Sarkarnama Podcast: अकारण बदनाम आझमगढ

Azamgarh History: देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं.
 Azamgarh History|
Azamgarh History|Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Podcast: अबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं. (Why Azamgarh got infamous for no reason)

एक मार्च १९७४ चा दिवस. पाटण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द झाल्यात. १८ मार्चला विधानसभेला घेराव घालण्याचं तरुणांनी ठरवलंय. 'जेपी' नेतृत्व करणार आहेत. बिहार सरकारबरोबरच केंद्र सरकारही घेराव अयशस्वी करण्याच्या प्रयत्नांत आहे. एक क्रांतिकारी समाजवादी नेता आंदोलनात सामील होण्यासाठी धडपडतोय. कसाबसा वाराणसीला पोचलाय. रेल्वेगाड्या तर बंद. तेवढ्यात बातमी येते... एक गाडी मुगलसरायला जाऊन तिथून पुढं पाटण्याला जाणार आहे. क्रांतिकारी नेत्यावर पोलिसांची करडी नजर आहे. अटक होण्याचा धोका आहे.... मग काशी हिंदू विद्यापीठाचे काही विद्यार्थी एक योजना बनवतात. क्रांतिकारी नेत्यानं विणकर बनून जायचं. लुंगी कुडता आणि गोल टोपी परिधान केलेले काही जण वाराणसी रेल्वे स्थानकावर पोचतात. पावला पावलावर पोलिस तरी हा नेता स्वतः विणलेल्या साड्यांचा गठ्ठा हातात घेऊन गाडीत बसतो. (Political Short Videos)

१८ मार्च १९७४ ला पाटण्यात जे घडलं, तो इतिहास आहे. याच घेरावाच्या वेळी इन्कमटॅक्स चौकात 'जेपी'वर पोलिसांनी लाठ्यांचे जोरदार प्रहार केले. या लाठीहल्ल्याचे देशाच्या कानाकोपऱ्यात उमटलेले प्रतिध्वनी इतके प्रखर होते, की इंदिरा गांधींचं सर्वशक्तिमान सरकारही डळमळलं. आंदोलनासाठी विणकराच्या वेशात पाटण्याला गेलेला तो नेता म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांना रेल्वेत बसवण्याची जबाबदारी उचलणारा विद्यार्थी नेता म्हणजे सध्याचे काँग्रेस प्रवक्ते मोहन प्रकाश! त्या वेळी 'बीएचयू' या विद्यार्थी संघटनेचे ते प्रभावी नेते होते. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची माहिती असणाऱ्यांना ठाऊक आहे, की आझमगडपासून मऊपर्यंत त्या वेळी चरख्यांचं जाळंच विणलेलं होतं. चादरी, रुमाल आणि बनारसी साड्या गावागावात विणल्या जात. एक विशिष्ट पेहराव करून या साड्या विकायला लोक गावोगावी जात. त्या वेळी कुणाचं संशयाचं बोट त्यांच्याकडे गेलं नाही.

 Azamgarh History|
Sarkarnama Podcast: संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरांचं योगदान

याच आझमगडच्या सरायमीर भागातल्या अबू सालेमची गुन्हेगारी जगतात चर्चा वाढली आणि आझमगडची ओळखच जणू बदलली. संपूर्ण आझमगड गुन्हेगारी आणि दहशतवादाचा गड वाटू लागला. पण आझमगडची एवढीच ओळख नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याची चर्चा देशपातळीवर सुरू झाली, तर मुस्लिम विद्वान मौलाना वहीदुद्दीन खान यांच्या नावाखेरीज ती पूर्ण होऊ शकत नाही. वहीदुद्दीन खान यांची जडणघडण आझमगडमध्येच झाली. उर्दू शायरीला नवे परिमाण देणारे आणि चित्रपटगीतांच्या इतिहासात स्वतंत्र अध्याय लिहिणारे कैफी आझमी आझमगडच्याच मेजवाँ भागातले. (Political Web Stories)

काही माथेफिरूंमुळे आझमगडच्या एका पिढीवरच देशद्रोही आणि दहशतवादी असल्याचं लेबल चिकटलंय. ते चिकटवणाऱ्यांनी ध्यानात घ्यायला हवं, की कैफी आझमींनी आपल्या आयुष्याची अखेरची वर्ष आपल्या मातीत मेजवाँमध्ये व्यतीत केली. स्वप्नांचं शहर मानल्या जाणाऱ्या मुंबईत ऐश्वर्य मिळवण्याच्या ओढीनं अनेक जण जातात. ते मिळाल्यावर आपल्या मातीचं स्मरणही त्यांना होत नाही. तेच ऐश्वर्य कैफी साहेबांकडे मुंबईत भरभरून असताना ते गावी परतले. हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रोलिंग यांच्या नावाची आज जगभरात चर्चा आहे.

