Rajasthan News : एक इलाखा भयाण आणि भयावह भूतकाळ विसरू पाहतो आहे. कधी तरी या भागात डकैती किंवा दरोडेखोरी हेच वैशिष्ट्य बनून गेलं होतं. ज्यांनी यासाठी बंदूक हाती घेतली होती आणि म्हणून कायम तोंडं लपवत फिरणं व पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठीचा आटापिटा करत राहणं हेच ज्यांचं भाग्यधेय बनलं होतं असे लोक आता सांगतात ‘न डरेंगे, ना डरायेंगे...’ स्थिर समाजातल्या चारचौघांसारखं त्यांना जगायचं आहे. त्यासाठी कष्टाची तयारीही आहे. बंदुकीसोबतची फरफट त्यांना थांबवायची आहे. इतरांना भीती दाखवत; पण मनात कायम पकडलं जाण्याचं एन्काउंटरचं भय घेऊन जगणं भूतकाळात सोडून द्यायचं आहे.
ही कहाणी राजस्थानातील करौली जिल्ह्यातील दुर्गम आणि नावालाही रस्ता नसलेल्या वाड्या-वस्त्यांवरची. नावं अनेक आहेत वस्त्यांची, गावांची. कधी तरी नामचीन म्हणवल्या जाणाऱ्या उंचापुऱ्या दहशतबाज माणसांची; पण त्या नावांपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे ते तिथलं परिवर्तन. ते जगाला ओरडून सांगतं आहे, पाण्याचा अभाव जसं मूल्यांची घसरण एका टोकाला घेऊन जाणारं कारण बनू शकतं, तसंच पाणी मिळणं ‘अब तो सब आनंद ही आनंद है’ असे समाधानाचे बोलही प्रत्यक्षात आणतं.
बंदूक हाती असल्यानं मुजोर आणि बंदूक हाती असल्यानंच लाचार जीवन कंठणारे आपल्या शेतीत खपून सन्मानानं जगू पाहताहेत. करौली या ‘दस्यू-क्षेत्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक गावांत ही परिवर्तनाची लाट आणली ती जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आणि त्यांच्या ‘तरुण भारत संघा’च्या कार्यकर्त्यांनी. त्यासाठी त्यांनी जीवावरचा धोका पत्करला, स्थानिकांचा रोष सहन केला, ते यंत्रणांच्या हजार प्रश्नांना सामोरे गेले ते फक्त ‘माणूस बदलू शकतो’ या विश्वासावर. शेरणी आणि पार्वती या नद्यांच्या पुनरुज्जीवनातून हे परिवर्तन साध्य झालं.
या कहाणीची सुरुवात झाली तीन दशकांपूर्वी. डॉ राजेंद्रसिंह - ज्यांना या भागात सारे ‘राजिंदर’ म्हणून संबोधतात. त्यांनी जलसंधारणाची आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाची कामं सुरू केली होती. त्यात गावं पाणीदार बनत होती. करौलीतील एका गावात ही चळवळ आणि तिची फळं पोहोचली तेव्हा मूळच्या अलवरच्या; पण करौलीच्या दस्यू-क्षेत्रात विवाह झालेल्या एका महिलेच्या शेतातही पाणी आलं. पिकं डोलू लागली आणि चार पैसेही देऊन गेली. तिचा पती तेव्हाचा नामचीन डाकू होता, पाच-पन्नास खुनांपासून ते इतर कित्येक गुन्ह्यांत हवा असणारा म्हणून डोईवर इनाम असलेला.
बंदूकधारी दरोडेखोरांची त्याची एक टोळीही होती. अशा टोळ्या जे जे करतात ते ते सारं ही मंडळी करत होती. खून, अपहरण, खंडणी असं सारं काही. दरोडेखोरी हेच जीवन असल्यानं त्या महिलेचा पती आणि त्या डाकूंच्या टोळीचा सरदार फरारच असायचा. पिकं आल्यानंतर आणि चार पैसे कष्टानं मिळवू शकतो, याचा आत्मविश्वास आल्यानंतर त्या महिलेनं डॉ. राजेद्रसिंह यांना गावात बोलावलं पहाटे चार वाजता!
