Sarkarnama Podcast : 'हे' खासदार का घाबरतात पक्ष सोडायला ?

शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही, असा परभणीचा इतिहास आहे….काय आहे ही रंजक कहाणी…..
Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast :Sarkarnama

Sakarnama Podcast : जगात जर्मनी व देशात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्नही वेगळाच आहे. १९८९ पासूनचा परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणी एक वेळेसचा अपवाद वगळता सलग सहा वेळा शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून आलाय..... विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही, असाही इथला इतिहास आहे. त्यामुळेच जून २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार व १३ खासदार बाहेर पडले. 

मात्र, अशा घडामोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेत..... त्यामुळे त्यांनीदेखील या पॅटर्नच्या धास्तीनेच बंडखोरी टाळली असल्याची चर्चा जोरात आहे. काय व कसा आहे हा आगळा वेगळा पॅटर्न, परभणीतला खासदार पक्ष सोडताना का घाबरतो, त्याचा असा आहे रंजक इतिहास...

नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचे मोठे गारुड होते. त्यामुळेच प्रत्येक जण शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेला...... मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे अनेकांसाठी दैवत आणि जीव की प्राण होते. त्या काळात आलेल्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने काँग्रेसची नवखा किनाऱ्यावर लावताना अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बालेकिल्ले मात्र बाळासाहेबांच्या झंझावातामुळे सुपडासाफ झाले. 

एकेकाळी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचे प्रभुत्व होतं..... विशेषतः परभणीत शिवसेनेचा गेल्या ३५ वर्षांपासून फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतो. फक्त १९९८ चा अपवाद वगळता एका वर्षातच पुन्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  आपल्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्क्यांनी तुडवा, असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे. त्याचमुळे परभणीत प्रत्येकवेळी पक्षाशी गद्दारी झाली, लोकांनी त्यांना घरी बसवले. 

परभणीचा इतिहास पाहता शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन गद्दारी करणाऱ्या खासदारांची संख्याही कमी नाही. पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या ३५ वर्षांत पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय, की पक्ष सोडताना प्रत्येक जण दहा वेळा विचार करत असतो.....की पक्ष सोडायचा की नाही. 

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यामधील ४ व जालना जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे......परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा तर जालना जिल्हा मतदारसंघातील परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : तुरुंगात साखरपुडा झालेला मुख्यमंत्री

परभणी लोकसभा मतदारसंघात  मुळच्या शिवसेनेच्या आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या, जिंकले पाच-दहा वर्षे खासदारकी भोगली आणि एवढे होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघूनही गेले. अशोक देशमुख या जिल्ह्यातील पहिल्या खासदारापासून ते आतापर्यंतच्या ॲड. गणेश दुधगांवकर यांच्यापर्यंत सर्वांच्याच बाबतीत हा अनुभव आलाय......अशोक देशमुख, ॲड. सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगांवकर या पैकी अनेकांनी तर दहा वर्ष खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलं...... पण कालांतरानं पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कुणी कॉंग्रेस,तर कुणी राष्ट्रवादीची वाट धरली. वीस-बावीस वर्ष उलटली तरी शिवसेनेच्या या राजकीय परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही.

१९९० च्या दशकात  मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. परभणी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा १९८९-९० साली शिवसेनेचे अशोक देशमुख, १९९१-९६ मध्ये  शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिले. मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अशोक देशमुख यांना खासदार केलं. पुढे केंद्रातलं नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केले.  यामुळे देशमुखांना १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. पण परभणीतले हे बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं..... त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवलं..... नवख्या असलेल्या सुरेश जाधवांनी यांनी अशोक देशमुख यांना अस्मान दाखवले होते. 

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद

त्यानंतर १९९८ च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला. हा एकमेव अपवाद असा वगळता  या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला नाही. १९९९ मध्ये शिवसेनेनं मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले. पण सुरेश जाधवांनीही २००४ च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मग शिवसैनिकांनीही त्यांना घरीच बसवले. 

२००४ मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे-पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले. पण अणू करारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसॊबत गद्दारी केली. त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे-पाटलांना चारी मुंड्या चित केलं.... या माध्यमातून पक्ष सोडणाऱ्या मंडळींना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखऊन दिले. 

शिवसेनेनं २००९ मध्ये मात्र नवा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंद केलं...

परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहीला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगांवकर अशी शिवसेनेसोबतच बंड करणाऱ्या  खासदारांची मोठी परंपरा आहे. त्याच मुळे येत्या काळात शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचं धाडस कोणी करू शकेल असे वाटत नाही. परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी  बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसविण्यासाठी सज्ज असतात असा हा गेल्या ३५ वर्षातला इतिहास सांगतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार व १३ खासदार बाहेर पडले. मात्र, अशा घडामोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे यांना सोडण्याचे धाडस करू शकलेले नाहीत, ते ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले, हेच त्या मागचे गुपित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com