मुलांसाठी गोष्टी लिहिणाऱ्या म्हणून रोलिंगना जो-तो ओळखतो; पण सनीमासीन खान हे नाव त्यांपैकी किती जणांना ठाऊक आहे? मुलांच्या गोष्टी लिहिणारे म्हणून जगविख्यात असलेल्या या लेखकाच्या साहित्यकृती मलय, पुश्तू, अरबी आणि बहुतांश पाश्चात्त्य भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. सनीमासीन खान यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं गेलं नाही, असा मुस्लिमबहुल देश क्वचितच आढळेल.

 Azamgarh History|
Sarkarnama Podcast: विरोधक करणार का भाजपचा करेक्ट कार्यक्रम?

आझमगडची स्थापना १६६५ मध्ये आझमखान या जमीनदारानं केली. विशेष म्हणजे, एका हिंदू जमीनदाराच्या मुस्लिम पत्नीचा आझमखान हा पुत्र. त्याची आई मेहनगरची. आझमखानचा भाऊ अजमत. त्यानं बांधलेला किल्ला आजही अजमतचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदू पिता आणि मुस्लिम मातेच्या पोटी जन्मलेल्या आझमखानच्या आझमगडला दंगल ठाऊक नाही. याच संगमाचा वारसा घेतलेल्या आझमगडमध्ये संमिश्र संस्कृतीची गंगा वाहते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात डोकावलं तर आझमगडच्या राष्ट्रवादाची प्रचीती येईल.

याच मातीत वीर कुँवरसिंहने ब्रिटिशांना बरंच झुंजवलं. याच काळात आणखी एक मुस्लिम विद्वान शिबली नोमानी यांनी जगावर ठसा उमटवला. सर सय्यद अहमद खाँ यांचे सहकारी असणारे शिबली नोमानी इतिहास, इस्लाम, तत्त्वज्ञान आणि सूफी साहित्याचे मर्मज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. मक्केपर्यंत यात्रा करून मोहंमद पैगंबरांशी संबंधित गोष्टींचा त्यांनी संग्रह केला. त्या गोष्टी ते शब्दबद्ध करू शकले नाहीत; पण त्यांचे उत्तराधिकारी मोहंमद सय्यद सुलेमान नदवी यांनी त्या लिहिल्या. इस्लामी जगतात या साहित्याला आदराचं स्थान आहे. शिबलींच्या कार्याचा वारसा आझमगडच्या शिबली महाविद्यालयानं आजही 'शिद्दत' नावानं जोपासलाय. उच्च शिक्षणाचं आझमगडमधील हे मुख्य केंद्र आज केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदू विद्यार्थ्यांचं भवितव्यही घडवतंय. (Political Breaking News)

 Azamgarh History|
Sarkarnama Podcast: विरोधी ऐक्‍याचा गुंता

आझमगड पूर्वी शिया पंथाच्या शिक्षणाचं प्रमुख केंद्र होतं, ते शिबलींमुळंच. शिया जीवनपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इथं जगभरातून विद्यार्थी येतात. आझमगडच्या मातीनं अमीन अहसान इस्लाही आणि जफरुल इस्लाम यांच्यासारखे इस्लामचे प्रसिद्ध विद्वान जगाला दिले. इतिहासाच्या क्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, ते इश्तियाक अहमद जिल्दीसुद्धा आझमगडचेच. अलिगड विद्यापीठात ते अध्यापन करतात. आझमगडचे सुपुत्र सम्सुर्रहमान फारुकी यांनाही विसरणं कठीणच!