डॉ. राजेद्रसिंह घरी आले तेव्हा बंदूकधारी डाकूंनी त्यांना घेरलं. त्या महिलेनं साफा आणि पोशाख डॉ. राजेंद्रसिंह यांच्याकरवी पतीला दिला. पत्नीच्या या कृतीनं भारावलेल्या डाकूनं त्याच बैठकीत बंदूक टाकून दिली. आयुष्यभर दरोडे घालून जे जमलं नाही ते पत्नीनं कष्टानं शेतीतून केलं ही त्या पतीची भावना होती. ते शक्य झालं ते ‘तरुण भारत संघा’च्या जलसंधारणाच्या कामातून. हा डाकू आतून हलला होता. त्यानं समर्पण केलं तरी त्याची टोळी त्यासाठी तयार नव्हती आणि समर्पण केलं म्हणून पोलिस सुटकाही करणार नव्हते. त्यानं ‘काहीही होऊ दे, आता पुन्हा बंदूक हाती घ्यायची नाही,’ असा निश्चय केला आणि एका दहशतग्रस्त आणि अभावग्रस्त भागातली परिवर्तनाची सुरुवात झाली.
या डाकूला काही काळ जेलमध्येही राहावं लागलं. सरकार, पोलिस यांनीही हे प्रकरण सामंजस्यानं आणि माणसातल्या बदलाला समजून घेण्याच्या संवेदनशीलतेनं हाताळलं. यातूनच इतरही एकेक डकैत किंवा बागी, लूटमारीपेक्षा शेतीत स्थैर्याचं आणि सन्मानाचं जिणं जगता येतं, या निष्कर्षावर यायला लागले.
डॉ. राजेंद्रसिंह यांनी दरोडेखोरीत अडकलेल्या या मंडळींच्या नैतिकतेलाच हात घातला; पण तो जगणं भयमुक्त, सुंदर असू शकतं याचं उदाहरण घालून देत. यात समर्पणाच्या आधीच पुनर्वसनाचा सिद्ध झालेला मार्ग दिसत होता. तो ‘तरुण भारत संघा’च्या कामातून साकारला होता.
उघड्या-बोडक्या झालेल्या, क्वचित् काटेरी झुडपांशिवाय काहीही न उगवणाऱ्या आणि लाल राजस्थानी दगडांच्या खाणींनी जर्जर होत चाललेल्या भागात कोसळणारं पाणी अडवणं, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणं, चालणाऱ्या पाण्याला जमिनीच्या पोटात मुरवणं आणि सावकाशीनं हेच पाणी नदीसाठी स्रोत बनून येणं या जलसंधारणाच्या प्रयोगात होती. त्यातून आलेलं पाणी, जिथं काहीच उगवत नाही आणि पावसाळा सरताच सारा रखरखाटच उरतो - इतका की, या रखरखाटातून तयार होणाऱ्या उष्णेतच्या लाटा पावसाळी ढगांनाही दूर लोटतात - अशा परिसरात गहू, ज्वारी, बाजरी, मका अशी पिकं यायला लागली.
छोटे तलाव भरलेले दिसायला लागले. एकेका गावात हे लोण पोहोचत होतं. आता घराघरात हत्यार घेतलेले लोक ‘तरुण भारत संघा’च्या कार्यकर्त्यांना ‘आमच्या गावातही काम करा’ म्हणून बोलवायला लागले. यात एक तंत्र ठरवून घेण्यात आलं होतं...ते म्हणजे, ‘या कामांत गावाचा पुढाकार असला पाहिजे, जलसंधारणाच्या कामासाठी लागणाऱ्या निधीतील एक तृतीयांश वाटा गावानं आर्थिक रूपात किंवा श्रमदानाच्या रूपात उचलला तर उरलेला निधी संस्था देईल.’ यातून लोकांची या कामांशी बांधिलकी तयार झाली. या वाटचालीत दोन हजारांहून अधिक जणांना दरोडेखारीच्या अंधाऱ्या वाटेवरून शेती-पशुपालनाच्या प्रकाशवाटेवर आणण्यात आलं. ‘अब तो सब आनंद है’ असं इथं भेटेल तो सांगतो, त्याच कारण हेच.
डाकूंचं आश्रयस्थान बनलेल्या चंबळ खोऱ्याच्या या भागात कित्येकांसाठी लूटमार, खंडणी हाच जणू व्यवसाय होता. यात जे नव्हते ते भेदरलेलं जिणं जगत होते. राजस्थानातील हा परिसर लाल दगडांसाठी प्रसिद्ध आहे. डोंगरच्या डोंगर याच दगडानं तयार झालेले. त्या दगडांचं उत्खनन, त्यासाठीच्या खाणी हा तिथला आणखी एक व्यवसाय. अशा खाणींवर अचानक धडकायचं आणि वसुली करूनच बाहेर पडायचं हा टोळ्यांचा एक आवडता मार्ग. त्याला तिथं ‘धाडमार’ असं म्हटलं जायचं. हे सगळं करणाऱ्यांना एकतर दुर्गम भूगोल साथ द्यायचा; याबरोबरच, स्थानिकांचा या मंडळींना पकडण्यात असहकारच असायचा. सगळा व्यवहारच हिंसेवर आधारलेला, दहशतीवर बेतलेला.
