विजयाराजे त्यावेळी जनसंघात होत्या आणि माधवरावांना जनसंघ सोडून काँग्रेसमध्ये जायचं होतं. शिक्षण पूर्ण करून ऑक्सफर्डहून भारतात परतल्यानंतर जनसंघात जाणं, ही आपली मोठी चूक होती, असं माधवरावांना वाटत होतं, तसं त्यांनी मान्यही केलं होतं.

Madhavrao scindia rajmata scindia
Shivajirao Patil Nilangekar : दोन गुण वाढवल्याचा आरोप अन् मुख्यमंत्रिपद गेले...

सरदार बाळ आंग्रे हे राजमाता विजयाराजे यांते आर्थिक सल्लागार होते. सरदार आंग्रे यांचा विजयाराजे यांच्यावर मोठा प्रभाव होता. ही बाब माधवराव यांना आवडत नव्हती. कोणताही विचार न करता शिंदे घराण्याची मालमता राजकारणासाठी विकली जात होती. यासाठी सरदार आंग्रे कारणीभूत होते, असं माधवराव यांना वाटायचं. त्यामुळे सरदार आंग्रे हे मुलगा आणि आई यांच्यातील दुराव्याला कारणीभूत ठरले होते, असंही सांगितलं जातं. मात्र, सरदार आंग्रे यांचं मत वेगळं होतं. मध्य प्रदेशात 1972 मध्ये जनसंघाचा पराभव झाला होता. त्यामुळे घाबरलेल्या माधवरावांनी आईंची साथ सोडली होती, असं सरदार आंग्रे यांना वाटत होतं.

ग्वाल्हेर येथील शिंदे राजघराण्याच्या जयविलास पॅलेसमधून दागिने, संपत्ती गायब व्हायला सुरुवात झाली होती. असं सांगितलं जातं की, शिंदे घराण्याकडे सोने, चांदी आणि दागिन्यांनी भरलेल्या विहिरी होत्या. पण त्या विहिरी हळूहळू रिकाम्या व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे माधवराव यांना धक्का बसला होता. आपल्या मातुःश्री विजयाराजे यांच्याकडं व्यावहारिक दृष्टी नाही, असा समज माधवराव यांचा झाला होता. मुबंई आणि देशभरातील अन्य ठिकाणी असलेल्या मालमत्ता कवडीमोल दरानं विकल्या जात होत्या. यामुळे माधवराव त्रस्त झाले होते.

या व्यवहारांच्या मागे सरदार आंग्रे हेच होते, असा दावा केला जात होता. या व्यवहारांपोटी आंग्रे यांना कमिशन मिळत असे. या विक्रीतून आलेली काही रक्कमही राजमाता विजयाराजे आंग्रे यांना देत असत. त्यामुळेच विजयाराजे आणि माधवराव शिंदे यांच्याच कटुता वाढत गेली, असं माधवराव यांच्या चरित्रात म्हटले असल्याचे दाखले दिले जातात.

असं म्हणतात की, राजमाता विजयाराजे यांचा स्वभाव अधिकार गाजवण्याचा होता. माधवराव शिंदे यांच्या पत्नी माधवीराजे यांच्यामुळे आई आणि मुलात दुरावा आला, असंही त्यांना वाटत असे. एक काळ असा होता, की सर्वांच्या समोर माधवराव हे माझी पादत्राणे उचलत असत. त्यात त्यांना संकोच वाटत नसे. मात्र त्यांच्या पत्नी माधवीराजे यांना ते सहन झालं नाही, असं राजमाता विजयाराजे एकदा म्हणाल्या होत्या. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि विजयाराजे यांना कारागृहात जावं लागलं होतं. त्या वेळी माधवराव हे नेपाळला निघून गेले होते, असंही विजयाराजे यांनी सांगितल्याच्या नोंदी सापडतात.

सरदार आंग्रे हेही जनसंघात होते. जनसंघानं त्यांना मध्यप्रदेशातून राज्यसभेवर घेतलं होतं. सरदार आंग्रे यांच्या सल्ल्याशिवाय आमच्या कुटुंबात कोणताही निर्णय घेतला जात नसे, असे विजयाराजे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. आंग्रे आणि विजयाराजे यांची विचारसरणी एकच होती. हिंदू धर्माबाबत त्यांच्या धारणा सारख्याच होत्या. शिंदे कुटुंबियांचं हित त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, त्यातूनच आंग्रे हे या कुटुंबियांचे आर्थिक सल्लागार बनले होते. याला माधवरावांनी विरोध केला होता, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. त्यामुळं ते नाराज झाले होते.