१३ सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या बॉंबस्फोटांनंतर आझमगडची चर्चा पुन्हा सुरू झाली. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ही आझमगडची ओळख झाली होती. जयपूर आणि अहमदाबादमधील बाँबस्फोटांचा सूत्रधार म्हणून अबू बशरला जेव्हा अटक झाली, तेव्हा आझमगडकडे पाहण्याचा तोच दृष्टिकोन पक्का झाला. दिल्ली स्फोटांनंतर मारले गेलेले आतिफ आणि साजिद, अटक झालेला सैफ यांनी तो आणखी पक्का केला. आझमगड दहशतवादाचा आणि फक्त दहशतवादाचाच गड वाटू लागला, हे दुर्दैव!

 Azamgarh History|
Sarkarnama Podcast : मराठी मनात चैतन्य फुलवण्याऱ्या 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताचा इतिहास काय?

आझमगडची चर्चा इथल्या जगप्रसिद्ध 'ब्लॅक पॉट्री' ग्रंथालयाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. उर्दू साहित्याच्या दुनियेत या ग्रंथालयाला आदराचं स्थान आहे. हिंदीतील पहिलं महाकाव्य लिहिणारे अयोध्यासिंह उपाध्याय सर्वांना ठाऊक आहेत; पण याच भूमीतील श्यामनारायण पांडे यांनी महाराणा प्रताप आणि अकबराच्या युद्धाचा विषय घेऊन 'हल्दीघाटी' नावाचं खंडकाव्य लिहिलं. महाराणा प्रतापाच्या चेतक घोड्याचं त्यांनी केलेलं वर्णन वाचून अंगावर रोमांच उभे राहतात. आझमगडमधील मेहनगर तालुक्यातील विसहम गाव दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकांमुळे चर्चेत आहे.

हाजी मस्तानच्या नातलगांच्या संदर्भातही आझमगडचं नाव घेतलं जातं; पण लोक हे विसरतात, की याच जिल्ह्यातील हरिहरपूर हे ब्राह्मणबहुल गाव तबलासम्राट गुदई महाराजांची सासुरवाडी..... तबलासम्राट उस्ताद किशन महाराज आणि ठुमरी गायिका गिरिजादेवी यांचे नातलगही या गावातलेच...

 Azamgarh History|
Sarkarnama Podcast : अनाथ आदिवासी मुलीच्या अत्याचाराची करूण कथा, ज्यामुळे बलात्कार कायद्यात झाले बदल!

आझमगडला कला आणि संस्कृतीचा मोठा वारसा लाभलाय. चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात इथले अनेक जण नाव आणि पैसा कमावत आहेत. 'सारेगमप' या प्रसिद्ध 'रिअॅलिटी शो'चे निर्माते गजेंद्र सिंह आणि चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र सिंह याच मातीतले. दिग्दर्शक राहुल सांकृत्यायन हेही इथलेच. टाटांच्या 'नॅनो' या छोट्या मोटारीची आज सर्वत्र चर्चा आहे; पण त्याही आधी आझमगडमधल्या चंदन नावाच्या १७ वर्षांच्या मुलानं दोन सीटची छोटी मोटार तयार केली होती... हे किती लोकांना ठाऊक आहे? ही मोटार एक लिटर पेट्रोलमध्ये चाळीस किलोमीटर धावायची....

आझमगडची आज जी अपकीर्ती होत आहे, तिला प्रत्युत्तर द्यायचं झालं, तर दहशतवाद्यांशी दोन हात करणारे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक प्रकाश सिंह यांचं नाव घ्यावं लागेल. याच मातीत जन्मलेले प्रकाश सिंह म्हणतात, की सरायमीर, निजामाबाद, खैराबाद, मुबारकपूर, बिलरियागंज, मोहंमद खान आणि अतरौलियामधून हजारो मुलं दिल्ली, मुंबई, अलिगड, हैदराबाद आणि लखनौला शिकायला किंवा पैसा कमवायला जातात. देशविरोधी शक्ती त्यांना फूस लावू शकतात; पण त्यामुळे या परिसरालाच बदनाम करण्याऐवजी ही मुलं देशविरोधी शक्तींच्या हातचं बाहुलं बनणार नाहीत, यासाठी पुरेशी उपाययोजना करणं, हाच मार्ग आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com