यातून अहिंसक अर्थव्यवस्था, तीवर आधारलेला विकास आणि सामाजिक व्यवस्थेकडे जाणं इतकं सोपं नव्हतं. अर्थातच हा सगळा प्रवास सोपा-सरळ अजिबातच नव्हता, त्यात अनेक अडथळे आले. आणले गेले. याच वाटचालीत अनेकदा संस्थेच्या कार्यकर्त्यांचं अपहरण होण्याचेही प्रसंग आले. यातून खुद्द डॉ. राजेद्रसिंहही गेले. मात्र, ‘माणूस बदलू शकतो’ यावरचा विश्वास आणि बदलणारं पर्यावरण परिणाम घडवत होतं. ही एक अत्यंत काळजीपूर्वक करायची शस्त्रक्रिया होती. उमरी नावाच्या एका गावानं तर सहा वर्षं ‘तरुण भारत संघा’च्या कार्यकर्त्यांना गावात येऊ दिलं नव्हतं. त्याचं कारण आणखी वेगळं..
गावात जेमतेम ५० घरं, सगळी एकाच राजपूत समाजाची. तलाव बांधायचा तर गावानं काम करावं लागेल, हे या मंडळींना पटवूनच घेता येत नव्हतं. जेव्हा त्यांना पटलं की, हे करावंच लागेल, तेव्हा मात्र जिथं नीलगाई आणि लांडगे सहज दृष्टीला पडतात, अशा अत्यंत दुर्गम असलेल्या भागात उभ्या राहिलेल्या प्रचंड तलावाची सगळी जबाबदारी गावानं घेतली. तलावातील पाण्यावर वर्षात दोन-तीन पिकं गाव घ्यायला लागलं. साहजिकच, गावाचं अर्थकारण बदललं. याच नव्हे तर, बहुतेक गावांत तलावात मत्स्योत्पादन होतं. सिंघाड्याचं पीक तलावात काढलं जातं. शिवाय, शेतीतही पीक येतं आणि चाऱ्याची, पाण्याची सोय झाल्यानं गाई-म्हशीपालन सुरू झालं.
काही लाख लिटर पाणीसाठवण-क्षमतेपासून ६०-७० कोटी लिटर पाणी साठवणारे तलाव यात साकारले. तेही स्थानिकांचा सहभाग, स्थानिक सामग्री आणि पारंपरिक जलसंधारणाच्या ज्ञानातून. याचा परिणाम म्हणजे, ही कामं अत्यंत कमी खर्चातही झाली.
डॉ. राजेद्रसिंह यांचं पाण्याच्या क्षेत्रातलं काम जगाला माहीत आहे. जलसंधारणाचं एक आगळं शास्त्र त्यांनी विकसित केलं आहे. ते करताना आधुनिक, म्हणजे पाश्चात्त्य पद्धतीच्या, जलव्यवस्थापनाच्या नादी न लागता भारतातल्या पारंपरिक जलज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. यातून अवाढव्य धरणं, त्यांचे कालवे-पोटकालवे अशा कंत्राटदारकेंद्री जलव्यवस्थापनापेक्षा समूहकेंद्री, तसंच विकेंद्रित जलव्यवस्थापन आणि अनुभवांतून, परंपरेतून आलेल्या माहितीवर-ज्ञानावर आधारित त्या भागातील पाण्याच्या समस्येचं निराकरण हे त्यांनी चालवलेल्या चळवळीचं वैशिष्ट्य.
काही न उगवणाऱ्या मातीचाही जिथं अभाव होता अशा डोंगराळ भागात पहाडातील भेगा आडव्या की उभ्या, उताराची तीव्रता किती अशा काही अनुभवजन्य ठोकताळ्यांवर पाणी कुठं, कसं, किती अडवायचं याची गणितं मांडली गेली. हे ज्ञान डॉ. राजेंद्रसिंह रूढार्थानं अशिक्षित माणसांकडून शिकले होते. नैसर्गिक स्थितीचा अभ्यास करून उभारलेले ताल, तलाव, झाल, जोहड, बांध, पोखर त्याच परिसरातील साधनांतून बनतात.