राजमाता विजयाराजे आणि माधवराव यांच्यातील वाद वरचेवर विकोपालाच जात होते. असं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी या दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखला, राजशिष्टाचाराचं पालन केलं. त्यात कधीही कसूर झाली नाही. आई आणि मुलगा एकत्रितपणे अनेक सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायचे. महेंद्र प्रताप सिंह हे माधवरावांचे खासगी सचिव होते. त्यांचे काम राजमाता विजयाराजे यांनाही आवडत असे. दौरा असला की ते चोख व्यवस्था ठेवायचे, असं राजमातांना वाटत असे. त्यामुळे विजयाराजे दौऱ्यावर असल्या की त्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी महेंद्र प्रताप सिंह यांच्यावर येऊन पडायची. माधवरावही त्यासाठी परवानगी द्यायचे. मात्र एकदा अशाच दौऱ्यावर असताना सरदार आंग्रे यांनी महेंद्र प्रताप सिंह यांच्या समक्षच माधवराव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वापरले होते. त्यानंतर राजमाता विजयाराजे यांच्यासोबत आपण यापुढे दौऱ्यावर जाणार नाही, असं सिंह यांनी माधवरावांना सांगून टाकलं होतं.

Madhavrao scindia rajmata scindia
A. R. Antulay : धडाकेबाज मुख्यमंत्र्याला घोटाळ्याचा डाग

माधवरावांशी बिनसल्यामुळं विजयाराजे या सरदार आंग्रे यांच्यावर अधिक अवलंबून राहू लागल्या. आणीबाणीच्या काळात विजयाराजे तुरुंगात होत्या, तर माधवराव नेपाळमध्ये होते. त्यावेळी सरदार आंग्रे हे ग्वाल्हेरमधील जयविलास पॅलेसजवळील हिरणवन पॅलेसमध्ये राहायला लागले होते. आंग्रे यांच्या पत्नीनं जयविलास पॅलेसमधील झुंबरं, गालिचे, ढाली आदी मौल्यवान वस्तू काढून आणल्या होत्या, असं सांगितलं जातं. पुढे काँग्रेसची सत्ता आल्यानंतर माधवराव यांनी या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भलताच प्रकार घडला होता. माधवरावांचे कर्मचारी या वस्तू आणण्यासाठी आंग्रे राहत असलेल्या हिरणवन पॅलेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांवर गोळीबार केला होता.

राजकारणातील काही घडामोडीही आई आणि मुलामधील कटुता वाढवणाऱ्या ठरल्या. माधवराव यांनी 1984 च्या निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला होता. दुसरीकडे, रायबरेली लोकसभा मतदारसंघातून 1980 मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडून राजमाता विजयाराजे यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

राजमाता विजयाराजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शंभर रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. राजमाता विजयाराजे या पहिल्यांदा 1957 मध्ये गुना मतदारसंघातून लोकसभेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमध्ये 10 वर्षे राहिल्यानंतर त्यांनी जनसंघात प्रवेश केला होता. त्यानंतरही त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. राज्यसभेवरही त्यांना संधी मिळाली होती.

Madhavrao scindia rajmata scindia
BJP Politics : लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप नव्या दमाने 'माधव'च्या मागे

नमिता भंडारे आणि वीर सांघवी यांनी माधवराव शिंदे यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्या आत्मचरित्रानुसार राजमाता विजयाराजे यांच्या अखेरच्या दिवसांत मुलासोबतचा त्यांचा दुरावा कमी झाला होता. राजमाता रुग्णालयात दाखल होत्या. त्यावेळी माधवराव नेहमी रुग्णालयात जात आणि त्यांच्याशेजारी तासन् तास बसून राहत. माधवरावांचा आवाज एेकला की राजमाता यांना दिलासा मिळत असे, त्यांच्या डोळ्यांत चमक येत असे. माय-लेकाचे डोळे भरून यायचे, असं या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

राजमाता विजयाराजे यांचं 25 जानेवारी 2001 रोजी निधन झालं. त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. विजयाराजे यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेल्या मृत्युपत्रात त्यांनी आपल्यावर अंत्यंस्कार करण्याचा माधवरावांचा अधिकार नाकारला होता. माधवराव हे त्यांच्या राजकीय मालकांचे गुलाम बनले आहेत. मला आणि माझ्या समर्थकांना त्रास देण्यासाठी ते त्यांच्या मालकांचा वापर करतात, असं मृत्युपत्रात लिहिलं होतं. हे मृत्युपत्र विजयाराजे यांच्या निधनानंतर 13 दिवसांनी समोर आलं होतं. मृत्युपत्रात अधिकार नाकारलेला असला तरी अंत्यसंस्कार मात्र माधवराव शिंदे यांनीच केले होते. राजमाता विजयाराजे यांच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी म्हणजे 30 सप्टेंबर 2001 रोजी एका विमान दुर्घटनेत माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सहा महिन्यांनी मार्च 2008 मध्ये सरदार आंग्रे यांचं निधन झालं.

राजमाता विजयाराजे यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून वादही ओढवून घेतला होता. सती प्रथेचं त्यांनी समर्थन केलं होतं, अशी माहिती उपलब्ध आहे. महिलांनी रंगीबेरंगी कपडे परिधान करू नयेत, चांगले भोजन करू नये, याऐवजी वैधव्याचा शोक करावा, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. विजयाराजे यांची दोन मृत्युपत्रं समोर आली होती. ती 1985 आणि 1999 मध्ये लिहिण्यात आली होती. हा वाद आता न्यायप्रवीष्ट आहे. 1985 च्या मृत्युपत्रानुसार माधवराव शिंदे यांना विजयाराजे यांनी आपल्यावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com