शक्य तिथं यंत्रांचा वापर टाळण्यावर भर असतो. असे पाण्याचे साठे तयार झाले की ते वर्षानुवर्षं देखभालीविना पाणी देत राहतात. त्यांची रचनाच अशी असते की, कुठंही बांध फुटण्याचा धोका उरत नाही. बांधांच्या आत दिसणाऱ्या पाण्याइतकंच पाणी मुरणं आणि बाष्पीभवनापासून वाचवणं महत्त्वाचं ठरतं. जमिनीतील पाण्याची उपलब्धता जशी वाढेल तसं हे पाणी कूपनलिकांतून, विहिरींतून येतं. सुकलेल्या नद्यांतून वाहायला लागतं.
शेरणी आणि पार्वती या चंबळच्या उपनद्यांमध्ये हा बदल प्रत्यक्षात आला. ऐन मे महिन्याच्या भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात या नद्यांत भरपूर पाणी होतं. राजस्थानातल्या अत्यल्प पावसाच्या भागातही त्यांनी हेच यशस्वी करून दाखवलं. ज्या शेरणी आणि पार्वती या नद्यांच्या परिसरातील एक यशोकथा साजरी करण्यासाठी ‘सैरनी के शेरों के लिए’ म्हणून ‘तरुण भारत संघा’नं एक हाक दिली होती, त्या नद्या काही वर्षांपूर्वी अस्तित्वहीन बनल्या होत्या
पावसाळ्यात जे पाणी दिसेल तेवढंच. नंतर सारा ठणठणाटच. ही काही केवळ राजस्थानातीलच अवस्था नसून देशाच्या अनेक भागांत नद्यांची स्थिती अशीच आहे. नदीच्या नैसर्गिक अस्तित्वाकडे झालेलं दुर्लक्ष आणि अक्षम्य हेळसांड हेच या नद्यांचं वाळवंट बनण्यामागचं मूळ कारण. अशा नद्या पुन्हा जलसंपन्न करायचं हा भगीरथप्रयत्न.
ज्या भागात पाणी ठरतच नाही तिथं ते धरून ठेवणारी व्यवस्था नैसर्गिकपणे साकारली जावी हा या प्रयत्नाचा गाभा. एकदा त्यात यश आलं की, पाणी जमिनीत मुरणं आणि ते यथावकाश नदीपात्रात येणं आपोआप घडतं. शेरणी, पार्वती या नद्याही कधी तरी वाहत्या होत्या. तेव्हाही तिथं फार पाऊस पडत नव्हताच.
मात्र, पडलेलं पाणी धरून ठेवणारी नैसर्गिक रचना होती. यात झुडपं, कमी पावसाच्या क्षेत्रातील काटेरी वनस्पती, गवत यांचा वाटा महत्त्वाचा असतो. ही हिरवळ टिकायची तर जमिनीवर मातीही गरजेची असते. खाणकामामुळे आणि दुर्लक्षानं तीव्र उतारावरून वेगानं वाहणाऱ्या पावसाळी पाण्याबरोबरच माती बहुतेक ठिकाणी वाहून गेली होती आणि उघडे पहाड उरले होते. या भागात गवत, छोटी झुडपं तग धरतील अशी व्यवस्था करणं हा तिथल्या पाणी अडवण्याच्या कामातील कळीचा भाग होता. ते घडत गेलं आणि नद्या ‘सदानीरा’ बनल्या.
आता या भागातील लोकांना भूतकाळाच्या आठवणीही नको आहेत. साहजिकच, तिथं कुणी बदनाम इतिहासावर बोलायला इच्छुक नसतं. त्यापेक्षा पाणी आल्यानं गहू, मका अशा पिकांचं उत्पादन दहा पटींनी वाढलेलं सांगण्यात-दाखवण्यात त्यांना अधिक रस असतो. बऱ्याच तलावात सिंघाडा आणि मत्स्योत्पादन हे जोडव्यवसाय बनले आहेत. काही गावं यासाठी ठेके देतात. त्यातून येणारे पैसे गावाचे समजले जातात, पैशाची वाटणी न करता गावांच्या कामांसाठी ते वापरले जातात. ‘शेतीत मिळतं ते भरपूर आहे, बाकी उत्पन्न गावाचं’ असंही लोक सांगतात.
मिळालेल्या उत्पन्नातून घरांची डागडुजी, नवी घरं बांधणं, नव्या ठिकाणी घरं बांधणं आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं यावर लोक विचार करत आहेत. कधी तरी लाचार, बेकार, बीमार, फरार असलेली माणसं आणि व्यवस्था इज्जतदार, पाणीदार, मालदार बनतात. एकमेकांच्या सुखाचा विचार करायला लागतात. तेव्हा परिवर्तन याहून वेगळं काय असू शकतं? पाणी काय घडवू शकतं याची ही कहाणी, तसंच त्यासाठी काय करावं लागतं याचा हा धडाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.